संपी आणि तिचं धमाल जग (आतापर्यंतची पूर्ण कथा एकत्रित)
नमस्कार!
संपीची कथा एकत्रित
कुठे वाचता येईल अशी बर्याच जणांकडून विचारणा होत असल्यामुळे आतापर्यंतची संपूर्ण
कथा सलग इथे उपलब्ध करून देतेय.
1
एक मोठी जांभई देऊन संपी पलंगावरुन उठली. आजूबाजूला पाहिल्यावर तिच्या
लक्षात आलं की दुपार झालीये आणि रोजच्या प्रमाणे आजही आपण माती खाल्लीये.
स्वयंपाकघराच्या दारातून हळूच डोकावून तिने पाहिलं. आई ओटा पुसत होती. आता तो
पुसून झाल्यावर ती आपल्याकडे वळणार हे संपीच्या चाणाक्ष मनाने लगेच ओळखलं. आणि मग
वायू वेगाने हालचाली करत तिने शून्य मिनिटांत एकदा डावीकडे आणि एकदा उजवीकडे ब्रश
फिरवून दात घासले. जवळपास वादळ वेगाने बादलीभर पाणी अंगावर ओतून आंघोळ उरकली. आणि
मग हाताला लागतील ते कपडे अंगावर चढवून ती हॉल मध्ये दिसेल तो पेपर उघडून वाचत
असल्याचा आव आणत येऊन बसली.
संपीची आई हात पुसत बाहेर आली. समोर पेपर उघडून बसलेली संपी. आईने
काही न म्हणता पंखा चालू केला. आणि मग खुर्चीवर टेकत म्हणाली,
“तो कालचा आहे. झोप झाली असेल तर आजचा टीव्हीच्या बाजूला ठेवलाय.”
संपीने लगेच पेपर वरची तारीख पहिली. खरच कालची होती. पेपरच्या आडूनच
जोरात डोळे मिटून घेत ती स्वत:च्या मूर्खपणावर चरफडली. आणि मग मुकाट्याने त्या
पेपरची घडी घालून तो जागच्या जागी ठेऊन आजचा उघडून येऊन बसली.
पुन्हा आईचं मिश्किल वाक्य कानांवर पडलं,
“आज भल्या पहाटे उठलेली दिसतेयस. अंधारात कपडे सुलटे की उलटे दिसलं
नाही बहुतेक.”
पुन्हा पेपरच्या आडून संपीने कपड्यांकडे पाहिलं, चक्क उलटे होते. हौसेने शिऊन
घेतलेल्या त्या फ्रिलच्या ड्रेसची आतली सगळी अस्ताव्यस्त शिवण छानपैकी सगळीकडून
प्रदर्शित होत होती. तिने पुन्हा जोरात डोळे मिटले. यावेळी जराशी जीभ पण बाहेर
आली. वरच्या आणि खालच्या दातात घट्ट दाबलेली. मग आईची नजर टाळून पेपर बाजूला ठेऊन
ती तशीच आतल्या खोलीत पळाली. आत जाऊन स्वत:च्या (नेहमीच्या) वेंधळेपणावर स्वत:शीच हसली.
आणि अशा प्रकारे आजचा गाढ झोपेतून पृथ्वीवर अवतीर्ण झाल्यानंतरचा
युद्धप्रसंग हसतमुखाने पार पडल्याने संपीने सुस्कारा सोडला.
थोड्या वेळाने संपीचे बाबा घरी आल्यावर, जेवताना, आजचा दिवस आईच्या ठेवणीतल्या शिव्या न खाता इतका
छान कसा उगवला ते संपीच्या लक्षात आलं. ताटात आज वरण-भात-भाजी-पोळी नामक जेवण
नव्हतं तर आईच्या दाव्या नुसार ‘दाळ-बाटी’ होती. काल टीव्ही वर पाहिलेली रेसिपी
आज ताटात अवतरली होती. संपी तशी साधारण मध्यमवर्गीय असल्यामुळे तिच्या घरचे एकत्रच
जेवायला बसत. तेही
खाली जमिनीवर. मध्यमवर्गीय म्हणजे जुने मध्यमवर्गीय बरंका. ईएमआय भरणारे आणि
डायनिंग टेबलावर जेवणारे नवे मध्यमवर्गीय नाही. मधोमध सगळे पदार्थ ठेवलेले आणि
त्याभोवती सगळ्यांची पानं वाढलेली. सगळ्यांची म्हणजे, संपीचे बाबा, संपीचे आजोबा, संपीची धाकटी बहीण, संपीची आई आणि स्वत: संपी यांची. तर, ताटातला तो पदार्थ टकामका पाहत
सर्वांनी येणार्या प्रसंगासाठी मनाची तयारी सुरू केली. संपीची आई सगळ्यांच्या
चेहर्यांकडे चातका सारखी पाहत होती. कोण पहिला घास घेतोय, आणि ‘दाळ-बाटी’ कशी झालीये ते सांगतोय याकडे तिचं लक्ष लागलेलं.
संपीने पहिला घास घेतला. बाटी नामक दगडी वाटावी अशी वस्तु तिच्या
दातांना दाद देईना. मग तिने आईची नजर टाळून सरळ खाली मान घालून वाढलेलं पोटात
ढकलायला सुरुवात केली. संपीचे आजोबा काही न बोलता नुकत्याच बसवून घेतलेल्या
कवळीच्या जोरावर तो बाटीचा युद्धप्रसंग पचवू लागले. संपीची बहीण अजून तशी ‘बाल’ असल्याने तिने तिचा मोर्चा वरण-भाताकडे वळवला.
आता उरले संपीचे बाबा. येणार्या बाक्या प्रसंगाची कल्पना न येता पहिला घास
खाल्ल्या-खाल्ल्या ते नकळत बोलून गेले आणि पस्तावले,
“दाळ-बाटी आहे की दगड-बाटी?”
बास! संपीच्या आईचा चेहरा पडला. मग डोळ्यांत पाणी. मग ती उपसत
असलेल्या कष्टांची यादी. मग डोळ्याला पदर. मग कधी कसली हौस म्हणून नाही ते दिवसभर
राब-राब राबते पण माझ्या मेलीच कोणाला कौतुकचं नाही इथपर्यंत क्रॉसिंग वरुन जाणार्या
रेल्वेप्रमाणे धाड-धाड गाडी समोरुन सरकली. त्यापेक्षा डाळीमधले दगड परवडले अशी
संपीच्या बाबांची अवस्था झाली. मग संपीच्या आईच्या तारसप्तका मधल्या पार्श्वसंगीतासह
सार्यांची जेवणं कशी-बशी पार पडली.
संपीची दहावीची परीक्षा झालेली होती. सुट्ट्याही संपत आलेल्या. कधीही
निकाल लागतील असे दिवस. दहावीचं पूर्ण वर्ष मोल-मजुरी केल्यासारखी संपीने पूर्ण
सुट्टी लोळून काढली होती. सकाळ ही संकल्पना तिच्या लेखी अस्तित्वातच नव्हती. तशा
संपीच्या सगळ्याच संकल्पना जराशा वेगळ्याच होत्या. त्या कशा ते तुम्हाला हळू-हळू
कळेलच.
तिन्हिसांजेला संपी डायरीत तोंड खुपसून काहीतरी करत बसली होती. काय ते
तिचं तिलाच ठाऊक. एवढ्यात दोन घर सोडून पलिकडच्या सुमा काकू पदराखाली काहीतरी
झाकून घेऊन आल्या. समोर संपी बसलेली. दोन हाका मारल्यावर तिने वर पाहिलं.
“संपे, अगं
तुला आवडतात म्हणून ताजे अप्पे घेऊन आलेय.”
त्यांचं हे वाक्य कानांवरुन उडवत ती सरळ आईला पाठवते म्हणत आत पळाली.
“अगं, हे
घेऊन तरी जा.”
आतून संपीची आई बाहेर आली.
“अहो सुमा ताई कशाला.. मी करणारच होते उद्या.”
हे ऐकून संपीने आत मान हलवली.
“राहुद्या हो, आवडतात
संपीला म्हणून आणले.”
“मी पण आज दाल-बाटी केली होती. पण अहो बिघडलीच थोडी.”
दोघींच्या मग चांगल्याच गप्पा सुरू झाल्या.
संपीचा जीव आतमध्ये कासावीस होत होता. तिची डायरी बाहेरच राहिली होती.
आता ती जाऊन आणावी तर सुमा ककुशी बोलावं लागणार. मुळात कमी बोलणार्या संपीला मोठी
माणसं दिसली की तर अजूनच बावरल्या सारखं, गोंधळल्यासारखं व्हायचं. पण, कोणातरी सोम्या-गोम्याच्या लग्नावर
त्यांचा विषय घसरल्यावर मात्र आता यांच्या गप्पा काही लवकर आवरत नाहीत म्हणत संपी
उठली आणि हळूच डायरी उचलून आणावी म्हणून बाहेर आली. त्या दोघीना गप्पांमध्ये दंग
पाहून तिने डायरी उचलली आणि ती आत यायला वळणार इतक्यात सुमा काकुंचा आवाज तिच्या
कानांवर पडला,
“काय गं संपे, हे काय
घातलंयस तू?”
संपीने स्वत:च्या कपड्यांकडे एकदा वाकून पाहिलं. तिला वाटलं पुन्हा
उलटेच घातले की काय आपण! पण नाही सुलटे होते की.. तिला कळेना नक्की काय बिघडलय.
“अगं.. दोन तू बसतील की यात. कुठून घेतलंस हे. आजकालच्या पोरी ना..
काहीही घालतात अगदी. आणि जरा टिकली लावावी गं, बरं दिसतं ते..”
झालं आता यांचं पुन्हा सुरू म्हणत संपीने जराशा रागातच आईकडे पाहिलं
आणि मग सरळ आत निघून आली. शी किती बोरिंग असतात ही मोठी माणसं. ती स्वत:शीच
पुटपुटली. आणि पुन्हा डायरीत तोंड खुपसून बसली.
सध्या तिच्या घरात एकच चर्चा होती. संपीचा निकाल. आणि त्यानंतरचं
अडमिशन. पण तो खरंतर चर्चेचा विषय नव्हताच तसा. कारण दहावी झाल्यावर काय करायचं
असतं तर सायन्स घ्यायचं असतं. बास. हाच अल्टिमेट प्रोटोकॉल. तुमचे मार्क चांगले
असतील तर गुणवत्तेवर घ्या आणि नसतील तर पैसे मोजून घ्या. पण सायन्सच घ्या. तर
संपीसुद्धा सायन्सच घेणार होती. तिची तशी मनाची तयारी पण झालेली होती. आत्तापासूनच
तिला एंजिनियर झाल्याची स्वप्नंही पडू लागली होती. आजूबाजूला अमक्याची ही किंवा
तमक्याचा तो अशी एखादी सक्सेस स्टोरी असतेच सतत ऐकलेली किंवा ऐकवली गेलेली. तशी ती
संपीनेही ऐकली होती. आणि इंजिनियर होणे म्हणजे एकंदर आयुष्याचं सार्थक होणे असं
काहीसं चित्र तिच्या डोळ्यांसमोर तयार झालं होतं.
दुसर्या दिवशी सकाळी स्वप्नातच कोणीतरी जोरात ओरडतंय की काय असं
वाटून संपी दचकून जागी झाली. पाहते तर काय तिची लहान बहीण खरंच ओरडत होती.
‘संपे, उठ
निकाल लागलाय”
हो. संपीची तिच्यापेक्षा बरीच लहान बहीण तिला नावानेच हाक मारायची.
संपी खडबडून जागी झाली.
“आज निकाल लागणार होता काय?”
डोळे चोळत झोपेतच ती बडबड्ली आणि आईचा कानोसा घेत हळूच बाथरूमकडे
पळाली.
2
मोजून दहा कम्प्युटर असलेल्या त्या छोटेखानी नेटकफे मधल्या एका
कम्प्युटर स्क्रीन समोर संपी बसली होती. भिंतीला चिटकुन. तिच्या बाजूला संपीचे
बाबा. आणि त्यांच्या बाजूला उभा होता त्या कॅफेचा तो पोरगेलासा मालक. आत शिरल्या
शिरल्या उजव्या हाताला त्याचं टेबल होतं. आणि त्याच्यामागे डावीकडे पाच आणि
उजवीकडे पाच असे कम्प्युटर पार्टिशन करून ठेवलेले. प्रत्येक पीसी समोर एका माणसाला
बसता येईल न येईल अशी अरेंजमेंट. तो पोरगेलासा मालक संपीच्या
बाबांसमोर जवळपास वाकून कर्सर फिरवत होता. संपी तिरकस नजरेने सारा प्रकार पाहत
होती. तिने आधी प्रयत्न केला होता पण साइट वर एकदम लोड आल्याने ती जॅम झाली होती.
आणि रिजल्ट काही केल्या दिसत नव्हता. संपीला मुळात इथे यायचंच नव्हतं. दुपारी
कळेलच की शाळेत निकाल म्हणून तिने सगळ्यांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला. पण
तिच्या रिजल्ट विषयी ती सोडून सारेच अति उत्सुक असल्याने तिला मनाविरुद्ध यावं
लागलं होतं. त्यात तिच्या बाबांचं बोलणं. ‘आता माझं एमएससीआयटी झालंय हे त्या नेटकफे वाल्या पोराला सांगायची काय
गरज होती!’ ती
मनातल्या मनात चरफडली. तो पोरगा आपण सॉफ्टवेअर इंजीनियरच आहोत अशा आविर्भावात
बोलत-वागत होता.
चार-पाच मिनिटं खटपटी केल्यावर एकदाचा स्क्रीनवर निकाल झळकला.
‘संपदा मिलिंद जोशी, 89.09%’
निकाल पाहून संपी चाट पडली. तिचे विस्फारलेले डोळे आणि उघडलेल तोंड
मिनिटभर तसंच राहिलं. ‘एवढे
मार्क पडलेयत आपल्याला?’ तिने
पुन्हा एकदा नाव चेक केलं. संपीचे बाबा तर एकदम ढगात.
‘मग हुशारच आहे आमची संपी!’ त्या पोराकडे पाहून ते म्हणाले. संपीने एव्हाना
तोंड मिटलं होतं.
घरी आल्यावर एकदम सगळं वातावरणच पालटलं. रोज तिचा यथेच्छ शिव्याभिषेक
करणारी संपीची आई आज चक्क तिचं कौतुक करताना थकत नव्हती. संपीची धाकटी बहीण न भूतो
न भविष्याती इतक्या आदराने तिच्याकडे पाहत होती. एक-दोनदा तर भावनेच्या भरात ती
चक्क संपीला ताई वगैरे म्हणाली. ‘एवढी ताकद असते दहावीच्या निकालात?’ संपी मनातल्या मनात खुश होत स्वत:शीच पुटपुटली.
तो पूर्ण दिवस मग काही विचारू नका, दिवाळीला लाजवेल असा थाटमाट होता. दिवसभर नातेवाईकांचे फोन. संपीच्या
आवडीचा बेत. शेजार-पाजर्यांच येणं-जाणं. आणि त्या प्रत्येकासमोर आईची
पुन्हा-पुन्हा सेम इंटेंसिटीने वाजणारी एकच टेप.
‘मग. उगाच दिसत नाही रिजल्ट. वर्षभर अगदी इकडचे तिकडे झालो नाही आम्ही.
टीव्ही बंद. कुठे जाणं-येणं नाही. आणि संपीनेही मान मोडेपर्यंत अभ्यास केला बरं.
पहाटे चारला उठायची रोज..’
यावर संपीने जरासं दचकूनच आईकडे पाहिलं. तिला तर ते काही आठवत नव्हतं.
हम आता गणिताची शिकवणीच सकाळी सहाची लावली असेल तर करणार काय ती तरी बिचारी. पूर्ण
वर्ष तिथे जाऊन पेंगल्याचं मात्र तिला छान आठवत होतं. मुकाट्याने पेढे खात ती
शांतपणे सगळ्यांचं बोलणं ऐकत बसली.
‘अमुकचा अमुक पण होता ना हो यावर्षी दहावीला?’
‘होता तर. काठावर पास आहे.’ शेजारच्या काकू.
‘हम्म, गावभर
भिशी पार्ट्या करत फिरायची त्याची आई. काय वेगळं होणार होतं.’ संपीची आई.
‘नाहीतर काय! भारी हौस बाई त्यांना डामडौल दाखवण्याची. घराकडे लक्ष तसं
कमीच असतं म्हणे.’ काकू.
‘हम्म, स्वत:
झिजावं लागतं. मग घडतात मुलं. सोपं नाही ते. जाऊदे आपल्याला काय करायचंय.’ आई.
‘हो ना,
आपल्याला घेऊन काय करायचंय.’
दुपारी मग रीतसर मार्कशीट आणायला संपी तिच्या मैत्रिणींसोबत शाळेत
आली. बॅच मधल्या सगळ्यांची तिथे गर्दी. कोणाला किती पडले पाहण्याची उत्सुकता.
जिथे-तिथे मुलांचे नि मुलींचे घोळके जमलेले. अर्थात मुलींचे वेगळे नि मुलांचे
वेगळे. काही हजारांमध्ये
लोकसंख्या असलेलं ते तालुका वजा गाव. अशा ठिकाणी तेव्हा तरी मुलं-मुली एकमेकांना
सहज बोलण्याचा प्रघात नव्हता. आडून आडून चौकशा. चोरून पाहणं वगैरे प्रकार सर्रास.
एखादी मुलांशी बोलणारी धीट मुलगी असलीच तर ती पूर्ण शाळेचा चर्चेचा हॉट विषय
ठरायची. संपी तर काय फक्त तिच्या चार मैत्रिणींमध्येच पोपटासारखी बडबडायची. बाकी
मुलं किंवा शिक्षक दिसले की हिची घाबरगुंडी उडालीच म्हणून समजा. मुलं हा तर
परग्रहावरून आलेला कोणीतरी परग्रहीय प्राणी असल्यासारखा ती त्यांच्यापासून दहा हात
लांबच राहायची.
मार्कशीट घेऊन बाहेर आल्यावर संपी खुश दिसत होती. तिच्या लाडक्या मुळे
मॅडम नि तिचं भरपूर कौतुक केलं होतं. ती बाहेर आली तेव्हा तिच्या ग्रुप मध्ये ह्या
विषयात तुला किती अन त्या विषयात मला किती अशा चर्चा चालू होत्या. त्यांच्यात, प्रत्येक ग्रुप मध्ये असते तशी
इकडच्या-तिकडच्या सगळ्या चटपटीत बातम्या असणारी एक मैत्रीणही होती. तिला स्वत:ला
मार्कांमध्ये तसा रस अतिशय कमीच. फर्स्ट क्लास मिळाला म्हणजे गंगेत घोडं न्हालं
असा प्रकार. इंजीनियर किंवा डॉक्टर होणे वगैरे फालतू स्वप्नं तिची नव्हती.. तर ही
नेहा, जोरात संपीची
ओढणी खेचून हळूच सगळ्यांच्या कानात कुजबुजली,
‘ए ते बघ ते बघ, तो
राणे कसा बघतोय त्या शिल्पाकडे. मी म्हटलं नव्हतं, त्यांचं काहीतरी सुरूये. आणि ती बघ ती शिल्पा पण
कशी खुणा करतेय..’
नेहा दाखवत होती त्या दिशेला संपीने पाहिलं. बरंच लक्ष देऊन
पाहिल्यावर तिला राणे आणि शिल्पा दिसले. पण ते काय खुणा करत होते, होते की नाही ते तिला शष्प समजलं
नाही. जाऊदे म्हणत तिने शेजारच्या मधुला विचारलं,
“ए फर्स्ट कोण आलय काही कळलं का गं?”
मधुने चणे खात म्हटलं,
“अगं ती गम्मतच झालीये. सगळ्यांना वाटत होतं, ती अतिशहाणी सायली पहिली येईल. किती आव आणायची. पण झालय उलटच.
तो अवचट पहिला आलाय. सायली पहिल्या पाचात पण नाही. ते बघ ते बघ तो अवचट.. भारीचे
बाबा हा.. याला कधी अभ्यास करताना पाहिलं नाही मी. पण चक्क पहिला?”
संपीने एकवार त्याच्याकडे पाहिलं. आणि जणू पाहणं सुद्धा पाप असतं अशा
विचाराने मान लगेच खाली वळवली. मग त्यांच्या चर्चा कुठलं कॉलेज, कोणता ग्रुप, इथेच राहणार की जिल्ह्याला जाणार
वगैरे वगैरे अंगांनी पुढे जात राहिल्या. पण, त्यांचं गावातलं कॉलेज तसं बर्यापैकी नावाजलेलं
असल्याने त्या अवचट सकट बरेचजण संपीप्रमाणे तिथेच अॅडमिशन घेणार होते.
आता आपण ‘कॉलेज’ला जाणार’ या इतके दिवस विशेष न वाटणार्या पण
आता अचानक अंगावर आलेल्या जाणिवेने जराशी धाकधूक मनात घेऊन संपी उशिरा कधीतरी झोपी
गेली.
3
‘सुखकर्ता दु: खहर्ता वार्ता विघ्नांची--’
संपीची आई गल्लीभर ऐकू जाईल अशा आवाजात आणि 3क्ष वेगाने आरती म्हणत
होती. आणि मधुन मधून,
‘संपे, आरती
म्हणायला ये.’
असंही म्हणत होती. तेही हे वाक्य जणू काही आरतीचाच भाग आहे असं वाटावं
अशा भन्नाट सुरांत.
पण बैठकीत टीव्ही वर कार्टून बघत बसलेली संपी ढिम्म हलली नाही. उलट
त्या टॉम च्या कारनाम्यावर हसत बसली. ती असेच खीखी दात काढत असताना शेवटी तिची आईच
हातात आरती घेऊन समोर येऊन उभी राहिली. काढलेले दात बंद करत संपीने निमूटपणे आरती
घेतली. आणि एकवार पैठणी नेसलेल्या आईकडे पाहून आश्चर्याने म्हणाली,
‘अगं कोणाचं लग्न-बिगनय का? एवढी का तयार झालीयेस तू?’
यावर लुंगी नेसून लोडला टेकून वर्तमानपत्र वाचत बसलेल्या संपीच्या
बाबांकडे एक कटाक्ष टाकून तिची आई म्हणाली,
‘नाही. वीस वर्षांपूर्वी मीच केलय म्हणून तयार झालेय..’
‘म्हणजे?’ संपीचा
प्रश्नार्थक चेहरा.
यावर ‘बाप
तशी लेक’ म्हणत
कपाळाला हात लावून संपीची आई आत निघून गेली.
मग तोंडासमोरचा पेपर जरासा बाजूला सारून संपीचे बाबा हळू आवाजात
संपीला म्हणाले,
‘अगं वडाला गळफास द्यायचा दिवस आहे आज. त्याचीच तयारीये ही सगळी. आता
जातील या सगळ्या गल्लीतल्या बायका मिरवत वडाकडे. वटपौर्णिमा आहे आज.’
एवढ्यात हातात एक मोठं ताट, त्यावर लोकरीने विणलेलं एक ताटझाकण टाकून आई
बाहेर आली.
संपीच्या बाबांनी लगेच तोंड पेपर मध्ये खुपसलं.
गळयातल्या मंगळसूत्राकडे बोट दाखवत संपीची आई म्हणाली,
‘हो हो. गळफास कोणाला पडलाय ते दिसतंय बरं. तुम्ही बसा आरामात
वाचन-बिचन करत. आम्ही करतो पूजा, लाटतो पुरण-पोळ्या, दाखवतो नैवेद्य.. सगळं काय ते बायकांना. या पुरूषांना मोकाट सोडलय
आपल्या सणवारांनी.’
तुच्छतामिश्रित कटाक्ष टाकून संपीची आई घराबाहेर पडली.
एकदा तिच्या पाठमोर्या आकृतीकडे आणि एकदा पेपर आडून आई गेली का
बघणार्या बाबांकडे पाहून संपीने पुन्हा तिची नजर टॉम अँड जेरी वर स्थिर केली. आणि
मग पुन्हा तिचं खो-खो सुरू.
तेवढ्यात दराबाहेरून कोणीतरी मारलेली हाक तिच्या कानांवर पडली,
‘संपदा, संपे’
वळून बघेतो नेहा आत आली. आणि संपीला कार्टून्स बघताना पाहून तिच्या
शेजारी बसत म्हणाली,
‘संपे, काय
कार्टून बघतेस गं अजून. ते अमुक-अमुक चॅनेलवरच ‘कसम की कसम’ बघ त्यापेक्षा. ती मेहक घर सोडून जाणार आहे आज.’
‘कोण मेहक? काय
कसम की कसम? ए मी नाही बघत
त्या बोरिंग सिरियल्स. तूच बघ.’ संपी म्हणाली, ‘आणि
काय गं, कुठे गायब आहेस
रिजल्ट लागल्यापासून. आम्ही तुझ्या घरी जाऊन आलो.’
‘अगं, मी
मावशीकडे जाऊन आले’ नेहा.
‘आणि अॅडमिशनचं काय?’ संपी.
‘ते झालं की. आजच घेतलं. कॉमर्स ला.’ नेहा.
‘अच्छा. चांगलंय. अजून कोण-कोणय कॉमर्सला?’ संपी.
‘तो घाटपांडे दिसला बाई. ती लांब केसांची मेघा पण होती. मी बघितलं तर
साधी हसली पण नाही. तुसडी कुठली.’ इति नेहा.
‘काय गं आपला ग्रुप तुटणार आता.’ संपी.
‘तुटतोय कशाला. मी एकटीच तर आहे कॉमर्सला. बाकी तुम्ही सगळ्याजणी
सायन्सलाच तर आहात. आणि मी काय, मी येत जाईन की सायन्सच्या बिल्डिंग मध्ये अधून-मधून.’
‘अगं सायन्स आहे पण math ग्रुपला मी आणि मधुच आहोत फक्त. बाकी राधाने बायो
घेतलंय. आणि तेजुने आयटी. Divisions वेगळ्या असतील.’ संपी.
‘असं पण असतं काय? सायन्स
वाले लोक बाबा तुम्ही. स्कॉलर. आमचं बरंय बाबा. निवांत एकदम.’
मग संपी आणि नेहाने गच्चीवर जाऊन बराच वेळ धुडगूस घातला. उद्या
कॉलेजचा पहिला दिवस असल्याने संपीला उगाच धडधडत होतं. शिक्षक कसे असतील इथपासून, नवीन मैत्रिणी, वर्गातली मुलं, ‘सायन्सचा अभ्यास’, केमिस्ट्रि भलतीच अवघड असते म्हणे
ब्वा.. इथपर्यंत बरेच विषय तिच्या डोक्यात घोंघत होते. त्यात नेहाने इकडच्या
तिकडच्या खबरी पुरवून तिला बरंच ज्ञानही दिलं. दिवस कलल्यावर नेहा घरी गेली तशी
उद्याचा विषय तात्पुरता बाजूला सारत संपी पुन्हा कार्टून्स समोर जाऊन बसली.
आज संपीचा कॉलेजचा पहिला दिवस म्हणून घरात बरीच लगबग होती. संपीच्या
आजोबांनी संपी साठी नवीन पेन आणलं होतं. आई डबा बनवण्याच्या घाईत होती. संपीची
लहान बहीण उगाच मध्ये-मध्ये घुटमळत होती. पण या सगळ्यात संपी कुठे होती? तर मॅडम अजून स्वप्नातच विहरत
होत्या. आईच्या दहा हाकांना झोपेतच ‘पाचच मिनिटं’ असं
म्हणत ती तासाभरापासून snooze करत होती. शेवटी सारे प्रयत्न थकल्यावर आई हातात लाटण घेऊन जेव्हा
तिच्यासमोर येऊन उभी राहिली तेव्हा 9 चं पहिलं लेक्चर गाठायला संपी 8.20 ला उठली.
एव्हाना मधु बाहेर येऊन बसली होती. डोळे चोळत तिच्याकडे पाहत संपीने नाहणीघरात धूम
ठोकली आणि तिच्या नेहमीच्या हवाई वेगाने आणहिके उरकुन धावत-पळत बाहेर आली.
आईने दिलेला डबा बॅगेत ठेवत तिने आईच्या सांगण्यानुसार अनुक्रमे आधी
देवाला मग आजोबांना मग आई-बाबांना धावता नमस्कार केला आणि कॉलेजच्या दिशेने सायकल
हाकायला सुरुवात केली. कॉलेज सायकलने पंधरा मिनिटांच्याच अंतरावर होतं तरीदेखील
दोघींना पोचायला उशीरच झाला. वर्गाबाहेर त्या पोचल्या तेव्हा वर्गात सर आलेले
होते. पूर्ण वर्ग भरलेला. आणि दारात घामेघूम संपी, तिच्या बाजूला मधु. बॅग सांभाळत संपीने हळूच
मधुला पुढे केलं. सगळ्यांच्या नजरा आता दोघींवर खिळलेल्या.
चाचरत मधुने विचारलं,
‘आत येऊ का सर?’
संपी तिच्यामागे खाली मान घालून उभी. तिने हळूच डोळ्यांच्या कोपर्यातून
आत पाहिलं. थोडेफार ओळखीचे, थोडेफार
अनोळखी चेहरे आत दिसत होते.
‘वाह! पाहिल्याच
दिवशी उशीर. छान. नावं काय आहेत तुमची?’ सरांनी विचारलं.
‘मी मधुरा देशमुख’ मधु
उत्तरली.
संपी तिच्याकडे पाहत तशीच उभी. आपल्याला पण नाव विचारलंय हे तिच्या
गावीच नाही. पूर्ण वर्ग तिच्याकडे पाहतोय आणि ती मधुकडे.. शेवटी मधुने खूण
केल्यावर तिच्या लक्षात आलं. आणि मग आपल्याकडे रोखून पाहत असलेल्या सरांकडे पाहत
ती गडबडीत म्हणून गेली,
‘मी, मी
संपी’
‘संपी?’ सर.
यावर आता पूर्ण वर्ग मोठ-मोठयाने हसला.
संपी मग ओशाळून खाली मान घालून म्हणाली, ‘संपदा जोशी’
तिच्या वेंधळपणावर सरही जरासे हसले आणि त्यांनी दोघींना आत बसायला
सांगितलं.
दोघी मग शक्य तितक्या मागे आणि शक्य तितकं भिंतीच्या बाजूच्या बेंचवर
जाऊन बसल्या..
4
एकामागून एक धडाधड लेक्चर्स चालू होती. संपी एका जुन्याच रजिस्टरचं
मधलं पान दुमडून काहीतरी उतरवत बसली होती. नवीन वर्ग, नवं कॉलेज, नव्या मैत्रिणी, शाळे सारखं धाकाचं वातावरण नसणं या सगळ्याची तिला
मजा वाटायला लागली. ओळखीच्या मुलींशी
बोलणं, अनोळखी वाटणार्यान्चा
कानोसा घेणं इ. इ. चालू होतं. त्यात दहावी बोर्डात कोणाला किती मार्क आहेत हे
विचारणं आणि त्यावरून कोण किती ‘हुशार’ हे
ठरवणं हे ज्याचं-त्याचं चालूच होतं.
प्राध्यापक विद्यार्थ्यांशी ओळख करून घेत होते. आपापल्या विषयांची
तोंड-ओळखही करून देत होते. ‘मार्क’ कसे मिळवायचे, किती तास अभ्यास करायचा, पुस्तकं कुठली वापरायची (त्यात स्वत:
च्या एखाद्या पुस्तकाची जाहिरात वगैरे आपसूक आलंच), एंट्रेन्स मध्ये ‘स्कोर’ कसं करायचं इ.इ. त्यांच्या मार्गदर्शनाचे विषय!
प्रत्येकाला एकदम भरावल्यासारखं वाटायला लागलं. दहावीत झालं ते झालं पण आता इतका
अभ्यास करायचा, इतका
अभ्यास करायचा की COEP, VJTI सोडा थेट IIT च सर करायची असे संकल्प (?) मनातल्या मनात बांधले जात होते. संपी
पण एकदम भारावलेली. आता फक्त फिज़िक्स, केमिस्ट्रि आणि मॅथ्स. बास. तिसरा विषय डोक्यात
पण आणायचा नाही असा तिनेही मनोमन निग्रह (?) वगैरे केला.
एक खरं, की या
सगळ्या ‘objective’ भारावलेपणात
मूळचे phi, chem आणि math कुठेतरी कोपर्यात जाऊन बसलेले होते.
मार्क, स्कोर, रॅंक आणि इंगिनीरिंगला अॅडमिशन हे खरे काय ते ‘विषय’. बाकी सगळं मिथ्या!
त्यादिवशी घरी आल्यावर संपीने फर्मान सोडलं, ‘नवी पुस्तकं हवी आहेत.. आजच्या आज.’ तिला आता एक दिवस काय एक क्षणही वाया
जाऊ द्यायचा नव्हता. भारावलेपण हो दुसरं काय! मग याचा सल्ला घे, त्याला विचार, publication कुठलं चांगलं, कोणत्या पुस्तकातले प्रश्न हमखास
विचारले जातात इ.इ. मौलिक मुद्दे ध्यानात घेऊन संपीची पुस्तक खरेदी पार पडली.
न भूतो न भविष्यती अशा उत्साहात सकाळी नऊ च्या कॉलेजसाठी संपी दुसर्या
दिवशी चक्क ‘सात’ वाजता उठली. आई-बाबा आ वासून
तिच्याकडे पाहतच राहिले. ‘पोरगी
सुधारली’ वगैरे
वाटायला लागलं त्यांना. घेतलेली पुस्तकं, विषयवार वह्या, हिरवी-नीळी-लाल-काळी इ पेनांचा गुच्छ असा सारा जामानिमा घेऊन
संपी मधु यायच्या आत ‘तयार’ होऊन बसली होती.
कॉलेज मध्ये आल्यावर संपी आज चक्क पहिल्या रांगेतल्या बाकावर बसली.
आणि गप्पा-बिप्पांना फाटा देत कालच घेतलेलं नियोजित लेक्चरच्या विषयाचं पुस्तक
उघडून त्यात तोंड खुपसून बसली.. ध्यास हो ध्यास! ‘सर्क्युलर मोशन’ प्रकरणाचं नाव. वाह! आता ओळ अन ओळ पाठच करते असं
म्हणत त्याच्यावर आडवा हात मारण्याच्या ती विचारात असतानाच तिला आजूबाजूचा आवाज
एकदम शांत झाल्यासारखा वाटला. काय झालं म्हणून पहायला तिने मान वर केली. वर्गात
पिन ड्रॉप सायलंस. संपीच्या बेंच च्या अगदी समोर परगावाहून आलेली नवी शहरी वाटावी
अशी एक नवीन अॅडमिशन घेतलेली मुलगी अवचटशी बोलत थांबली होती. कोणी दाखवत नसले तरी
वर्गातल्या प्रत्येकाचं लक्ष तिकडेच लागलेलं. संपीने एकवार दोघांकडे पाहिलं आणि
त्यांच्यापेक्षा तीच जास्त अवघडली. तिच्या अगदी समोर हा प्रकार चालू होता. ती नवीन
मुलगी, दिशा की कोण, अवचटला गावात कुठले क्लास चांगले, पुस्तकं कोणती घेणार आहेस इ.इ.
प्रश्न विचारत होती. आणि सुरुवातीला अवघडलेला अवचट नंतर काहीतरी जुजबी उत्तरं देऊन
तिथून सटकण्याच्या प्रयत्नात होता. पण, दिशा काही थांबेचना. तिला काल कोणीतरी अवचट
फर्स्ट आहे वगैरे सांगितलं होतं. कॉलेज मध्ये आलेले असले तरी असं एकदम सामोरं-समोर
बोलणं त्यांच्या आजवरच्या घडणीला धक्का देणारंच होतं. आता पोरं नंतर हिच्यावरून
आपली उडवणार हे अवचटला कळून चुकलं. इतका वेळ धीर धरून बसलेला तो, ‘तू अभ्यास कसा करतोस?’ असा दिशाचा प्रश्न ऐकून बादच झाला.
त्याने समोर बसलेल्या संपीकडे पाहिलं आणि काही न सुचून तिला म्हणाला,
‘अरे हाय, तुला
काल ते माझं केमिस्ट्रिचं पुस्तक हवं होतं ना?’
संपीने आधी इकडे-तिकडे बघितलं. त्याने पुन्हा तिला ‘अगं ते नाही का ते इनोर्गनिक
केमिस्ट्रिचं?’. संपी
चाट पडली. तिला ओ की ठो समजेना. समोर अवचट. त्याच्या बाजूला दिशा. आणि पूर्ण
वर्गाचं लक्ष याच संभाषणाकडे लागलेलं. संपीचं ततपप सुरू.. एवढ्यात पुन्हा अवचट,
‘थांब मी आणलंय का पाहतो’ म्हणून तिथून सटकला.
दिशा ‘अरे
थांब.. थांब..’ म्हणत
त्याच्यामागे गेली. संपी पुरती ब्लॅंक. पुस्तकातली सर्क्युलर मोशन आता तिच्या
डोक्यात घुमायला लागली होती. पुन्हा
कधीही पहिल्या बाकावर बसायचं नाही असा मग तिने निश्चयच केला.
‘संपे, तू कधी
मागितलंस गं पुस्तक त्याच्याकडे?’ शेजारच्या मधुने तिला विचारलं.
‘अगं,
शप्पथ. मी नाई मागितलं. मी कशाला जाऊ त्याच्याशी बोलायला. खोटं बोलला तो साफ!’
संपी बावरून शपथा घेत म्हणाली.
‘वाटलंच मला. चल विचारू त्याला, असं खोटं का बोललास म्हणून. उगाच तुझं नाव खराब
नको व्हायला.’ मधु
जागची उठत म्हणाली.
तिला ओढून खाली बसवत संपी म्हणाली,
‘नको नको. बस गप्प. मी नाई येणार बाबा कुठे. मला नाही बोलायचं कोणाशी.’
आणि तिने पुन्हा तोंड ‘सर्क्युलर मोशन’ मध्ये
खुपसलं.
त्यादिवशी दिशा आणि अवचट हा सर्वांसाठी दिवसभर चघळायला मिळालेला हॉट
विषय होता. दिशा फुल्ल ऑन एटेन्शन सीक करत वावरत होती. आणि अवचट तिच्याकडे
दुर्लक्ष करत मित्रांमध्ये बसून फिदिफीदी हसत होता. येणारे प्राध्यापक येऊन शिकवून
जात होते. संपी प्रामाणिकपणे त्यांचा शब्द अन शब्द टिपून घेत होती. आणि घरी जाऊन
त्या सगळ्याचं रिवीजन करायचं असंही तिने ठरवलं होतं. पण घरी आल्यावर मात्र
टीव्हीवर चालू असलेलं टॉम अँड जेरी बघण्यात ती इतकी गढून गेली की कॉलेज, सर्क्युलर मोशन वगैरे सगळं तात्पुरतं
तरी साफ विसरून गेली.
5
एकामागून एक दिवस भराभर जात होते. कधी सुरू झाली आणि कधी संपली कळायच्या आत अकरावी निघूनही गेली. आता बारावीचं वर्ष. म्हणजे अक्षरश: समरांगण. काॅलेजच्या सुरुवातीच्या दिवसात संचारणारा उत्साह चार दिवस टिकतो आणि मग पुन्हा येरे माझ्या मागल्या सुरू. पहिले आठ दिवस संपीही अभूतपूर्व उत्साहाने वावरली. पण नंतर हळूहळू, त्या दिसेल ती गोष्ट ‘पाठ’
करण्याच्या नादात तिच्या मेंदूला मुंग्या यायला लागल्या, मग निश्चयाला सुद्धा आणि मग आपसूकच वेळापत्रकालाही. वर्षभर तिने पहिलं लेक्चर जेमतेमच अटेंड केलं. ती आता ‘उशीरा येणारी वेंधळी संपी’ म्हणून काॅलेजात प्रसिद्धही झाली होती.
वर्गात एव्हाना काही नाॅर्म्स सेट झालेले होते. काही स्काॅलर लोकांचे ग्रुप, काही उडाणटप्पूंचे ग्रुप, काही अवचट सारखे पहिले येणारे तर काही तळागाळातले, काही आपल्या स्टाईल मुळे प्रसिद्ध असणारे, काही चातुर्यामुळे. संपी मात्र या कशातही नव्हती. कोणाच्याही फारसा दृष्टीस न पडणारा, ठळक न जाणवणारा, पुढे नसणारा आणि मागेही नसणारा असा एक मधला पॅच सगळीकडे असतो. संपी त्यापैकी होती. कोणाच्या अध्यात-मध्यात नसणे, किंवा अंगभूत निरागसपणा किंवा कुठल्याच बाबतीत वागण्यातून तरी काॅम्पीटंट नसणे इ.इ. गुणांमुळे तसं तिचं प्रत्येकीशी छान जमायचं. प्रत्येकीला ती अशी आपली वाटायची. अगदी नवीन आलेल्या दिशासकट सगळे तिला येऊन मनातल्या गोष्टी सांगायचे. आणि तीही सार्यांचं सारं ‘ऐकुन’ घ्यायची.
दिशाकडून बऱ्याच नवनव्या गोष्टी संपीला समजायच्या. दिशा बिनधास्त होती. भीड वगैरे तिला कशाचीच वाटायची नाही. त्यामुळे वर्गातल्या इतर खाली मान घालून फिरणाऱ्या मुलींमध्ये ती वेगळी दिसायची आणि पडायची सुद्धा. वाटेल तेव्हा अगदी सहजपणे मुलांशी जाऊन ‘बोलण्याचं’ दुर्दम्य धाडस तिच्यात होतं. तिच्या या स्वभावाला वर्गही आता पुरेसा सरावला होता. त्यामुळे चकित होणं वगैरे गोष्टी आता उरल्या नव्हत्या. एव्हाना मुलांपैकी दोघं-तिघं तिचे मित्रही झालेले होते. अवचट त्यापैकी नसला तरी तिचं-त्याचं बऱ्यापैकी बोलणं व्हायचं. ती तशी हुशारही होती म्हणा. पण, सध्या तिचं नाव जोडलं जात होतं ते शिर्केशी. अनिरुद्ध शिर्के.
त्या दोघांची फिजिक्सची शिकवणी एक होती. संपीचं काॅलेज अकरावी-बारावी सायन्स प्रसिद्ध असल्याने बाहेरगावचे बरेच विद्यार्थी तिथे शिकायला यायचे. दिशा त्यापैकी एक असल्याने होस्टेलवर रहायची. एक-दोनदा शिकवणी संपल्यावर शिर्केला तिला होस्टेलवर सोडताना कोणीतरी पाहिलेलं होतं. तेव्हापासून बातमी वाऱ्यासारखी काॅलेजभर पसरली. पण दिशाने कधी असल्या गोष्टींना भीक घातली नाही.
त्यादिवशी आॅफ लेक्चरमध्ये संपी, मधु आणि त्यांचा ग्रुप असंच काही टाईमपास करत बसलेले होते. वर्ग बराचसा रिकामाच होता. मागच्या एका बेंचवर दिशा एकटीच बसलेली संपीला दिसली. तिने मग दिशालाही त्यांच्यामध्ये
बोलावलं.
बाकीच्या जणींनी जराशी नाराजीच दर्शवली. पण त्यांच्या गप्पा रंगत गेल्या. काहीवेळाने मागच्या बाजुने शिर्के, त्या बसल्या होत्या तिथे आला. आणि त्याने दिशाला हाक मारली. सगळ्याजणींनी वळून पाहिलं. आणि मग शाॅक लागल्या सारख्या गप्प बसल्या.
“काय रे?” काहीच न घडल्यासारखं दिशाने त्याला विचारलं.
“इकडे ये ना, बोलायचंय थोडंसं.”
तो.
संपी उगाचच गारठली. दिशा उठून गेली.
आणि मग इकडे बाकिच्या जणींनी संपीची कानउघाडणी सुरू केली.
‘कशाला बोलतेस गं तू तिच्याशी? ती
‘कशीये’ माहितीये ना!’ वगैरे वगैरे.
संपी गप्प. तिला म्हणजे कळेचना काय करावं. दिशा तर आता तिची मैत्रीण होती. मैत्रिणीला असं कसं तोडून टाकायचं! पण मग तिचं वागणं? त्याचं काय करावं? हे असं बरोबर आहे का सारखं सारखं मुलांशी जाऊन बोलणं? आणि मग संपीला जाणवलं, आपण कन्फ्युझ्ड आहोत. दिशाचं वागणं बरोबर की चूक तिला ठरवता येत नव्हतं. ती ज्या गावात, वातावरणात वाढली होती, तिथे ते फारसं काय अजिबातच ‘चांगलं’ वगैरे समजलं जात नव्हतं. त्यामुळे तिचेही विचार तसेच झालेले.पण मग दुसरं मन म्हणत होतं, की दिशा तर तशी चांगली आहे. ती वाईट असं काही बोलत-वागत नाही आपल्याशी. संपीला कळेना. एकीकडे इतर मैत्रीणी आणि एकीकडे दिशा. संपी नकळत हळू-हळू दिशाशी जितक्यास तितकं वागू लागली एवढं मात्र खरं.
त्यादिवशी केमिस्ट्रीचं प्रॅक्टिकल बऱ्यापैकी लांबल्यामुळे संपीला घरी यायला जरासा उशीरच झाला. संपीचं एकंदर राहणीमान बऱ्यापैकी गबाळंच. केस कधी तेलात माखून चापुन-चोपुन बसवलेले तर कधी एकदम विस्फारलेले. कपडे म्हणजे एखादा पंजाबी ड्रेस अन् त्यावर लटकवलेली ओढणी. ती सायकलच्या चाकात किंवा बॅगच्या चेनमध्ये अडकण्यासाठीच घेतलेली असायची. दिवसभराचं काॅलेज करुन बऱ्यापैकी थकुन अशाच काहीशा अवतारात ती घरी आली. दाराबाहेर थोड्या नव्या चपला पाहून थबकली आणि कोण आलंय? म्हणत घरात गेली. तिची मोठी आत्या आणि तिच्यापेक्षा एखाद दोन वर्षांनी मोठी आत्येबहीण घरी आले होते. ही आत्या काही संपीला फारशी आवडायची नाही. एकतर ती उगाच जाता-येता संपीच्या आईला टोमणे मारायची. आणि दुसरं म्हणजे स्वत:च्या लेकीचं इतकं कौतुक करायची, इतकं कौतुक करायची की संपीला नुसतं कानकोंडं व्हायला व्हायचं.
जराशा पडलेल्या चेहऱ्यानेच संपीने नमस्कार-चमत्कार केला. बारावीचं वर्ष म्हणून जरासं कौतुक आणि बरेचसे सल्लेही मग तिच्या वाटेला आले. त्यात, ‘ते कार्टून्स बघणं बंद झालं की नाही गं सीमा हीचं अजून?’ वगैरे खोचक टोमणेही होतेच.
रात्री जेवायला बसताना, ‘मी किती कामं करते’ हे दाखवण्यासाठी आतूर आतेबहिणी सोबत जरासं नाईलाजानेच संपीलाही पानं वाढायला उठावं लागलं. कामं आणि संपी यांचा तसा दुरान्वयेही संबंध नसल्याने संपीने तिच्या वेंधळेपणाला साजेसं वाढायला सुरूवात केली. आणि तेवढ्यात त्या आतेबहिणीच्या किंकाळी सदृश उद्गाराने थबकली.
‘संपे, अगं मीठ तिथे नसतं वाढायचं.
आणि हे काय कोशिंबीर अशी मधोमध वाढतं का कोणी?’
संपी प्रचंड गोंधळ चेहऱ्यावर घेऊन तशीच ऊभी राहिली. तिच्या हातातलं वाढण मग स्वत:कडे घेत ती बहीण मग हसत म्हणाली,
‘काय संपे, तुला साधं वाढायला पण येत नाही!’
संपीची आत्या कौतुक ओसंडून वाहणाऱ्या चेहऱ्याने लेकीकडे पाहत म्हणाली,
‘सग्गळं माहितीये हो माझ्या मिनूला!’
आणि संपीकडे एक तुच्छतामिश्रीत कटाक्ष टाकून जेवायला बसली.
असं काही झालं की संपीला राग यायचा खरा. पण म्हणून या कशाचा स्वत:वर फारसा परिणाम ती होऊ द्यायची नाही.
जेवणं उरकल्यावर त्या सगळ्यांच्या टिपिकल गप्पांकडे पाठ फिरवत ती सरळ पुन्हा कार्टुन्स बघत बसली..
6
चार-पाच उघडी, जमिनीवर
पसरलेली पुस्तकं, रायटींग
पॅड, वह्या, पेनं..इ.इ. अस्ताव्यस्त पसरून संपी त्या
सगळ्याच्या मधोमध पालथी पडून ‘अभ्यास’ करत होती. तिच्यासाठी दूध घेऊन आलेली
आई तिच्या त्या पसार्याकडे पाहून जराशा नारजीनेच म्हणाली,
“संपे, अगं
किती गं हा पसारा?”
संपी टेस्ट पेपर सोडवत होती. CET चे चार पर्याय असणारे objective प्रश्न! बाजूला घड्याळ ठेवलेलं. समोर
प्रश्नपत्रिका. हातात पेन. साइड ला rough work साठी कोरा पेपर. असा सगळा setup. प्रश्न वाचला की संपीला सगळे पर्याय
सारखेच वाटायला लागायचे. मग ती तिच्या बुद्धीला बराच ताण द्यायची. ‘कुठेतरी वाचलंय पण नीट आठवत नाहीये’ किंवा ‘अरेच्चा हे काल सर शिकवत होते, पण मी पेन्सिल शार्प करून नवीन
वह्यांवर ‘श्री’ टाकत बसले. लक्ष द्यायला हवं होतं
काय?’ किंवा ‘छे, हा प्रश्न स्कीप. हा चॅप्टर अजून वाचलाच नाही ना
आपण’ वगैरे वगैरे commentary तिची मनातल्या मनात सुरू होती.
घड्याळ पुढे सरकू लागलेलं. तिची चिडचिड सुरू होती मनातल्या मनात. तेवढ्यात आईचं ते
वाक्य ऐकून ती चरफडलीच आणि
“डिस्टर्ब करू नको गं आई, आवरते मी नंतर!” असं म्हणून दूध प्यायला लागली.
दूध पिऊन झाल्यावर ‘अरेच्चा आपली दहा (?) मिनिटं वायाच गेली की आईमुळे’ म्हणत तिने पेपरसाठीची वेळ पंधरा (!) मिनिटांनी
मनातल्या मनात वाढवून घेतली.
त्या प्रश्नपत्रिका संचाच्या मागच्या पानांवर उत्तरंही होती, उलटी टाइप केलेली. एखादं उत्तर
50-60% बरोबर आहे असं तिला वाटू लागलं की ती हळूच संच उलटा करून मागचं पान काढून
अर्धवट मिटल्या डोळ्यांनी उत्तर पाहून घ्यायची आणि ‘मग बरोबरचे माझं’ असं म्हणत त्या पर्यायासमोर गोल करायची. प्रश्न
पुढे जाऊ लागले तस-तसं तिची ही संचासोबतची योगासनं वाढायलाचं लागली.. तिथून ये-जा
करणारी आई ते पाहून शेवटी म्हणाली,
“त्यापेक्षा एकदाच काय ते बघून का घेत नाहीस. ही कसरत तरी वाचेल.”
डोळे बारीक करून संपीने तिच्याकडे पाहिलं. आणि पुन्हा आपलं ‘प्रश्न सोडवण’ चालूच ठेवलं.
मग केव्हातरी ‘पाणी
पिण्यासाठीची पाच मिनिटं’, ‘बेल
वाजली म्हणून दोन मिनिटं’, ‘लहान
बहीण शिंकली म्हणून चार मिनिटं’ अशी बेरीज करत करत दोन तासांचा तो पेपर संपीने तीन तासात पूर्ण (?) केला एकदाचा. आणि मग जाऊदे यावेळी
नकोच मोजायला मार्क, पुढच्यावेळी ‘सिरियसली’ सोडवू असं म्हणत ‘किती दिवे लावले’ ते न पाहताच तिने तिचा पसारा आवरला.
आणि मग आपण जणू काही गडच सर केलाय अशा आविर्भावात लगेच येऊन तिने
टीव्ही लावला. ‘आई
काहीतरी खायला दे गं!’ अशी
आरोळी ठोकत टीव्ही समोर आडवीही झाली. तिच्याकडे पाहत तिचे आजोबा म्हणाले,
“संपे, दहावी
सारखं बारावीत पण चांगले टक्के मिळवायचे बरं!”
टीव्ही वरची नजर हटू न देता संपी उत्तरली,
“आप्पा अहो, बारावीत
बोर्डाचं नसतं काही एवढं. ग्रुपिंग पुरते मिळाले तरी खूप झाले. सीईटी चा स्कोर
इम्पॉर्टंट असतो फक्त.”
आप्पांच्या पचणी काही हे पडलं नाही.
“अगं पण विषय सारखेच आहेत ना..”
“हो आप्पा, पण
अभ्यासाची टेक्निक वेगळी असते हो..”
“टेक्निक?” आप्पा
विचारात पडले.
“हो मग.. बोर्डाचं कसं, उत्तरं पाठ करावी लागतात तिथे. सीईटी चं तसं नाही, कन्सेप्ट क्लियर असाव्या लागतात, फोर्म्युले पाठ, आणि भरपूर एमसीक्यू सोडवावे लागतात..
सोपं नाही आप्पा ते.. फार अभ्यास करावा लागतो!!”
“असं होय.. असेल असेल.. मग तुझ्या झाल्यात वाटतं concepts क्लियर. टीव्ही पाहत बसलीस ती..”
अप्पा तिरकसपणे म्हणाले.
टीव्ही वरची नजर वळवून संपीने मग त्यांच्याकडे पाहिलं. आणि मग ठसक्यात
म्हणाली,
“ब्रेक चालूये माझा! आत्ताच एक मोठ्ठी प्रश्नपत्रिका सोडवलीये मी.”
“हो का! किती झालाय मग ‘स्कोर’ का काय
तो?” इति अप्पा.
नावडीचा प्रश्न ऐकून टिव्हीवर नजर खिळवून संपी मग तोंडातल्या तोंडात
पुटपुटली,
“मोजायचेत अजून”
‘मैत्रिणीकडे अभ्यासाला जाणे’ हा एक संपीच्या आवडीचा प्रकार होता. आठवड्यातून
एक-दोनदा तो केल्याशिवाय तिचं अभ्यासू मन भरायचंच नाही. तिथे जाऊन मग आधी थोडा
पोटोबा, मग थोड्या
चकाट्या पिटणे (शुद्ध भाषेत गावगप्पा मारणे) मग केला तर थोडाफार अभ्यास करणे असा
सगळा क्रम असायचा. एकदा तर अशी अभ्यासाला म्हणून जाऊन संपी, मधुच्या मांजरीसोबत दोन तास खेळून
आली होती चक्क. कधी झाडं लाव, फुलं
तोड असे प्रकार. अभ्यास वाढू लागला तसं-तसं तर तिला या बाकीच्या गोष्टींमध्ये जरा
जास्तच रस वाटू लागला. नंतर नंतर तर आईला कामात मदत करणं पण तिला कधी नव्हे ते खूप
इंट्रेस्टिंग वाटायला लागलं.
कॉलेज मधलं वातावरण पण आता बर्यापैकी सीरियस झालेलं होतं. ‘आपल्या नोट्स शेअर न करणे’, ‘कोणती पुस्तकं वाचतो ते कोणालाही न
सांगणे’, ‘माझा
अजिबात अभ्यास झालेला नाही असं उगाच दर्शवत राहणे’ इ.इ. न बोलले जाणारे, अलिखित ‘अभ्यासू’ नियम कमी-जास्त प्रमाणात सारेच अवलंबत होते.
परीक्षा जस-जशा जवळ येऊ लागतात तस-तसा ‘गेस’ नावाचा प्रकार डोकं वर काढायला लागतो. ‘गेस’ म्हणजे कॉलेज मधल्या किंवा क्लास वाल्या
प्राध्यापकांनी अपार मेहनत आणि अभ्यास करून तयार केलेले, आगामी परीक्षेत येऊ शकतील असे ‘संभावित’ प्रश्न! हा गेस रॉच्या कारवायांना लाजवेल इतका
जास्त classified असतो
बरंका. ज्या-त्या क्लास पुरता तो मर्यादित असतो. मग या सरांनी काय गेस दिला, त्या सरांनी कोणते प्रश्न दिले इ.इ.
शोधमोहिमा ज्याच्या-त्याच्या व्यवक्तिक पातळीवर सुरू होतात. आता काहींना हे
बहुमूल्य गेस मिळवण्यात यश मिळतं, काहींना नाही. 'contacts' याकामी फार महत्वाचे ठरतात. वर्षभर टवाळक्या करणार्या
विद्यार्थ्यांना या काळात भलतंच महत्व येतं. कारण ते आता याच मिशन वर असतात.
संपी तशी सगळ्यांच्या मर्जीतली असल्याने आणि सगळ्यांशी तिचं चांगलं
जमत असल्याने असे एक-दोन गेस न मागता तिच्याही वाटेला आले होते. खरंतर ती या कशावर
विश्वास ठेवायची नाही. पण मग आता मिळालेयत तर बघायला काय हरकत असा व्यवहारी विचार
करून तिनेही ते चाळले झालं.
हा हा म्हणता संपीची परीक्षा आता चक्क दीड महिन्यांवर येऊन ठेपली आणि
तिच्यासकट घरातल्या सार्यांचीच लगबग वाढायला लागली..
7
‘डोक्यावर वगैरे पडलीयेस का नमे? काय चाललंय हे सकाळपासून?’
बर्याच वेळापासून चित्र-विचित्र पद्धतीने शरीर वेडंवाकडं करत
बसलेल्या लहान बहिणीकडे पाहून संपी म्हणाली.
‘ए संपे तू जा गं. अभ्यास कर जा. तुला नाही कळणार यातलं काही!’
‘ए दीडशहाणे, ताई
म्हण आधी तू. बारावीत आहे आता मी. कळलं का?’ संपी तोर्यात म्हणाली.
‘काय सांगतेस! बारावीत? हाहा.’ नमू.
‘हो! हे काय
नवीन खूळ ते तरी सांग.’
‘खूळ नाही. मी दंड घालतेय. आमच्या पीटी च्या नवीन आलेल्या सरांनी
शिकवलंय आम्हाला.. बघ मी किती भारी घालतेय.’
समोरच्या दोन हातांवर वजन दिल्याचा आव आणत नमी नुसतेच पाय अन पाठ हलवत
होती. अन आविर्भाव तर काय अगदी पट्टीच्या मल्लासारखा.
‘दंड? हाहा.
चालूदे चालूदे.’ म्हणत
संपी आत निघून गेली.
इकडे आपली ‘कसरत’ क्षणासाठी थांबवून नमिने आईला हाक मारली,
‘आई, आजपासून
मी पेल्यातून नाही मोठ्या ग्लासातून दूध पिणार!’
आई हात पुसत बाहेर आली आणि लेकीच्या अवताराकडे पाहून काहीतरी बोलायला
ती तोंड उघडणार इतक्यात, तिला
आतून संपीची हाक कानांवर आली,
‘आई, बदाम.’
आणि ‘अरेच्चा! संपी उठली होय!’ म्हणत तिची आई तशीच मागे फिरून
स्वयंपाकघरात गेली. रात्रीच भिजवून ठेवलेले बदाम पाणी काढून टाकून ती संपीला
द्यायला धावली. संपीचं बारावीचं वर्ष नाही का!
नमि भलतीच चिडली. आणि बैठकीत थांबून जोरात ओरडली,
‘या घरात ‘मी’ पण राहते. माझ्याकडे कोणाचं लक्ष आहे
का?’
पण सकाळच्या त्या अत्यंत गडबडीच्या वेळेत कोणीच तिच्याकडे लक्ष दिलं
नाही. ती अजूनच फुगली. नमी पाचवीत होती. तिच्यात आणि संपीमध्ये तसं बरंच अंतर.
इतके दिवस घरातलं शेंडेफळ म्हणून आणि एकूणच संपीपेक्षा जरा जास्त चपळ, हुशार आणि चतुर म्हणून तिचं
कोड-कौतुक थोडं जास्तच झालेलं. पण, संपीची दहावी झाल्यापासून आणि तिला चांगले मार्क मिळाल्यापासून
नमीकडचं सगळ्यांचं लक्ष संपीकडे वळलं होतं. त्यामुळे नमिला एकदम खूप एकटं-एकटं
वाटायला लागलं.
‘जळली मेली बारावी! बारावीत असलं म्हणून काय झालं. मी पण आता ‘पाचवीत’ आहे. माझं आहे का कोणाला कौतुक!’ ती एकटीच चरफडली.
‘नसायला काय झालं? कोणी
दुर्लक्ष केलं तुझ्याकडे?’ हातात
भजीची पिशवी घेऊन चपला काढून आत येणारे आप्पा म्हणाले.
आणि मग बरोब्बर वेळेवर डोळ्यांतून पाणी काढण्याचं जे एक जगावेगळं
कौशल्य जगातल्या सगळ्या शेंडेफळांच्या ठायी असतं, तेच नमिनेही वापरलं. कधी नव्हे इतक्या तीव्रतेने
तिच्या गळ्यात आवंढा दाटला आणि डोळ्यात पाणी आलं. आणि मग आप्पांना जाऊन बिलगत ती
म्हणाली,
‘या घरात माझी कोणाला किम्मतच नाही हो अप्पा. सगळं कौतुक त्या संपीचं!’
बॅग सांभाळत दाराशी येऊन पायात चपला चढवणार्या संपीने मग कॉलेजला
जाता जाता हळूच आगीत तेल ओतलं,
‘हो. नमे तुला बोहारणीकडून घेतलंय अगं जुने कपडे देऊन. म्हणून!’
यावर तिला जीभ दाखवत, पुन्हा आप्पांना बिलगत नमिने हंबरडा फोडला, ‘अप्पा’
आप्पांनी मग तिच्या ‘दंडांची’ जराशी
चौकशी करून तिची नाराजी थोडीफार घालवली॰
इकडे संपीची तयारी आता युद्धपातळीवर सुरू होती. आता फक्त अभ्यास एके अभ्यास, तिने ठरवलंच होतं. त्यादिवशी
कॉलेजमधून घरी येताना वाटेत तिला दिशा आणि शिर्के बोलत थांबलेले दिसले. तिने
जवळपास डोळे मिटूनच घेतले. ओळख न दाखवताच पुढे जायचं असं ठरवून इकडे तिकडे पाहत ती
तिथून जाऊ लागली. पण तेवढ्यात दिशाचं लक्ष तिच्याकडे गेलं आणि तिने ‘संपदा..’ अशी जोरात हाक मारली. नाईलाजाने संपीला थांबावं
लागलं. दिशा तिच्यापाशी आली,
‘संपदा, अगं
काय बोलतच नाहीस तू आजकाल.’
‘असं काही नाही. अगं परीक्षा जवळ आलीये ना आता म्हणून.’
‘अच्छा. काय म्हणतोय मग अभ्यास?’ दिशाने विचारलं.
‘काही नाही. सुरू आहे.’ त्या शिर्के कडे न बघता ती जितक्यास तितकी उत्तरे देऊ लागली.
‘तुझं काय? तू
काय करतेयस इथे. आज वर्गात दिसली नाहीस.’ संपीने दिशाला विचारलं.
ती काही बोलणार इतक्यात समोरच्या दवाखान्यातून एक मध्यमवयीन बाई बाहेर
आली आणि ती शिर्के आणि दिशा दोघांना पाहून म्हणाली,
‘आता बरी आहे शकू. तुम्ही जा पोरांनो कॉलेजला जायचं असेल तर. दिशा, बेटा थॅंक यू बरंका!’
संपीला काही समजेना. दिशाशी बोलल्यावर तिला समजलं, शिर्केच्या आईला कॅन्सर झालाय.
त्याला वडीलही नाहीत. त्यामुळे तो आणि आई दोघेच राहतात. तिचं हॉस्टेल त्याच्या
घराशेजारीच असल्याने दिशाने त्याच्या आईकडे पूर्वी जेवणाचा डबा लावला होता. आणि
त्यामुळे त्यांची जास्त ओळख झाली. पुढे आजारपण वाढत गेलं तसं त्यांना डबा बंद
करावा लागला होता. पण दिशा त्यांच्याकडे येत-जात राहायची. आज सकाळी अशीच ती तिकडे
गेली असता शिर्केची आई बेशुद्ध असलेली तिला दिसली मग तिने आजूबाजूच्या लोकांच्या
मदतीने त्यांना दवाखान्यात आणलं वगैरे. शिर्के नंतर आला. मग त्याने त्याच्या
मावशीला बोलावून घेतलं. ती आत्ता आतून बाहेर आलेली बाई म्हणजे त्याची मावशीच होती.
सगळा प्रकार ऐकून संपी चाटच पडली. मग क्षणभरासाठी आपल्या विचारांची
तिला लाज वाटली. पण, ती
दिशाला तसं काही बोलली नाही. घरी येताना पूर्णवेळ तिच्या डोक्यात तेच विचार घोळत
राहिले. इतरांसारखा आपण पण किती वाईट विचार करत होतो दिशा बद्दल. तिला खूप वाईट
वाटायला लागलं. तिने तिच्या मनाशी त्या दिवशी दोन खूणगाठी बांधल्या, एक म्हणजे इतरांच्या मतांवरून कोणाला
जज करायचं नाही आणि दुसरं, मुलांशी
बोलणार्या सगळ्याच मुली काही वाईट नसतात!
संपी घरी आली. पाहते तर दारात नमि हाताची घडी घालून तिच्याकडे पाहत
ऐटीत उभी. संपीने विचारलं,
‘काय बरंय ना सगळं?’
नमिने मानेला एक झटका दिला. आणि ठसक्यात न्यूज लेटर वाचून दाखवावं तसं
म्हणाली,
‘बोहारणी कडून नाही घेतलं मला. कळलं का? आईने मला माझे बाळ असतानाचे फोटो दाखवले. हम्म.
आणि मी तुझ्यापेक्षा जास्त छान दिसत होते लहानपणी बरंका. आणि आज आईने ‘माझ्यासाठी’ खास बेसनाचे लाडूही बनवलेत. आणि बाबा
मला नवीन स्कूलबॅग घेऊन देणारेत माझी पाचवी आहे म्हणून. तुला ठेंगा!’
यावर जिभेने तिला वेडावत ‘हो का!’ म्हणत संपी घरात आली.
ती आल्या आल्या संपीची आई म्हणाली,
‘आलीस का? ये.
हात-पाय धुवून घे. छान लाडू आणि ताजा चिवडा देते तुला. अभ्यासाने वाळून गेलीये
माझी पोर नुसती.’
यावर नमिचा इतकावेळ दात काढणारा चेहरा पुन्हा पडला.
पण मग ते लाडू आणि तो चिवडा फस्त करत टॉम अँड जेरी पाहताना दोघी सारं
विसरून गळ्यात गळे घालून केव्हा खिदळायला लागल्या त्यांचं त्यांनाही समजलं नाही!
8
ऐ आई, मला पावसात
जाऊदे..
एकदाच गं भिजूनी मला,
चिंब चिंब होऊदे..
ऐ आई..
.....
ढग पावसाने भिजले
मन निथळत हलके झाले..
......
आईने माझ्यासाठी ड्रेस आणले आज. मला एकही आवडला नाही. शी तसे कोण
घालतं का आता? मी
म्हटलं तर, गप्प
बस टिकाऊ आहेत आणि अंगभरुन आहेत, तुला काही कळत नाही असंही म्हणाली. मला कधी ‘कळायला’ लागणारे काय माहित. आईचं बरोबर असतं का? मागच्या उन्हाळ्यात तिने घेतलेले
कपडे अजून छान आहेत. मधुला तर किती आवडले. मला का नाही आवडत? मी यातलं काही न बोलता गप्प बसते
मात्र.
......
अबोलीला खूप फुलं लागलीयेत. आई त्यांचा गजरा बनवते. आज मी पण बसले
बनवायला. एकात एक गाठी नुसत्या. काहीच जमलं नाही. फुलं खराब केली म्हणून आई ओरडली
ते वेगळंच. शेजारच्या काकू फिदीफिदी हसू लागल्या. त्यांच्या त्या पूजाला येतं. मला
नाही येत.
......
निकाल लागला आज. मला चक्क 89.09%?? वाटलं नव्हतं. वर्गातल्या हुशार मुळा-मुलींकडे
पाहून वाटायचं आपल्याला कधी जमणार इतकं? अभ्यास करत गेले पण. मागच्या वर्षीपेक्षा थोडा
जास्त केला. निबंधा सकट सगळं ‘पाठ’ केलं होतं. ‘हुशार’ असणं म्हणजे हेच का? पण आतून असं वाटत नाही. ते काहीतरी वेगळं असलं
पाहिजे. मला सगळे वेंधळी म्हणतात. पण आज खूप कौतुक झालं. सगळ्यांनी केलं. शाळेत
अवचट पहिला आलाय. तो पण ‘पाठ’ करत असेल का सगळं? वाटत नाही त्याच्याकडे बघून. पण तो ‘हुशार’ वाटतो का कोणास ठावूक. नेहा म्हणे, राणे आणि शिल्पाचं ‘सुरूये’. एका दिवशी शिल्पाने मला शाळेत उशिरा थांबवून
घेतलं होतं खरं, भूमिती
समजावून सांग म्हणून. त्यादिवशी राणे पण थांबला होता. मी तिला वर्तुळ कसं काढायचं
शिकवत होते आणि ती त्याच्याशी बोलत होती खुणेने. आत्ता कळतंय मला. मला काहीच कसं
कळत नाही लवकर? जाऊदे.
आता मला इंजीनियर व्हायचय. आणि मग पैसे कामवायचेत. मग मी मला हवे तसे ड्रेस घेईन.
.......
कॉलेज सुरू झालं. आता डायरी वगैरे सगळं बंद. फक्त अभ्यास.
.......
डिक्शनरी घेतली आज सायन्स ची. किती ते इंग्लिश. अकरावी अवघडच जाते
म्हणे सगळ्यांना. फिज़िक्स उघडलं की वाटतं केमिस्ट्रि सोपं आहे, केमिस्ट्रि उघडलं की मॅथ्स बरं
वाटायला लागतं. हळू हळू सवय होईल म्हणाली मधु. पाहू. खूप नवीन मुली पण आहेत
वर्गात. आता जमायला लागलंय सगळ्यांशी थोडं-थोडं. काही इंग्लिश मिडियमच्या पण आहेत.
त्या फार पुढे-पुढे करतात. सगळे एकमेकांना म्हणत होते म्हणून मीही काल ‘हॅप्पी ख्रिसमस’ म्हटलं तर ती मेघा काल ‘लाइकवाइज’ म्हणाली. मला समजलंचं नाही. दुसरंच
काहीतरी म्हंतेय असं समजून मी वेड्यासारखं ‘म्हणजे?’ म्हणाले. तर, ‘हिला एवढंही माहित नाही!’ असा लुक दिला तिने मला. आणि मग
त्यांच्या त्या इंग्लिश मिडियम ग्रुपमध्ये जाऊन हसत बसली. म्हणजे हे मला तेव्हा
काही कळलंच नाही. नंतर मधुने सांगितलं. खरंच मधु नसती तर काय झालं असतं माझं. ती
नवीन आलेली दिशा मात्र छान बोलते. हो पण ती मुलांशी बोलते बाबा सरळ जाऊन.
.......
माझी फीस वाढत चाललीये. आई थोडी जास्त काटकसर करायला लागलीये.
.......
आज गम्मतच झाली. परीक्षा होती. अकरावी तर आहे म्हणून सगळे तसे लूज. मी
पण कै फार अभ्यास केला नव्हता. मधुशी गप्पा मारून मी माझ्या परीक्षा हॉल मध्ये
गेले. पूर्ण वर्गभर चार फेर्या मारल्या तरी माझा नंबर सापडेना. सगळे पाहू लागले.
शेवटी मग मागून दूसरा बेंच माझा वाटला. जाऊन बसले. सगळं सामान काढून ठेवलं. पेन, पेन्सिल, पाण्याची बाटली, घड्याळ, खोडरबर सगळं. आणि बसले पलिकडच्या मेघाला हाय करत.
तर ती म्हणे ‘मागे
बघ’. बघितलं तर बेंच
शेजारी अवचट उभा. गोंधळून. मलाही कळेना असा का थांबलाय. तो पुन्हा पुन्हा
माझ्याकडे पाहू लागला. आता मला कसंतरीच वाटायला लागलं. पण मी गप्प. शेवटी तो
म्हणाला,
‘हा माझा बेंच आहे. हे बघ माझा नंबर’
मी पाहिला. त्याचाच होता. आता झाली का पंचाईत. सगळे आमच्याकडे पाहत
होते. मी आणि माझा वेंधळेपणा. मग पसरलेलं सगळं साहित्य पुन्हा गोळा केलं. त्या
गोंधळात ते नीट गोळाही होईना. पेन्सिल आणि रबर खाली पडलं. उचलायला वाकले. ते
पुढच्या मुलाच्या पायांशी गेलेलं. आता काय करावं! पुन्हा माझा वेडपट वेंधळेपणा.
अवचटनेच शेवटी ते मला दिलं. मग माझा तो सगळा पसारा घेऊन पुन्हा वर्गभर फिरून अगदी
दाराशीच असलेल्या माझ्या बेंच वर जाऊन बसले. जाताना सगळे माझ्याकडे पाहत हसत होते.
मी पण हसून घेतलं. आता काय करणार!
......
बारावी सुरू झालीये. खूप अभ्यास आहे. प्रॅक्टिकल, थ्यरी.. वेळ पुरत नाही. घरी आले की
थकलेली असते. मग टीव्ही पाहावा वाटतो. अभ्यास होतचं नाही. अजून अख्खं वर्ष आहे
तसं. एकजण म्हणाली असंही आत्तापसून केला तर परीक्षेच्या वेळपर्यंत विसरून जातं.
दिवाळीनंतर खरा अभ्यास सुरू करायचा. पाहू.
सगळे फारच अभ्यास कर अभ्यास कर म्हणतायत बाबा आता. माझी चिडचिड होते
जाम. म्हणजे मला कळतच नाही असं वाटतं का यांना.
आज आत्या आलीये. अरे काय फरक पडतो कुठे मीठ आणि कुठे भाजी याने. जाणार
तर सगळं पोटातचं आहे ना. किती ते अवडंबर. बरं नीट समजावत पण नाहीत. उगाच उणी-दुणी
काढायची. ह्या. मी नसते किम्मत देत. टॉम अँड जेरी खूप चांगलं तिच्यापेक्षा.
......
बापरे. आता सीरियस झालं पाहिजे. परीक्षा जवळ येऊ लागलीये. Cet चा स्कोर चांगला यायला हवा. नाहीतर
नाही मिळणार इंजीनीरिंगला अॅडमिशन.
घरी होतच नाही पण अभ्यास. ही नमि नुसती मध्ये-मध्ये करते. मधुकडेच
जाते मी अभ्यासाला.
......
दिशविषयी किती गैरसमज करून घेतला मी. ती चांगलीये यार खूप. आणि बिचारा
शिर्के. कसा अभ्यास करत असेल. मला काही कमी नाही तरी मी टंगळ-मंगळ करते. नाही. आता
एकदम सीरियस. खूप म्हणजे खूपच अभ्यास. परीक्षा पंधरा दिवसांवर आलीये. डायरीला
टाटा.
......
9
परीक्षा जवळ येऊ लागली तशी संपी कधी नव्हे इतकी सीरियस झाली. दिवसा तर
करायचीच. पण रात्रीही एक.. दोन.. तीन.. वाजेपर्यंत ती पुस्तकात तोंड खुपसून
बसायची. मध्येच पेंगायची पण ‘कमी
मार्क पडले’, ‘ग्रुपिंग
झालं नाही’, ‘इंजीनीरिंग
ला अॅडमिशन मिळेना’ असली
भयानक स्वप्नं पडून पुन्हा खडबडून जागी होऊन अभ्यासाला लागायची. बोर्डाची परीक्षा, ‘पाठ’ करण्यात तिचा हातखंडा असल्याने सुरळीत पार पडली.
आणि सीईटी पर्यन्तचे पुढचे दोन महिने क्लास, क्रॅश कोर्स, कॉलेज मधले वेगळे वर्ग यामध्ये भुरर्कन उडून
गेले. आता ती थोडीफार सुकलीही होती. मागची दोन वर्षं सतत कॉलेज, अभ्यास आणि टेंशन. आता तिच्या
स्वप्नात सुद्धा चार गोल पर्याय असलेली सीईटी ची उत्तरपत्रिका यायला लागली. ती ते
गोल काळ्या पेनाने भरतेय आणि मध्येच तिच्या पेनातली शाई संपते असंही ‘भयानक’ स्वप्न तिला अधून-मधून पडायचं. त्यामुळे एकवेळ
अभ्यास राहिला तर चालेल पण पेन तयार हवं म्हणून तिने चार-चार काळी पेनं पंधरा दिवस
आधीपासूनच घेऊन ठेवली होती.
परीक्षा जवळ येऊ लागली तसं घरातलं वातावरण अधिकाधिक डेडली व्हायला
लागलं. नमिला तिची परीक्षा झाल्या-झाल्याच मावशीकडे पाठवून दिलेलं होतं. आता घरात
फक्त संपी आणि तिचा अभ्यास असं चित्र. बाकी आई-बाबा आणि आप्पा तिची बडदास्त
ठेवण्यात गुंग.
आणि एकदाचा मागची दोन वर्षं ज्या दिवसाच्या ‘तयारीत’ घालवली होती, तो दिवस उगवला. संपी आणि तिचे बाबा केंद्रावर
जाण्याच्या तयारीत. संपीची आई, ‘संपे, वेंधळेपणा
करू नको. प्रश्न नीट वाचून मगच उत्तरापुढे गोल कर’ वगैरे सूचना देत होती. तिला ‘हो, हो’ म्हणत ओढणी सांभाळत संपी एकदाची बाहेर पडली. परीक्षा केंद्रावर आली.
कधी नव्हे ते अजिबात वेंधळेपणा न करता तिला तिचा बेंचही सापडला. आधी ‘स्वप्नात कायम दिसलेली’ उत्तरपत्रिका एकदाची समोर आली. तिने
अतिशय लक्ष देऊन वगैरे त्यावर डिटेल्स भरायला सुरुवात केली. तिचा नंबर तिने
प्रत्येक लेटर दहावेळा क्रॉस चेक करून त्यावर टाकला. आणि प्रश्नपत्रिकेची वाट पाहत
बसली.
प्रश्नपत्रिका हातात येऊन, एकामागून एक प्रश्न वाचणे, सोडवणे, उत्तर गोल करणे या सगळ्यात पुढचे दोन तास कधी
संपले तिचं तिलाही समजलं नाही. वेळ संपल्यावर सर येऊन हातातून उत्तरपत्रिका
हिसकावून घेईपर्यन्त तिचं उत्तरं गोल करणं चालूच होतं. सरांनी हातातून
उत्तरपत्रिका घेतली तेव्हाही ती शेवटच्या प्रश्नाचं उत्तर गोल करत होती. पण, सरांच्या हातात गेल्यावरही तिने ते
गोल केलंच. आणि मगच सुस्कारा सोडला.
परीक्षा संपली. संपीला एकदम फार भारी वाटायला लागलं. तिला सगळेच
प्रश्न आपण बरोबर सोडवले असं वाटत होतं. पण नंतर घरी आल्यावर, मैत्रिणींशी बोलल्यावर बरोबर वाटणार्या
प्रश्नांचा आकडा कमी-कमीच व्हायला लागला. नंतर मग तिने ‘जाऊदे जे व्हायचं ते होईल’ म्हणत तो विषयच डोक्यातून काढून
टाकला. आणि सरळ टीव्ही, आंबे
आणि झोप या सुखत्रयीच्या स्वाधीन स्वत:ला करून टाकलं आणि थेट निकाल लागेपर्यंत
त्यात अजिबात खंड पडू दिला नाही.
निकालाच्या दिवशी संपी अस्वस्थ होती. पोटात घोळे वगैरे येत होते.
बोर्डाचा निकाल एव्हाना येऊन गेलेला. त्यात तिने 80 चा टप्पा गाठला होता. पण सगळी
मदार सीईटीच्या निकालावर होती आणि तो आज लागणार होता. दहावीच्या निकालाच्या वेळेस
ती जशी निवांत होती तशी यावेळेस दिसली नाही. थोडीफार सीरियस वाटत होती. ‘पुण्यात इंजीनीरिंग ला अॅडमिशन
मिळवणे’ म्हणजे गाभार्यात
जाऊन विठ्ठलाचं दर्शन मिळवण्याइतपत कमाल गोष्ट आहे असा तिचा आता पुरता समज झालेला
होता. त्यामुळे ते हवं असेल तर तेवढे मार्कही हवेत हे आपसूक आलंच. आणि त्यातल्या
त्यात चांगल्या आणि कमी फीस असलेल्या कॉलेजला मिळवायचं म्हणजे तर अजूनच जास्त
हवेत. तिची धाकधूक शिगेला पोचली. पण तरी निकाल पहायला ती गेलीच नाही. तिचे बाबाच
जाऊन तो पाहून आले.
ते घरी आले तेव्हा संपी, तिची आई, अप्पा
सारेच बैठकीत बसलेले. संपीने चपला काढून आत येणार्या बाबांकडे पाहिलं. पण
त्यांच्या चेहर्यावरून काही समजत नव्हतं. ते आत आले. बसले. संपीकडे पाहिलं. आणि
जरासं शांतपणेच पण हसत तिला म्हणाले,
‘मग संपे, लागा
आता तयारीला. पुण्याला जाणार तू..’
संपी जागची उडालीच. तिने लगेच ती मार्कशीट पाहिली. स्कोर होता 140.
आणि मग आनंदाने एकदम फुललेला तिचा चेहरा क्षणभरासाठी पडला. 140 म्हणजे प्रायवेट
कॉलेज मिळणार हे ती कळून चुकली. आणि एवढा खर्च आपल्याला झेपेल का या विचाराने
गप्पच बसली. पण तिच्या पडलेल्या चेहर्याकडे पाहून तिचे बाबा म्हणाले,
‘संपे. काही काळजी करू नकोस. कमी नाहीयेत मार्क. मिळेल अॅडमिशन. सकाळी
आणून ठेवलेले पेढे घेऊन ये जा. पळ..’
आता संपीच्या डोळ्यांत पाणी तरळलं. तिने धावत जाऊन बाबांना एक घट्ट
मिठी मारली.
यथावकाश, पहिला
राऊंड, दूसरा राऊंड
करत संपीचा नंबर पुण्यातल्या एका चांगल्या गर्ल्स इंजीनीरिंग कॉलेजला लागला.
त्यादिवशी रात्री आई-बाबांचं बोलणं तिच्या कानांवर पडलं. आई म्हणत
होती,
‘काटकसर आता अजून वाढवावी लागेल. पुण्यात इंजीनीरिंग म्हणजे खायची
गोष्ट नाही.’
‘हम्म. खरं आहे. होईल सगळं ठीक. तू काही काळजी करू नको.’
‘नाही हो काळजी नाही. संपीचं भलं होतंय. आनंदच आहे मला.’
संपीला आपले खांदे आता अचानक जड वाटायला लागले. जबाबदारीची एक प्रचंड
जाणीव झाली.
ती जाणीव सोबत घेऊनच ती आता पुण्याला जाण्याच्या तयारीला लागली.
मैत्रिणींना भेटणं, कोणाला किती पडले, कोणाचं अॅडमिशन कुठे झालं इ.इ. हेही सुरूच होतं. मधुला दुसर्याच एका
शहरातलं कॉलेज मिळालं होतं. दिशा मुंबईला. जाता जाता ‘अवचट ला COEP मिळालंय’ हेही वाक्य तिच्या कानांवर पडलं होतं. आणि तो
सुद्धा पुण्यात असणार याचीही तिच्या मनाने नकळत नोंद केली.
10
समोर टाकलेले चार ड्रेस.. आईची त्या दुकानदाराशी चालू असलेली हुज्जत..
संपीची वरच्या शेल्फमधल्या दुसर्याच कुठल्या तरी ड्रेस वर खिळलेली नजर.. या
सगळ्यात काहीतरी फिस्कटलं आणि ‘राहुद्या, आम्ही
दुसर्या दुकानात बघतो, चल गं
संपे..’ म्हणून आई
जायला निघाली. आणि त्या ड्रेसवरची नजर वळवून संपीलाही तिथून निघावं लागलं. असं
दोन-तीन दुकानात घडल्यावर चौथ्या दुकानात शरमून संपी दिसेल त्या ड्रेसला ‘हो’ म्हणाली. आईचं असं हुज्जत घालणं तिला अजिबातच
आवडत नव्हतं. सगळ्यात शेवटी, ‘घे तो
तुला आवडलाय ना..’ असं
म्हणून संपीची नजर ज्या ड्रेसवर खिळलेली होती त्याकडे बोट दाखवून संपीच्या आईने
तिला यावेळी आश्चर्याचा धक्काच दिला. संपी खुश! अजून अशीच बरीचशी खरेदी करून संपी
आणि तिची आई घरी परतल्या तेव्हा घड्याळात चार वाजले होते. रविवारची दुपार. संपीची
पुण्याला जाण्याची तयारी जोरात सुरू होती. त्या दोघी आल्या तसा आज संपीच्या
बाबांनी चहा बनवला. तो घेत घेत मग संपीच्या जाण्याविषयी, कॉलेजविषयी, हॉस्टलविषयी चर्चा सुरू झाल्या.
हॉस्टेल मधल्या मुली ‘कशा’ असू शकतात इथपासून तू ‘जपून’ कसं रहायला हवंस इथपर्यंत बरेच सल्ले मग तिला
दिले गेले. ती ‘हो, हो’ म्हणून सगळ्यांचं ऐकून घेत असते. आप्पांनी त्यातच
त्यांच्या तरुणपणी ते एकदा पुण्याला कसे गेले होते, तेव्हाचं पुणे कसं होतं, शनिवार वाडा किती मोठा आहे इ.इ.
स्मरणरंजनही करून घेतलं.
संपीची उत्सुकता आता शिगेला पोचलेली होती. अॅडमिशनच्या वेळेस ती कॉलेज
आणि हॉस्टेल तसं पाहून आली होती. ते सगळं तिच्या डोळ्यांना नवं असलेलं चकचकीत
वातावरण पाहून दीपलीही होती. आता तिथे रहायलाच जायचं म्हणजे मधूनच तिला भितीही
वाटत होती. कॉलेज कसं असेल, तिथल्या
मैत्रिणी कशा असतील, आईला
सोडून राहणं आपल्याला जमेल का एक ना अनेक प्रश्न पोटात गोळा आणायचे.
पेस्ट, साबणा
पासून चिवडा-लाडू पर्यन्त सगळ्या सामानाने संपीची बॅग भरगच्च भरली. ती जायच्या
दिवशी नमिचेही डोळे नाही म्हणता ओले झाले. भरल्या डोळ्यांनी आणि जड मनाने संपीने
सगळ्यांचा निरोप घेतला आणि बाबांसोबत जायला निघाली. स्वप्नांनी भरलेलं नवं जग आता
तिची वाट पाहत होतं.
सकाळी-सकाळी ती आणि तिचे बाबा पुण्यात पोचले. ते मोठाले रस्ते, रिक्षावाल्यांची चढाओढ, अजून जांभई देत असलेली रहदारी, मोठ्या इमारती. सगळं पाहण्यात संपी
दंग होती. त्यादिवशी मग कॉलेजमधल्या जुजबी गोष्टी निकाली लावून आणि संपीला
हॉस्टेलवर सोडून तिचे बाबा संध्याकाळी जायला निघाले तेव्हा संपीची नजर कावरी-बावरी
झाली होती. कधीच कोणाला सोडून न राहिलेली ती आता अंगावर आलेल्या त्या जाणीवेने
काहीवेळ मलूल झाली. बाबांचा निरोप घेऊन तिच्या रूममध्ये ती परतली तेव्हा तिथे आणखी
दोघीजणी तिला दिसल्या. ती आधीच दिवसभर तिथल्या मुली पाहून चाट पडली होती. ‘आईगं! किती छोटे कपडे!’ म्हणून काहीवेळा स्वत:चीच नजर तिने
दुसरीकडे वळवली. तिचा ओढणीसकट घातलेला पंजाबी ड्रेस तिला तिथल्या वातावरणात नऊवारी
साडीसारखा वाटायला लागला.
ती रूम मध्ये आली. त्या दोघी हिच्याकडेच ‘पाहत’ होत्या. त्यांच्याशी काही न बोलताच संपी तिच्या
बॅग मधलं सामान काढून तिच्या रोब मध्ये लावायला लागली. एक काहीतरी काढायचं, चार गोष्टी खाली पाडायच्या असा सगळा
संपीचा नेहमीचा वेंधळेपणा सुरू होता. शेवटी मग त्या दोघींमधली एकजण उठली आणि
संपीला म्हणाली,
‘हाय, मी
मीनल. फर्स्ट इयर. कम्प्युटर ब्रांच.’
हातातल्या सामानानिशी संपीने तिच्याकडे पाहिलं आणि हसत तीही हाय
म्हणाली,
‘मी संपी.. म्हणजे संपदा जोशी, इलेक्ट्रॉनिक्स अँड telecommunications, फर्स्ट इयर.’
‘वॉव.. म्हणजे तू पण फर्स्ट इयर. भारी.’ मीनल आनंदाने म्हणाली.
त्या दोघींमध्ये तिसरीचा आवाज आला,
‘आणि मी जिया.. सेकंड इयर. E&tc. तुमची सीनियर!!’
दोघींनी तिच्याकडे पाहिलं. आणि क्षणभर सीरियस झाल्या.
त्यांच्याकडे पाहत एमजी हसून जिया म्हणाली,
‘डोन्ट वरी.. मी रॅगिंग घेणार नाहीये तुमची’
आणि मग तिघी एकमेकींकडे पाहून हसू लागल्या. त्यानंतर मग मेस मध्ये तिघींनी
रात्री एकत्रच जेवण केलं. संपीला नाही म्हटलं तरी घरच्या जेवणाची आठवण आली पण
तिथल्या त्या वातावरणात ती ते विसरून गेली. मीनल मुळची महाराष्ट्रियन असली तरी
वाढली दुसर्या राज्यात होती आणि आता इंजीनीरिंग साठी पुण्यात आलेली होती. तिचं
मराठी त्यामुळे बरंचस हिन्दी मिश्रित होतं. आणि वागायला-बोलायलाही ती एकदम
बिनधास्त. अगदी संपीच्या उलट. जिया महाराष्ट्रियन असली तरी थोडी तिच्या-तिच्यात
असायची. ती सीनियर असल्यामुळे असेल पण मीनल आणि संपीची थोडी जास्त गट्टी जमली.
मीनल संपीच्या सगळ्या वेंधळेपणावर यथेच्छ हसून घेत होती. तिने हे असं संपी सारखं
रत्न याआधी पाहिलेलंच नव्हतं. आता एकूण धमाल येणार हे मात्र ती ओळखून गेली.
दुसर्या दिवशी दोघी मिळूनच कॉलेजमध्ये आल्या. आज पहिला दिवस होता.
योगायोगाने त्या दोघींची डिविजन एकच होती. पहिल्या वर्षी सगळ्या ब्रांचचे
विद्यार्थी एकत्रच शिकतात आणि दुसर्या वर्षापासून आपापल्या ब्रांचमध्ये जातात हे
संपीला त्यादिवशी नव्यानेच समजलं. भलमोठं कॉलेज, तिथला स्टाफ संपी आ वासून सारं पाहत होती. वर्ग
गच्च भरलेला होता. खुपशा पुणेरी, काही इतर जिल्ह्यांमधल्या, काही थेट दुसर्या राज्यांमधल्या मुली दिसत
होत्या. प्रोफेसर्स पण एकदम अस्खलित इंग्लिश बोलणारे. मुलींमध्ये मराठी पेक्षा
जास्त हिन्दी आणि इंग्लिशच जास्त ऐकायला येत होतं. संपीला थोडं दडपण आलं. पण मीनल
सोबत असल्याने ती थोडी relaxed होती. पूर्ण दिवस मग कॉलेजची, विषयांची, इंजीनीरिंगची ओळख करून घेण्यात गेला. मीनल आणि
संपीने लायब्ररी लाही धावती भेट दिली. आणि सगळ्यात शेवटी मीनलने संपीला नेलं ते
कॉलेजच्या नेटलॅब मध्ये. संपी घाबरत होती. पण मीनलने नेलंच तिला ओढत. तिने
सराईतासारखे दोन पीसी ऑन केले आणि संपीची ‘ऑर्कूट’ नावाच्या जादुई दुंनियेशी ओळख करून दिली. त्याबद्दल
थोडंफार ऐकून असली तरी संपीने आजवर ते पाहिलं नव्हतं. तिला ते खूप भारी वाटलं.
मीनलने संपीला तिचं अकाऊंट काढायला लावलं. संपीला त्यावर तिच्या आधीच्या वर्गातले, शाळेतले असे बरेचजण दिसायला लागले.
तिने हळूच अवचटची प्रोफाइल काढून पाहिली. भारीच होती.
दुसराही दिवस कमी-अधिक फरकाने असाच गेला. अजून एक-दोघींशी त्यांची बरी
ओळख झाली. कॉलेज संपल्यावर पुन्हा त्या कालच्या सारख्या नेटलॅब कडे धावल्या.
ऑर्कूट उघडलं. संपीला बरेच नवीन scraps आलेले होते. त्यातला एक होता चक्क अवचटचा..!
तो पाहून संपीची धडधड उगाच वाढली. त्यातलं ‘hey, wassup..’ हे एवढंच संपीने दहावेळा तरी पुन्हा
पुन्हा वाचलं. आणि बराच विचार करून मग ‘I’m fine.. what about
you?’ असा रीप्लाय
केला.
प्रचंड एक्साइट होऊन त्यादिवशी ती हॉस्टेलवर परतली..
11
बहावा.. नीलमोहर.. बॉटलब्रश.. गुलमोहर तर जागोजागी उभा.. संपीच्या कॉलेज आणि हॉस्टेलचा
परिसर हा असा रम्य होता. हॉस्टेलच्या बाहेर तर बाहेर येण्यासाठीच्या रस्त्यावर
दुतर्फा झाडी होतीच. पण रस्त्याच्या दोन्ही बाजूला पूर्ण रस्ताभर कोणीतरी मोगर्याची
झाडं लावलेली होती. उन्हाळ्यात ही फुलतील तेव्हा इथे रात्रीची शतपावली करायला काय
मजा येईल, संपीच्या
मनात विचार येऊन गेला. ही अशी इतकी हिरवळ, नवी-नवी झाडं, तर्हेतर्हेचे सुगंध आणि ओळखी-अनोळखी पक्षांचा
सततचा किलबिलाट तिला त्या परिसराच्या आणि हॉस्टेलच्याही पुन्हा-पुन्हा प्रेमात
पाडत होता. तिच्या आवडीचाच सगळा प्रकार होता. हॉस्टेलही मोठं. मराठी मुली तिथे
नव्हत्या असं नाही पण जास्त करून सगळ्या परराज्यांमधल्या. त्यांचा पोशाख, राहणीमान, बोलणं-वागणं हे सारं संपी साठी इतकं
नवीन होतं की सुरूवातीचे दिवस ती फक्त सारं न्याहाळत होती. बोलणं तसं फक्त मीनल
आणि जिया सोबत.
तिथल्या सिनियर्स सोबत बोलताना तिला फार म्हणजे फारच अवघडल्या सारखं
व्हायचं. एकतर त्यांचा तो बिनधास्तपणा, हिन्दी बोलणं संपीच्या अंगावर यायचं. मराठी
त्यांना फारसं समजायच नाही. आणि मराठी सोडून हिन्दी-इंग्लिश दैनंदिन आयुष्यात
बोलावं इतकं तिचं सफाईदार नव्हतं. तोंड उघडून हशा पिकवण्यापेक्षा गप्प राहिलेलं
बरं असा साधारण तिचा विचार. त्यात सीनियर म्हटल्यावर त्यांना ‘दीदी’ किंवा त्यातल्या त्यात मॉडर्न म्हणजे ‘दी’ म्हणणं भाग होतं. नाहीतर नाराजी ओढवण ओघाने आलंच.
संपीच्या घरी संपिच मोठी. ती कोणाला ताई-दीदी म्हणण्याचा प्रश्न नव्हताच पण तिची
लहान बहीण देखील तिला सरळ नावाने बोलायची. त्यामुळे असं एकदम येऊन कोण-कुठल्या
अनोळखी पोरींना दीदी वगैरे म्हणणं तिच्या जीवावर यायचं. सवयच नव्हती ना तशी.
त्यामुळे बरेच दिवस तिचं अळि-मिळी-गुपचिळीच चालू होतं.
रूममध्ये मात्र धमाल चालायची. हे असं खरंतर आईविना राहणं, घरी कधीच कुठलंच काम न केलेल्या
तिच्यासाठी एक दिव्यच होतं. त्यामुळे रोजची साधी-साधी कामं करतानासुद्धा तिची
उडणारी धांदल पाहून मीनलची हसता-हसता पुरेवाट व्हायची. पण तिला खरी कमाल वाटली ते
संपीचं ‘कपडे धुण’ पाहून. कपडे धुवायचे म्हणजे काय
करायचं हे अजिबातच माहित नसलेल्या संपीने जेव्हा तिच्या-तिच्या पद्धतीने आठवडाभर
साचलेले कपडे धुवायला सुरुवात केली तेव्हा तो गजब सोहळा पाहता पाहता मीनलचं हसून
पोट दुखायचंच बाकी होतं. कपडे ‘भिजवायचे’ असतात
ही गोष्ट कपड्यांचा गठ्ठा घेऊन बाथरूममध्ये ते धुवायला जाईपर्यन्त तिच्या गावीच
नव्हतं. मग जाऊदे म्हणत तिने ते पाण्यात भिजवले. आणि मग एक कपडा घ्यायचा, त्याला साबण लावायचं, तो घासायचा, पिळायचा आणि बाहेर येऊन वाळत
घालायचा. या सगळ्या क्रिया प्रत्येक कपड्यासाठी पुन्हा-पुन्हा तिला करताना आणि कपड्यांसोबत स्वत:ही
धुवून निघत असताना पाहून मीनल हसून लोळत होती.. तिने मग संपीला कसंबसं समजावून
सांगितलं की तू हे सगळे एकदा घासून मग नंतर ते पिळून मग सगळे एकदाच वाळत घालू
शकतेस तेव्हा जगातल्या अंतिम सत्याचा साक्षात्कार झाल्यासारखी संपी ‘अरे हे आपल्याला कसं नाही सुचलं’ म्हणत स्वत:वरचं हसत बसली.
हॉस्टेल मध्ये मेस व्यतिरिक्त सगळ्यांसाठी म्हणून एक छोटंसं कॉमन किचन
होतं. कोणाला चहा प्यायचा असेल तर किंवा, मॅगी किंवा खिचडी बनवण्याची तिथे सोय होती.
रूममध्ये केटल किंवा गॅस वापरण्यास सक्त मनाई होती. ‘मॅगी’ हा पदार्थ म्हणजे हॉस्टेल निवासींसाठीच म्हणून
लागलेला एक अप्रतिम, अचाट
शोध आहे हे ती पहिल्यांदा खाल्ल्यावर संपीच्या लगेच लक्षात आलं. तेव्हापासून
दरदिवसा आड तो बनवणं हे नित्यकर्मच झालं जणू. पाणी कसं उकळायचं हेही माहित
नसलेल्या संपीला मॅगी बनवणं सुद्धा पुरणपोळि बनवण्या सारखं अवघड वाटायचं. ते काम
सहसा मीनलकडेच असायचं. ती एकदा काही कामानिमित्त बाहेर गेली असता संपीला मॅगी
खाण्याची हुक्की आली. पण बनवणार कसं? एव्हाना थोडाफार आत्मविश्वास कमावलेल्या तिला त्यात काय इतकं करून तर
पाहू असं वाटलं. आणि तिने कॉमन किचन मध्ये जाऊन पातेलंभर पाणी उकळायला ठेवलं.
त्यात मसाला टाकून ती त्याला उकळी येण्याची वाट पाहू लागली. तेवढ्यात मॅगी
बनवण्यासाठी म्हणून कोणी तरी हिंदीभाषिक सीनियरही तेथे आली. आणि संपीचं होण्याची
वाट पाहत थांबली. ती थोडी सीरियस टाइप्स होती. संपीचं पातेलंभर पानी आणि मॅगीचं
छोटंसं पॅकेट पाहून ती अतिशय गंभीरपणे म्हणाली,
‘आप शुअर हो, आपको
इतना पानी लगेगा!’
संपी बुचकळ्यात पडली आणि मग उगाच आव आणत,
‘हां हां.. मुझे पता है मॅगी कैसे बनती है..’ म्हणाली.
ती सीनियर संपीला एक विचित्र लुक देऊन मग मासिक चाळत बसली.
इकडे संपीच्या मॅगीचं जे होणार होतं तेच झालं. मॅगीची खीर बनली!
संपीला कळेना कितीही गॅस वाढवला तरी भांड्यातल पानी का संपत नाहीये. आपण मेजर घोळ
घातलाय हे ती आता कळून चुकली. शेवटी मग गॅस बंद करून तिची खीर घेऊन तिथून जायला
निघाली तेव्हा त्या सीनियर ने त्या खीरीकडे आणि संपीकडे पाहिलं. संपीने मग
तिच्याकडे न पाहताच तिथून धूम ठोकली. त्यादिवशी तिला स्वयंपाकात ‘प्रमाण’ नावाची काहीतरी गोष्ट असते हे समजलं.
तिच्या या गमतीशीर वागण्यामुळे हळू-हळू मात्र ती सगळ्या हॉस्टेलमध्ये
फेमस आणि वागण्या-बोलण्यातल्या एकूण निरागसतेमुळे सगळ्यांची लाडकीही व्हायला
लागली. तिच्यात काहीतरी होतं जे सगळ्यांना आकर्षून घ्यायचं आणि ती त्यांना
आपलीशीही वाटायची. संपी आता हळू-हळू तिथे रुळायलाही लागली होती.
हॉस्टेललाइफ जसं तिच्यासाठी नवं होतं तसंच ‘इंजीनीरिंग’ ही नवीनच होतं. बारावी नंतर इंजीनियर
होणं शास्त्रच असल्याने तिने त्याला अॅडमिशन घेतलेलं. आता ते कशाशी खातात हे मात्र
जाणून घेणं बाकी होतं.. कॉलेज मध्ये या इंजीनीरिंगशी तिचा आता रोज सामना होत
होता.. सामना कसला, कुस्तीच..
12
So girls, now you are
entering a whole new ‘electrical world’!
इलेक्ट्रिकल चा पहिलाच तास होता. आणि त्या मख्ख प्रोफेसरीण बाई शक्य
तितक्या मख्ख आवाजात वरील वाक्याच्या अर्थाच्या अगदी विरुद्ध सुरांत आपल्या
विषयाची ओळख करून देत होत्या. संपी, मीनल सोबत भिंतीजवळच्या बेंच वर बसलेली होती. तिचं लक्ष
प्रोफेसरणीकडे. मीनल तिला नज करून नवीन घेतलेल्या रजिस्टर वरची covers दाखवत होती. त्यांची चुळबुळ पाहून
त्या प्रोफेसर बाईंनी,
‘हे, यू स्टँड अप..’ असं म्हटलं.
संपी आणि मीनल एकमेकींकडे पाहू लागल्या. त्या बाई पुन्हा म्हणाल्या,
‘यस यस.. यू, गर्ल
इन पिंक पंजाबी सूट..’
संपीला नाईलाजाने उठावं लागलं.
‘व्हाट्स यॉर नेम?’
तोंडात आलेलं ‘संपी’ परतवत संपी म्हणाली,
‘संपदा जोशी’
‘सो, संपदा, व्हॉट डू यू मीन बाय electricity?’
आता electricity म्हणजे काय हे इंजीनीरिंगला असलेल्या स्टुडेंटला माहिती नसेल का? संपीला अर्थातच माहिती होतं. पण असं
अचानक सगळ्या वर्गाची नजर आपल्यावर खिळलेली असताना नेमके शब्द फितूर होतात.
संपीचंही तेच झालं. पण मग काहीतरी उत्तर दिलंच पाहिजे या जाणीवेतून मेंदूत
शब्दांची जुळवाजुळव व्हायच्या आधीच ती उत्तरली,
‘electricity means.. hmm.. hmm..
light..’
(घरी वीज आली-गेली की आपण नाही का म्हणत लाइट आली किंवा गेली तसं :D )
या उत्तराबरोबर प्रोफेसरीणबाईच्या कपाळावर आठ्या उमटल्या आणि पूर्ण
वर्गात हशा पिकला.
संपीचं ध्यान मात्र नेहमी सारखं गोंधळलेलं.
बाईंनी मग ‘पे
एटेन्शन’ म्हणत
संपीला नजरेनेच खाली बसायला सांगितलं. सगळ्याजणी संपीकडे पाहून हसत होत्या.
संपीनेही मग त्यांच्यासोबत भरपूर हसून घेतलं.
थोड्याफार फरकाने सगळी lectures अशीच पार पडत होती. सुरूवातीला असतो तसा
सीरियसनेस यही वेळेस संपीमध्ये संचारला होता. पहिल्या वर्षी सगळ्या ब्रांचेसची
तोंडओळख करून देणारे विषय अभ्यासाला असतात हे आता संपीला कळलं होतं. शिवाय सोबत
मॅथ्स, अप्लाइड
फिज़िक्स, अप्लाइड
केमिस्ट्रि इ.इ. आलेच. फिजिक्स
आणि केमिस्ट्रि ‘अप्लाइड’ असू शकतात याची जाणीव संपीला आत्ताच
झाली. अकरावी-बारावीत ते फक्त एमसीक्यू सोडवण्यापुरते किंवा सीईटी पास करण्यापुरते
असतात असाच तिचं समज झालेला. लायब्ररी मध्ये जाऊन तिथली पुस्तकंही आता संपी
चाळायला लागली होती. तिथले ते मोठे मोठे संदर्भ ग्रंथ पाहून तिचे डोळे पांढरे
व्हायचे.. पण तिच्या त्या ‘टॉप’ करायच्या निग्रहापुढे तिने त्यांची
परवा केली नाही.
काही दिवसांनी संपीच्या अंगावरचा पंजाबी सूट जाऊन तिथे कॉलेजचा ‘शर्ट-ट्राऊजर-टाय’ असा युनिफॉर्म आला! संपीचं रुपडच
पालटलं. आजपर्यंत कधी साधी जीन्सपण न घातलेल्या तिला हा युनिफॉर्म फारच भारी वगैरे
वाटायला लागला. शिऊन आला त्यादिवशी तर बराच वेळ तो घालून तिचं आरशात पाहणं चालू
होतं.
मीनल सोबत तिचं ‘ओर्कुटायन’ ही आता जोरात सुरू होतं. पूर्वीचे
सगळे वर्गमित्र-मैत्रिणी या ऑर्कूटच्या निमित्ताने पुन्हा एकत्र आले. ग्रुप्स
बनले. इतकी वर्ष सोबत राहून कधी समोरा-समोर न बोललेले हे सगळे आता ऑर्कूट वर मात्र
गुलूगुलू बोलायला लागले होते. एकमेकांच्या मध्ये असलेलं ते आभासी माध्यम त्यांना
सोयीचं वाटत असावं.
अवचट चा आता मंदार झाला होता. आणि संपी ची संपदा. मंदार आणि संपी आता
बर्यापैकी ‘बोलायला’ लागले होते. हा मंदार आपल्याला ‘ओळखत’ वगैरे असेल याची इतकी वर्षं वर्गात खाली मान
घालून काढलेल्या संपीला त्याचा srap येईपर्यन्त कल्पनाच नव्हती. पण तोच काय, वर्गातली इतरही बरीच मुलं संपीशी छान
बोलायला लागली होती. आणि ‘अरेच्चा
आपण इतकेही बावळट नाही आहोत’ याची
जाणीव संपीला झाली. मुलांना ती इतरांपेक्षा वेगळी वाटायची कारण तिच्या वागण्यात एक
प्रकारचा निखळपणा होता.
दिवस जाऊ लागले तसा या नवीन कॉलेजमध्येही आता संपीचा एक ग्रुप तयार
झाला. ती, मीनल, प्राजक्ता आणि प्रॉपर पुण्यातलीच
असलेली मेघा. चौघी सगळीकडे एकत्र. संपी रोज तिच्या ऑर्कूट वरच्या घडामोडी
ग्रुपमध्ये सांगायची. त्यामुळे, श्रावणी, किशोर, मंदार, श्रीनिवास इ.इ. डझनभर तरी नावं आता ती सोडून इतर
तिघिंचीही पाठ झालेली होती. आणि त्यांचे किस्सेही.
मंदारचा उल्लेख थोडा जास्त असायचा. आधी इंजीनीरिंगशी निगडीत असलेल्या
त्यांच्या गप्पा, सध्याचं
कॉलेज, मित्र-मैत्रिणी, अभ्यास अशा मार्गाने जात जात
पूर्वीच्या आठवणींवर कधी येऊन पोचल्या त्यांचं त्यांनाही कळलेल नव्हतं. काही झालं
तरी ऑर्कूटवर बोलण्याला मर्यादा होत्या. कॉलेजमध्ये आल्यावरचं, त्यातही लॅब असिस्टंटला चुकवून
नाहीतर मग बाहेरच्या
सायबर कॅफे मध्ये वगैरे ऑर्कूट उघडता यायचं. त्यावेळी इंटरनेट अॅक्सेस इतका सहज
नव्हता. मोबाइल फोनही अगदी साधे, मन्युयल कीपॅड असलेले होते.
संपीच्या जगात आता आभासी माध्यमातून जरि मुलांचा प्रवेश झालेला असला तरी
समोर मुलं दिसल्यावर मात्र अजूनही तिची घाबरगुंडी उडतच होती. तिचं कॉलेजही गर्ल्स
असल्यामुळे तिचं तसा मुलांशी फारसा संबंध यायचा नाही. पण कॅम्पस मध्ये इतरही
कॉलेजेस असल्यामुळे मुलांचा वावर हा होताच.
एका दिवशी कॅम्पस मधल्या एकमेव झेरॉक्स सेंटरवर संपी कशाचेतरी झेरॉक्स
काढण्यासाठी आली होती. पण तिथे काऊंटर वर मुलांची ही गर्दी. संपी एका कोपर्यात
तिष्ठत कितीतरी वेळ उभी. त्यांच्यात घुसून, किंवा त्यांना सरका म्हणून आपलं काम करून
घेण्याचं धाडस तिच्याच्याने होईचना. बराचवेळ झाला संपी परतलीच नाही म्हणून मीनल
तिच्यामागे तिथे आली आणि संपीला असं कोपर्यात उभी पाहून तिने कपाळालाच हात लावला.
तिने तिच्या हातातल्या नोट्स घेतल्या आणि ‘एक्सक्यूज मी..’ म्हणत वाट काढत थेट जाऊन काऊंटर वर धडकली. संपी
तिच्याकडे पाहतच राहिली. मीनल ने मग ‘भय्या, इतना
दो ना पेहले, मेरा
लेक्चर है.. भय्या प्लीज..’ म्हणत
गोड-गोड बोलून तेवढ्या गर्दीत त्या झेरॉक्स वाल्या भय्याकडून आपलं कामही करून
घेतलं. आणि तो गठ्ठा संपीच्या हातात सोपवत म्हणाली,
‘देखा, ऐसे
करना पडता है.. और तू.. कबसे खडी है हात बंधे हुये..’
‘अगं मला भीती वाटते बाबा बोलण्याची..’ संपी म्हणाली.
‘क्युं? खा
जाएंगे तुझे लड्के? संपे
ढीट बन जा अब तू.. ये बॉइज फोबिया कुछ काम नई आनेवाला तेरे’
‘हम्म.. बॉइज फोबिया.. खरंय..’
संपी मीनल कडे पाहून खुद्कन हसली आणि मनातल्या मनात विचारातही पडली.
13
‘चल रे मीनल, घुमके
आते है सिटि में..’
संपीच्या शेजारच्या रूममधली दिव्या आज भल्या सकाळीच संपीच्या रूम
मध्ये येऊन बसली होती. ती होती उत्तर भारतीय. तिचं हिन्दी एकदम असं ‘लो एंवइं’ स्टाइल होतं. ते ऐकायला संपीला फारच
गोड वाटायचं.
‘हां हां चलो, शनिवारवाडा
देखते है. मेरे अप्पा कहते बहुत बडा है..’ संपीचं हिन्दी!!
ही दिव्या दिसायला एकदम गोड आणि वागायला एकदम धाकड. संपीला मनातून अशा
मुली फार आवडायच्या. ती आली की मग संपी उगाचच हिन्दी बोलायची. मोडकं-तोडकं. आणि मग
दिव्या तिला म्हणायची,
‘हाहा.. संपदा, कितनी
क्यूट है रे तू..’
संपीला हे पण खूप भारी वाटायचं.
पण, रविवार
असला तरी त्यादिवशी संपी आणि मीनलने आता घालायला कपडेच उरलेले नाहीत हे लक्षात
आल्यावर, दोन
आठवडे साचलेले कपडे धुण्याचा घाट घातला होता. त्यामुळे त्यादिवशी तरी त्या कुठे
गेल्या नाहीत. पण, पुण्यात
येऊन महिना-दोन महीने झाले
तरी तुम्ही अजून शनिवार वाडा, तुळशीबाग, एफसी रोड किंवा एमजी रोड ला भेट दिली
नाही म्हणजे काय! या दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गिल्ट पोटी पुढच्या रविवारी मात्र
मीनल-संपी-प्राजक्ता-मेघा अशी चौकडी निघाली की पुण पहायला. मेघा त्यांची गाइड. ‘पीएमटी’ नावाच्या अचाट संकल्पनेशी त्या दिवशी त्यांची ओळख
झाली. शनिपाराच्या बस मध्ये चढल्यावर बाहेरून अतिसामान्य दिसणार्या त्या बसची ‘गर्दी पेलण्याची क्षमता’ पाहून संपी अवाक झाली. आणि त्या दैवी
बस चे आपण जणू मालक आणि चढलेले सारे प्रवासी म्हणजे तुच्छ विकारी मानवजात असल्या
प्रमाणे वागणारा, अभूतपूर्व
आत्मविश्वास घेऊन वावरणारा, कमीत
कमी शब्दात जास्तीत जास्त अपमान करण्याची क्षमता असलेला तो कंडक्टर पाहून संपीने
मुकाट मान खाली घातली. कॉलेजचे पोरं-पोरी म्हटल्यावर तर यांच्या चेहर्यावर
अति-तुच्छता मिश्रित भाव प्रकट व्हायचे. का ते त्यांनाच ठावूक! गर्दीतून
सफाईदारपणे वाट काढत ते कंडक्टर काका पुढे आले आणि त्यांनी नेमकं संपीलाच तिकीट
मागितलं. गाडीत शिरल्या-शिरल्या हातात तिकिटाचे सुटे पैसे घेऊन बसायचं असतं हा
पीएमटी चा बेसिक नियम संपीला ठावूकच नसल्याने कंडक्टरने तिकीट मागितल्यावर तिने
पर्स उघडली. यावर तो कंडक्टर बोललाच त्याच्या स्वभावाप्रमाणे,
‘मॅडम, एक चहा
पण मागवु का? चालूद्या
तुमचं निवांत. मी आहे इथे उभा.’
पीएमटीमध्ये चहा पण देतात का? संपी मनातल्या मनात म्हणाली. पण जाऊदे काही नको
बोलायला म्हणून गप्प बसली. अशावेळी पंधरा वेगवेगळे कप्पे असलेल्या त्या हौसेने
घेतलेल्या पर्समधल्या कुठल्यातरी कप्प्यात ठेवलेले पैसे नेमके सापडत नाहीत.
संपीचंही तेच झालं. तेवढ्यात प्रसंगाची कल्पना येऊन गर्दीतून वाट काढत मेघा पुढे
आली आणि तिने पटकन तिकीट काढलं. कंडक्टरने तिच्याकडेही एक व्यामिश्र कटाक्ष फेकला.
आणि हे सगळं झाल्यावर पर्समध्ये खुपसलेलं डोकं बाहेर काढत पैसे पुढे करत संपी
म्हणाली,
‘चार शनिपार.’
पण पाहते तो कंडक्टरच्या जागी मेघा उभी. आणि मग स्वत:च्या वेंधळेपणावर
स्वत:च हसली. थोड्यावेळाने तिच्या मोबाइलची मेसेज टोन वाजली. पुन्हा पर्सची एक
मुक्त सफर करून तिने तो बाहेर काढला आणि पाहिलं. मंदारचा मेसेज!!
आणि मग तिची ट्यूब पेटली. काल ऑर्कूटवर त्यांनी नंबर एक्सचेंच केले
होते.
संपीनेही मग त्याच्या ‘हाय’ ला ‘हाय’ केलं. आणि मनातल्या मनात खुश होत खिडकीबाहेर पाहू
लागली. तिचे डोळे स्वप्नांनी भरले होते. एक नवं जग ती पहायला निघाली होती. शरीराने
आणि मनानेही.
दुसर्याच क्षणी पलीकडून रीप्लाय आला,
‘काय करतेयस?’
‘आम्ही तुळशीबागेत जातोय’ संपीचा रीप्लाय.
‘अरे वा! खरेदी का?’ मंदार.
‘नाही. तुळशीबाग पहायला.’ संपीचं प्रामाणिक उत्तर.
‘हाहा.. फनी यू..’ मंदारला
वाटलं संपीने जोक क्रक केलाय.
त्याच्यासोबत हसत मग संपीने विचारलं, ‘काय झालं?’
‘अगं, तुळशीबाग
पहायला जायला ती काय खरी बाग आहे का. सगळे तिथे शॉपिंगसाठीच जातात. तू sarcastically म्हणालीस ना!’
आता यावर संपीला दोन प्रश्न पडले. तुळशीबागेला ती खरंच एखादी ‘बाग’ वगैरे समजत होती हे त्याला कसं सांगायचं आणि
दुसरं, ‘sarcastically’ म्हणजे
काय?
पण, मग
काहीच न बोलता ती गप्प बसली.
त्यानंतर थोड्यावेळाने ‘हे, यू
देअर?’ अशा आलेल्या
मेसेजला ‘अरे
आम्ही पोचलो. नंतर बोलते’ असा
रीप्लाय करून ते संभाषण तिने त्यादिवसा पुरतं तरी थांबवलं.
तुळशीबागेत पोचल्यावर मात्र तिला तो का हसत होता त्याचा उलगडा झाला.
बाग सोडा तिथे नुसतेच बोळ होते आणि तेही गर्दीने काठोकाठ भरलेले. इतक्या सार्या
वस्तु तिने एका ठिकाणी पहिल्यांदाच पाहिल्या होत्या. चौघीजणी एकमेकींचे हात धरून
सारं काही न्याहाळत पुढे सरकत होत्या. मीनल काय काय खरेदीही करत होती. संपी मात्र
फक्त किमती ऐकत होती आणि मनातल्या मनात आपल्याकडे किती पैसे आहेत, आपण किती खर्च करू शकतो, अमुक-अमुक वस्तु घेतली तर किती उरतील
इ.इ गणितं पुन्हा पुन्हा मांडत शेवटी घेत काहीच नव्हती.
संपी खरी हरखली ती मेघाने त्यांना तुळशीबागेमधलं राम-मंदिर
दाखवल्यावर. तिथे गेल्यावर बाहेरचा सारा गोंगाट एकदम नाहीसा झाला. आणि तिचं मन
प्रसन्न प्रसन्न झालं.
त्यानंतर मग लक्ष्मीरोड-दगडूशेठ करत करतच दिवस मावळला आणि त्यांनी
परतायचं ठरवलं.
मोठं शहर, भरपूर
गर्दी, धावणारी माणसं, त्यांचा वेग.. एक पूर्ण नवं जग पाहून
संपी पुरती हरखून गेली.
हॉस्टेलवर परतल्यावर तिने पहिली कुठली गोष्ट केली असेल तर आधी
डिक्शनरी उघडली आणि ‘sarcastically’ चा अर्थ पाहिला. तो पाहिल्यावर जरावेळ स्वत:शीच
हसून मग तिने मंदारला मेसेज केला,
‘हाय, अरे मी sarcastically नव्हते म्हणाले. मला खरच तुळशीबाग
म्हणजे एक बाग वाटायची :D हाहा..
फनी मी!’
आणि मग फ्रेश होऊन ती जेवायला गेली. पाहिला घास तोंडात जातो न जातो
तोच मंदारचा रीप्लाय आला,
‘अँड नाऊ क्यूट टू..:)’
यावर नाही म्हटलं तरी संपी जराशी blush झाली आणि लगेच कोणी पाहिलं तर नाही
याची खात्री करत खाली मान घालून जेवायला लागली.
14
मंदार आणि
संपी पहिली ते बारावी एकाच वर्गात होते. त्यामुळे तोंड ओळख अर्थातच होती. पण बोलणं
अजिबातच नव्हतं. फोन नंबर एक्सचेंच केल्या पासून आता त्यांचं दिवस-रात्र चॅटिंग
सुरू झालं. मंदार हुशार होताच पण विचारी आणि शांतही होता. आणि टॉपर असल्यामुळे
सगळ्यांचं अॅट्रॅक्शनही होता. संपीशी बोलणं त्याला आवडायला लागलं होतं. दोघांमध्ये
एक बॉन्ड तयार व्हायला लागला होता. ‘प्रेम’ वगैरे
नाव त्याला आत्ताच नको द्यायला. जे होतं ते खूप निखळ होतं. आपली गाडी तिथपर्यन्त
पोचणार की नाही याचा अजून त्या दोघांनी विचारही केला नव्हता. संपी आता मोकळेपणाने
बोलायलाही लागली होती. तिचा cuteness, जिवंतपणा, खरेपणा त्याला हवाहवासा वाटायचा. आणि त्याचा intellect, विचारीपणा तिला. कॉलेजमधली इतरही
सगळीजणं आता मोबाइलवरुन बोलायला लागली होती. मग गेट-टुगेदर वगैरे संकल्पनाही पुढे
येऊ लागल्या. जे पुण्यात आहे त्यांनी तरी भेटूया वगैरे. पण, सेमिस्टर संपायला लागलं तसं-तसं सगळे
पुन्हा सीरियस व्हायला लागले आणि गेट-टुगेदरचा विषय त्यावेळपुरता तरी बारगळला.
पहिलं सेमिस्टर सुरू झालं म्हणता म्हणताच संपायलाही आलं. Submissions ची घाई गडबड सुरू झाली. याच्या नोट्स ढाप, त्याची फाइल मिळव असे प्रकार सुरू
झाले. टॉपर लोकांच्या सगळ्या फाइल्स अप टु डेट असायच्या त्यामुळे ते या काळात भाव
खाऊन आणि मजेत आसायचे. तर कॉलेजमध्ये कधीच लक्ष न दिलेले, जेमतेम एटेंडेंस असलेले लोक्स सगळाच
आनंद असल्याने निर्धास्त असायचे. पाहू, करू काहीतरी असा एकूण विचार. पण, संपी सारखे मधल्या patch मधले, ज्यांचं थोडंफार पूर्ण, थोडंफार अपूर्ण आहे असे सगळे
प्रोफेसर्सच्या मागे-मागे करून हैराण व्हायचे. याची साइन मिळव, त्याचा टेबल पूर्ण कर,
readings ढापणे वगैरे
गोष्टींना ऊत येण्याचा हा काळ!
रात्र-रात्र जागून संपीने ग्राफिक्स च्या शीट्स पूर्ण केल्या.
स्वप्नात पण फ्रंट व्यू, टॉप
व्यू, साइड व्यू
यायला लागले. घामे-घुम होऊन आणि अर्धा-एक किलो वजन घटवून तिची submissions कशीतरी पार पडली. आणि आता लागले लेखी
परीक्षेचे वेध! परीक्षा पंधरा दिवसांवर असताना तिची पीएल सुरू झाली. पहिलीच वेळ
असल्याने आणि पहिलीच पीएल असल्याने तिने ती खरंच preparation साठी वापरली. झोप आणि जेवण सोडून
इतरवेळी पुर्णपणे अभ्यास. मंदारशी बोलणं सुद्धा बंद!
एव्हाना मॅगी बनवण्यात तिने बर्यापैकी प्रगति केली होती.
रात्री-अपरात्रि ती बनवणं, रात्री
जागणं हे तर नित्याचंच झालेलं. मॅथ्स-1 डोकं खायचा, तर इलेक्ट्रिकल-सिविल डोक्याला मुंग्या आणायचे.
तिचं ‘पाठ करो’ तंत्र ती याही वेळेस अवलंबत होती. पण, यावेळी ती घरी नसून हॉस्टेलवर आहे हे
मात्र ती सारखी विसरायची. रात्री एक-दोन वाजता तिचं मोठयाने, स्तोत्र म्हणावी तसं पाठांतर चालू
असायचं. आणि मग जिया किंवा मीनल झोपेतून दचकून उठून,
‘संपे, अगं
हळू..’ म्हणेपर्यंत
तिची चांगलीच तंद्री लागलेली असायची.
अशीच पीएल संपली आणि एकदाच्या परीक्षा सुरू झाल्या. शेवटच्या
मिनिटापर्यन्त संपी पुस्तकात तोंड खुपसून बसलेली असायची. पेपर आले तसे गेले. ते
चांगले गेले की वाईट याचा अंदाज मात्र कोणालाच येत नव्हता. विद्यापीठाची ही पहिलीच
परीक्षा, मार्किंग
पॅटर्न वगैरे अजून कशाचीच माहिती नसल्याने निकाल लागेपर्यंत आपण नक्की किती दिवे
लावलेयत याबद्दल कोणीच ठामपणे काही सांगू शकत नव्हतं. आणि त्याबद्दल आता कोणाला
काही पडलेलंही नव्हतं. घरापासून लांब येऊन 4-5 महीने झालेले. बाहेर राहण्याची ही
पहिलीच वेळ. प्रत्येकाला आता घरी जाण्याचे वेध लागले होते. संपीपण मग निघाली घरी..
हा संपीचा पहिलाच एकटीने केलेला एसटी प्रवास. जपून राहायचं असतं, कोणाशी फार बोलायचं वगैरे नसतं हे
सगळे सल्ले डोक्यात ठेऊन संपी शिवाजीनगर बसस्टँड वर पोचली. तिने आधीच येऊन सकाळी
नऊच्या बसचं रिजर्वेशन केलं होतं बरंका! ती पोचली आठ वाजता. पण एकही बस लागलेली
तिला दिसली नाही. मग काय ती आणि तिची आणखी एक मैत्रीण दोघी शेजारी असलेल्या कॅंटीन
मध्ये जाऊन इडली-सांबार खत बसल्या. निवांत नाश्ता केल्यावर त्या 8.55 ला बसपाशी
आल्या. त्यांच्या गावची बस पाहून आत जाऊन बसल्या. हळू-हळू प्रवासी चढले. सव्वा
नऊच्या ठोक्याला कंडक्टर आला. आणि त्याने तिकिटं काढायला सुरुवात केली. संपी आणि
तिची मैत्रीण आपलं तर रिजर्वेशन आहे म्हणून निवांत बसलेल्या. कंडक्टर जवळ आला आणि
त्याने संपीला तिकीट मागितलं.
‘आमचं रिजर्वेशन आहे.’ संपी म्हणाली.
‘बर्या आहात ना, या
गाडीला एकपण रिजर्वेशन नाही आज.’ कंडक्टर.
संपी आणि तिची मैत्रीन दोघी आता पडल्या की बुचकळ्यात. त्यांनी मग
पावती काढून त्या कंडक्टरला दाखवली. ती पाहताच कंडक्टर मोठयाने हसायला लागला आणि
म्हणाला,
‘अहो ही गाडी तर गेली की पुढे निघून.’
हे ऐकून संपीच्या पायांखालची जमीनच सरकली.
‘अहोपण आम्ही बरोबर नऊ वाजता आलो. अशी कशी लवकर निघून गेली?’ संपी.
‘नऊ? पावणे-नऊ
टाइमिंग आहे तिचं. यावर वाचलं नाही का तुम्ही?’ कंडक्टर.
अरे देवा! संपीने डोक्यालाच हात लावला. तिच्या डोळ्यांत पाणीच यायला
लागलं. मग कंडक्टरने त्यांना डेपो ऑफिसरला भेटून पावतीवर सही घेऊन या, तरच प्रवास करता येईल असं सांगितलं.
मग काय संपी आणि तीच्या मैत्रिणीची सवारी निघाली त्या डेपो ऑफिसरला शोधयला.
तो काही सापडेना. या पळतायत इकडून तिकडे. सामान एसटी मध्ये. ती कधीही निघण्याच्या
तयारीत. आणि यांना पावतीवर सही काही मिळेना. शेवटी एका ठिकाणी दोघी रडवेल्या होऊन
थांबल्या. त्यांची ती अवस्था पाहून उनिफोर्म मधल्या एका इसमाने त्यांना काय झालय
असं विचारलं. संपीने जवळपास रडत सगळी हकीकत सांगितली. तो इसम मग त्या दोघींना घेऊन
बसपाशी आला. कंडक्टरला खाली बोलावलं. आणि त्याच्या समोरच त्याने संपीच्या पावतीवर
सही केली. संपीला तेव्हा कळलं की तोच डेपो ऑफिसर होता! दोघीं मग त्यांचे आभार
मानून एकदाच्या पुहा बसमध्ये येऊन बसल्या. त्यांच्यासकट खोळंबलेल्या इतर
प्रवाशांनीही मग सुटकेचा श्वास घेतला आणि एकदाची संपीची पहिली स्वतंत्र बस सफर
सुरू झाली..
15
संपी घरी येणार म्हणून घरात सगळ्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता.
तिन्हिसांजेला ती पोचली तेव्हा नमीने चक्क नाक न मुरडता तिचं स्वागत केलं आणि ‘पुणे रिटर्न’ वगैरे असल्यामुळे बराचवेळ
तिच्याभोवती पिंगाही घातला. संपीचं तर म्हणजे किती बोलू, किती सांगू आणि सगळ्यात महत्वाचं
म्हणजे किती खाऊ असं झालेलं होतं. ‘हॉस्टेलवर राहिल्याशिवाय घरच्या जेवणाची किम्मत कळत नाही’ हा शाश्वत नियम ती जगून आली होती.
त्यामुळे आल्या-आल्या आईच्या हातचं पाणीही तिला अमृतासारखं वगैरे वाटलं. एरवी
दिसेल त्या पदार्थाला नाकं मुरडणारी ती समोर येईल ते आनंदाने खाऊ लागली. अगदी
आईच्या पोळ्याही तिला ‘गोड’ वगैरे वाटायला लागल्या होत्या.
मोठ्या शहराचा आवाका मनात नोंदला गेल्यावर आपलं गाव छोटं वाटायला लागतं तसं
संपीचंही झालं. हॉस्टेलच्या गमती, कॉलेज मधला अभ्यास, मेस चं जेवण इ. इ. ची वर्णनं तर जाता-येता सतत सगळ्यांसमोर करणं चालूच
होतं. नुकतंच कमावलेलं मॅगीचं पाक कौशल्य घरच्यांना दाखवण्याची संधीही तिने सोडली
नाही. पण त्यावर ‘यापेक्षा
शेवयांची खिचडी जास्त छान लागते’ ही आईची प्रतिक्रिया ऐकून ‘तुला पामराला या दैवी पदार्थाचं माहात्म्य काय
कळणार’ अशा अर्थाचा
तुच्छ लुक संपीने आईला दिला. नमिला मात्र संपीची मॅगी प्रचंड आवडली.
संपीचं मंदार आख्यान सुट्टीत पुन्हा सुरू झालं. पेपर कसे गेले वगैरे
तुच्छ गप्पा आता ते मारायचे नाहीत. शाळेतले जुने किस्से revise करणं, त्यांच्यावर हसणं, किंवा या वयात ‘आयुष्य’, ‘स्वप्नं’ सॉरी ‘ड्रीम्स’ वगैरेंविषयी बोलण्याची भारी हौस वाटायला लागते, त्याविषयी बोलणं वगैरे चालू असायचं.
सोबत तोंडी लावायला संपीचे भन्नाट किस्से आणि वेंधळेपणा असायचाच. यावेळपर्यंत
संपीच्या मेसेज बॉक्स मध्ये आणखीही पाच-सहा नावं परमनंट झालेली होती. श्वेता, जाधव, श्रीनिवास, मयूर, निखिल इ.इ. श्रीनिवास born flirting master होता. तो संपीसोबत बोलताना क्लास
मधल्या इतर दहा मुलींविषयीचे किस्से आणि कोणाशी कसं फ्लर्ट करायचं याविषयी मजेशीर
गप्पा मारायचा. त्याच्या हेतुंबद्दल कधी शंका न वाटल्याने संपीपण मस्त बोलायची.
श्वेताला मयूर आवडायचा त्यामुळे ती सतत त्याच्याचविषयी बोलायची. पण, मयूर मात्र सिरियस हंक असल्यामुळे ‘हाय’ आणि मग ‘wassup’ च्या पलिकडे इछा असूनही फार काही बोलू शकायचाच
नाही. हो पण त्याला श्वेता आवडायची नाही हे मात्र त्याच्या बोलण्यावरून संपीला आता
समजलेलं होतं. ‘आपण
फारच कूल आणि स्मार्ट आहोत’ असा
समज असणारी काही पब्लिक असतेच जिथे तिथे. निखिल त्यापैकि होता. संपी त्याच्याशी
बोलणं सहसा टाळायचीच. नाहीतर मग त्याच्या त्या स्मार्टनेस ला काडीचाही भाव न देता
वाद घालायची. मग तोच निघून जायचा. संपीचं टेक्स्ट मेसेज टायपिंग स्किलही आता
प्रचंड सुधारलं होतं. एकावेळी चार-पाच चट्स चालू ठेवणं म्हणजे बाएं हात का खेल
झालेला होता. कधी कधी तर तिच्यासमोर कीपॅडच थकून जायचं पण ती नाही!
सुट्टी सुरू झाली म्हणता म्हणता संपलीही. आणि मग संपीची स्वारी पुन्हा
पुणे मुक्कामी येऊन पोचली. आता हॉस्टेल, कॉलेज इ.इ. चं नावीन्य बर्यापैकी कमी झालं होतं.
जड-जड रेफ्रेन्स बूक्स पण बोरिंग वाटायला लागलेली होती. इंजीनीरिंग पल्याडचं विश्व
खुणावू लागलं होतं. याच दरम्यान संपीच्या हातात Dan Brown ची जादुई दुनिया येऊन पडली. ‘द दा विन्सी कोड!’ बास. इतके दिवस बोकया सातबंडे किंवा
फारतर फास्टर फेणे ची मशागत झालेल्या तिच्या वाचिक मनाला एक नवंच विश्व दिसलं.
अक्षरश: दिवस रात्र एक करून संपी विन्सी कोड वाचत होती. बेड वर कुठल्या तरी कोनात
पालथी नाहीतर सुलथी पडलेली संपी, तिच्या डाव्या-उजव्या बाजूला एक डिक्शनरी, आणि असाच कुठेतरी पडलेला फोन असं चित्र रूममध्ये
तिन्ही त्रिकाळ दिसत होतं. एखादा शब्द अडला की डिक्शनरी उघडून त्याचा अर्थ पाहत, विन्सीच्या चित्रांमधले बारकावे शोधत
(जणू काही प्रोफेसर Langdon च्या आधी हीच होली ग्रेल शोधून काढणार अशा आविर्भावात) ती अक्षरश:
पुस्तकात घुसून ते वाचत होती. कॉलेज करून उरलेला पूर्ण वेळ ती हेच करत होती. आता
तिला मेसेजिंग मध्ये पण रस उरला नव्हता. आणि बोललीच तरी ती सगळ्यांशी फक्त विन्सी
कोडविषयीच बोलत होती. त्यामुळे तमाम जगाला संपी ‘विन्सी कोड’ वाचतेय हे ज्ञात झालेलं होतं. मंदारने ते आधीच
वाचलेलं असल्यामुळे तो भारी आव आणत बोलायचा. आपल्याला आवडत असलेलं पुस्तक
वाचलेल्या व्यक्तीशी बोलण्यात काय अद्वितीय आनंद असतो ते संपीला त्याच्याशी
बोलताना जाणवत होतं. भारत-अमेरिका संबंध किंवा साऊथ चायना सी वगैरे गंभीर आणि हॉट
विषयांवर चर्चा करत असल्याच्या आविर्भावात ते दोघे सोफी-langdon आणि होली ग्रेल विषयी बोलायचे.
दरम्यान त्यांच्या जुन्या ग्रुपमध्ये गेट-टुगेदरच्या विषयाने पुन्हा
तोंड वर काढलं. आणि एकदाचं एका रविवारी दुपारी ते ठरलंही. संपी सध्या विन्सी फिवर
मध्ये असल्याने रविवारी ठरलेल्या वेळेच्या तासभर आधी श्वेताचा फोन येईपर्यन्त
गेट-टुगेदरला आपल्याला जायचंय हे संपीच्या गावीच नव्हतं. मग झटकन विन्सी विश्वातून
बाहेर येत पटकन तयार होऊन संपी निघाली मॉडर्न कॅफे कडे..
‘तयार’ वगैरे
होण्याच्या संपीच्या concepts अजून बर्यापैकी बेसिकच असल्याने कपाट उघडल्यावर अंगावर येणार्या
पसार्यातून हातात आलेला त्यातल्या त्यात बरा असलेला एक ड्रेस अडकवून संपी
निघालेली होती. बस मध्ये बसल्यावर तरी तिला एकदा वाटूनच गेलं, पुस्तक घ्यायला हवं होतं का सोबत? बसल्या-बसल्या थोडं वाचून तरी झालं
असतं. इतक्यात मेसेज वाजला म्हणून तिने फोनकडे पाहिलं,
‘येतेयस ना..’ मंदार.
आत्ता तिच्या डोक्यात प्रकाश पडला आणि तिला जाणवलं, आपण खरंच सगळ्यांना ‘भेटायला’ जातोय. पहिल्यांदा. आणि तिथे मंदार पण असणार आहे!
तिची धडधड आता उगाच वाढली. काही झालं तरी मेसेजेस मधून बोलणं वेगळं आणि समोरा-समोर
भेटणं वेगळं. याच विचारात असताना तिची नजर तिच्या ड्रेस वर गेली. ‘शी दुसरा घालायला हवा होता का!’ ती स्वत:शीच पुटपुटली.
एवढ्यात तिचा स्टॉप आला. संपी बस मधून उतरली. आणि तिथून पाच-दहा मिंनिटांवर
असलेल्या मॉडर्न कॅफे कडे निघाली...
16
नेहमीसारखी गर्दी आणि तरीही निवांतपणा अंगावर घेऊन असलेला मॉडर्न कॅफे संपीला
दुरूनच दिसला. तिची पावलं आता झपाझप पडत होती. प्रचंड उत्सुकता आणि थोडीशी धडधड
मनात घेऊन ती कॅफेत शिरली. ‘अजिबात
वेंधळेपणा करायचा नाही’ असं
पुन्हा एकदा स्वत:लाच बजावत तिने पूर्ण कॅफे वरुन नजर फिरवली. एकदम मागे काचेच्या
बाजूला असलेल्या मोठ्या टेबल वर सगळे बसल्याचं तिला दिसलं. ती सोडून सगळेच एव्हाना
आलेले होते. उशिरा येण्याचा शिरस्ता संपीने इथेही चालूच ठेवला होता. काऊंटर कडे
तोंड असलेल्या निखिलला ती सर्वात आधी दिसली.
‘अरे संपदा आली..’ म्हणत
त्याने सर्वांचं लक्ष टेबलकडे येणार्या संपीकडे वेधलं.
संपी सगळ्यांकडे पाहत हसत-हसत येऊ लागली. श्वेता, मृणाल तिला तिथूनच हाय करत होत्या.
संपीने पण त्यांना हाय केलं. आणि या सगळ्या प्रकारात एका बाहेर आलेल्या आलेल्या
खुर्चीच्या पायात संपी अडखळली आणि पडता पडता अगदी थोडक्यात वाचली. मग स्वत:च्या
वेंधळेपणावर इतर कोणी हसायच्या आत स्वत:च हसली. कोपर्यात खिडकीशी बसलेला मंदार
तिला दुरूनच न्याहाळत होता. पण स्वत:च्या वेंधळेपणाच्या घाईत तो काही लगेच तिला
दिसला नाही. ती पुढे आली आणि श्वेताने तिच्यासाठी रिकाम्या केलेल्या खुर्चीवर जाऊन
बसली. नेहमीसारखं उत्सुकतेने भरलेलं लोभस खळाळतं स्मित होतंच तिच्या चेहर्यावर.
लहानपणापासून एकमेकांना ओळखणारे पण कधी फारसं समोरा-समोर न बोललेले हे
दहा-पंधरा चेहरे. सुरूवातीला नाही म्हटलं तरी थोडा awkwardness येतोच. चेहरे टाळून बोलायचं किंवा मग
नुसतीच चूळबुळ करायची असं बर्याच जणांचं चालू होतं. मग हळूहळू ‘अरे तो अमुक अमुक कोणत्या कॉलेजला
लागला रे?’ वगैरे
वळणानी जात वातावरण थोडंसं हलकं व्हायला लागलं. त्यातच श्रीनिवास सारखे हलके-फुलके
मेंबर्स असतातच सगळीकडे वातावरण खेळकर ठेवायला. तो त्याचे टुकार विनोद झाडायची
संधी अशावेळी सोडणार थोडीच होता. त्यात आजतर चार-पाच मुलीही होत्या समोर. त्याचा
स्वभाव आता बर्यापैकी कळलेला असल्यामुळे संपी त्याच्या विनोदांवर भरपूर हसत होती.
ती अशीच कशावर तरी हसत असताना तसं मोजकंच पण नेमकं बोलणारा मंदार तिच्याकडे पाहून
म्हणाला,
‘संपदा, ब्रांच
कुठली गं तुझी?’
संपीला क्षणभर काही कळलंच नाही. इतकावेळ तिने डोळ्यांच्या कोनातून
एक-दोनदा त्याच्याकडे पाहून घेतलं होतं खरं पण प्रत्यक्ष बोलली मात्र काहीच
नव्हती. पण आता हा असा अनपेक्षित प्रश्न ऐकून बावरली. दोघं रोज बोलायचे, तिची ब्रांचच काय पण अख्खा टिचिंग
स्टाफही एव्हाना त्याला पाठ झालेला होता. पण मग सगळ्यांपुढे हा असा प्रश्न का
विचारावा त्याने? ती
बुचकळ्यात पडली. आणि मग ततपप करत म्हणाली,
‘इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकॉम’
मंदार अतिशय शांत चेहर्याने तिची मजा घेत होता,
‘अच्छा.. आणि कॉलेज?’
प्रथमच बोलत असल्याचा आव आणत हा बोलण्यासाठी निमित्त शोधतोय हे
संपीच्या आता लक्षात आलं. पण चेहर्यावरचे भाव लपवण्यात ती त्याच्याइतकी निपुण
नव्हती. येणारं हसू दाबत उगाच खोकलल्याचा आव आणत मग तिने लक्ष श्वेताकडे वळवलं.
आम्ही रोज बोलतो किंवा आमची चांगली ओळख आहे वगैरे इतर कोणाला आत्ताच कळू नये असा
काहीसा मंदारचा त्यामागे विचार असावा असा अंदाज तिने बांधला.
निखिल संपीसमोर मेनूकार्ड सरकावत म्हणाला,
‘आमच्या सगळ्यांचं ऑर्डर करून झालंय. तू मागव तुला काय हवंय ते..’
संपीने ते मेनूकार्ड अथपासून इतिपर्यन्त परीक्षेचा पेपर वाचावा इतक्या
गांभीर्याने वाचून काढलं आणि मग काहीवेळाने त्यात खुपसलेलं डोकं बाहेर काढून
म्हणाली,
‘एक इडली-सांबर!’
निखिलने तिच्याकडे एक मिश्किल लुक देऊन वेटरला हाक मारली.
कुठेही, कुठल्याही
हॉटेल मध्ये जा, संपी
आधी सगळ्या पदार्थांची नावं वाचायची आणि शेवटी इडली-सांबार मागवायची. त्यामागे तो
एक आवडीचा आणि मुख्य म्हणजे ओळखीचा पदार्थ आहे हे महत्वाचं कारण असायचंच पण लहानशा
शहरातून आल्यामुळे फूड कल्चर, फूड
जोईंट्स, नावंही
वाचता येऊ नयेत असे नव-नवे पदार्थ पाहून का कोणास ठाऊक ती उगाच बावरायची आणि मग
आपला इडली-सांबार बरा म्हणत तेच मागवून मोकळी व्हायची. आजही तिने तेच केलं. तिचा awkwardness ओळखून मंदार तिला म्हणाला,
‘आपल्या गावातला पावशांकडचा इडली-सांबार खाल्ला आहेस तू कधी? सही असतो.’
आपल्या एकदम आवडीचं ठिकाण आणि आवडीच्या पदार्थाविषयी त्याला बोलताना
पाहून संपी भयानक खुश झाली आणि मग उत्साहाने तीही बोलायला लागली. मुळात ‘खाणे’ हा विषयच तिच्या फार जवळचा असल्याने ती त्यावर
कितीही वेळ बोलू शकायची.
बर्याच वेळापासून श्वेता संपीकडे पाहून काहीतरी असंबद्ध बोलत होती.
संपीला आधी कळलं नाही पण नंतर तिची ट्यूब पेटली. ती बोलत होती त्यातलं अर्धं-निम्म
समोर बसलेल्या मयूरला उद्देशून होतं. ती बिचारी त्याचं एटेन्शन मिळावं म्हणून काय
काय करत होती. पण मयूर मात्र तिच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करत संपीशीच अधून-मधून
थोडं-फार बोलत होता. या सगळ्यात संपी मात्र पुरती अवघडून जात होती. मग काही न
सुचून ती सरळ श्रीनिवास सोबत खिदळत बसली.
यथावकाश सगळ्यांनी मागवलेले पदार्थ आले. एरवी समोर आलेल्या पदार्थावर
लगेच ताव मारणारे सगळे आज मात्र उगाच नसलेला सभ्यपणा दाखवत बसले होते. शांतपणे
शिष्टाचार पाळत आपआपल्या पदार्थाकडे टकामका पाहत, हळूच दुसर्यांनी काय मागवलंय याचा धांडोळा घेत,
‘अरेच्चा, ते काय आहे. छानच दिसतंय, तेच मागवायला हवं होतं काय’ असे विचार मनात घोळवत, एकेक चमचा हळूच तोंडात सरकवत, समोरच्या बोलणार्याकडे आपलं पूर्ण
लक्ष आहे असं भासवत (ते अजिबातच नसताना) होते.
आपल्या संपीचं मात्र या कशाकडेही अजिबात लक्ष नव्हतं. तिचं
इडली-सांबार टेबलवर अवतरल्यापासून तिने प्रामाणिकपणे आपलं लक्ष त्याच्यावरच
केन्द्रित करून ताव मारायला सुरुवात देखील केली होती. आजूबाजूचे fanci दिसणारे पदार्थ पाहून ती अजिबातच
विचलित वगैरे होत नव्हती.
मृणालने मागवलेला wooden प्लेट मधला खालून वाफाळणारा आणि वर icecream असलेला ब्राउनी सदृश पदार्थ पाहून
श्रीनिवास मिश्किलपणे म्हणाला,
‘हे खायचं पण असतं का? बघूनच पोट भरल्यासारखं वाटायला लागलंय मला’
यावर मृणालने त्याच्याकडे एक जबराट, तुच्छतामिश्रित कटाक्ष टाकला आणि आपली ही लाइन
आता बंद झाली हे श्रीनिवासला कळून चुकलं. संपीकडे पाहून मग त्याने हळूच खीखी केलं.
त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करत मृणाल निखिलला उद्देशून म्हणाली,
‘अरे, तू
त्या अमुक-अमुक joint वरच्या waffles खाल्ल्यास का? बियॉन्ड yummy या..’
आपल्याला सगळ्यातलं सगळं कळतं असा आव आणणारा निखिल लगेच, ‘ओह यस यस.. delicious
they are!’ म्हणून मोकळाही
झाला.
Waffles हे नावच संपीसाठी नवं असल्याने तिने त्या
संभाषणाकडे जरासा कानाडोळाच केला. संपत आलेल्या इडलीवरुन तिचं लक्ष मग मंदार कडे
गेलं. कुठल्यातरी जगावेगळ्या नावाचं सॅंडविच खात तो मयूर सोबत mechanics वर चर्चा करत होता. ‘हा नेहमीच किती इंटेलेक्चुवल असतो..’ नकळत तिच्या मनात येऊन गेलं. बोलता
बोलता त्याचं लक्ष त्याच्याचकडे पाहणार्या संपीकडे गेलं. संपीने नजर इकडे-तिकडे
वळवली. तो हलकेच गालात हसला.
त्यानंतर मग एकमेकांची खेचत, चिडवा-चिडवी करत त्यांचं गेट-टुगेदर छान पार
पडलं. एकमेकांना भेटल्याचा आनंद सगळ्यांच्याच चेहर्यावरून ओसंडून वाहत होता.
पुन्हा भेटायचं आश्वासन देत सगळे पांगायला लागले. निघण्याच्या तयारीत असलेल्या
संपीकडे पाहून मंदार म्हणाला,
‘तुझं कॉलेज आणि हॉस्टेल त्या अमुक-अमुक भागात आहे ना..?’
‘हो’
‘माझी बहीण तिकडेच राहते.. मी आज तिच्याचकडे जातोय. चल सोडतो तुला’ तो जागचा उठत म्हणाला.
हे वाक्य ऐकून संपीच्या पोटात का कोण जाणे फुलपाखरं उडायला लागली.
थोड्याशा नर्वसपणे आणि बर्याचशा आनंदात ती त्याला,
‘हो चालेल..’ म्हणाली.
आणि मग दोघेही जायला निघाले.
17
मावळलेला दिवस, लखलखणारे
दिवे, रस्त्यावरची
वाहनांची वर्दळ, आणि
मंदारच्या स्कूटीवर डबलसीट
बसलेली संपी.. तिला आज जणू आपल्याला पंख फुटलेयत आणि आपण हवेत तरंगतोय असं वाटायला
लागलं होतं.
‘मग, कसं
चालूये सेकंड सेमिस्टर?’ मंदारने
विचारलं.
‘ते.. चालूये ठीक-ठाक’ संपी उत्तरली.
‘ठीक-ठाक?
Why?’
‘अरे म्हणजे, चालूये.
खरं सांगू का मला सध्या dan brown सोडून दुसरं काही दिसतच नाहीये. कसलं भारी लिहतो
तो.. कमालच एकदम.’
‘हाहा.. प्रेमात पडलीस की काय त्याच्या?’
‘हेहे.. वेरी फनी. पण तो भारीये. आता त्याची सगळी पुस्तकं वाचून काढणार
मी.’
यावर स्कूटी चालवत चालवत डोक्याला हात लाऊन मंदार म्हणाला[PD1] ,
‘नाई वाच तू.. पण, अधून-मधून
थोडं आमच्याशीही बोलत जा.. एकदा गायब झालीस की गायबच होतेस’
‘हो का.. तूच बिझी असतोस तुझ्या ‘इंटेलेक्चुवल’ फ्रेंड्स मध्ये..’
‘इंटेलेक्चुवल?’
‘हो.. तू एक हुशार आणि तुझे फ्रेंड्स पण तसेच हुशार वगैरे..’
‘हाहा.. काहीही. आणि तू हुशार नाहीयेस असं कोणी सांगितलं तुला?’
‘हुशार म्हणजे.. ठीक-ठाक ए मी. तुझ्याइतकं पळत नाही बाबा माझं डोकं..’
इतक्यात मंदारने गाडी साइडला घेत बंद केलेली पाहून संपी बोलायची
थांबली. आणि मग आजूबाजूला पाहत, गाडीवरून उतरुन स्वत:वरच हसत म्हणाली,
‘अरेच्चा! आलं
होय हॉस्टेल माझं. कळलंच नाही मला.’
मंदार तिच्या त्या धांदलीकडे आणि तिच्याकडे शांतपणे पाहत होता.
क्षणभराने थोडीशी चुळबुळत संपीच म्हणाली,
‘असा काय पाहतोयस तू..’
‘पाहतोय.. शाळेतली ती दुरून वेंधळी, गबाळी, अबोल आणि तरीपण खूप सुंदर वाटणारी संपी जवळून कशी
दिसते ती..’
तो कमालीचा सिरियस. हे ऐकून संपीची चुळबुळ आता शिगेलाच पोचली. तिला
आतून ते जाम आवडलेलं होतं अर्थात.
‘तुला आठवते शाळेतली मी?’
‘आठवते का म्हणजे? अगदी
क्रिस्टल क्लियर आठवतेस. कोपर्यात, घोळक्यात बसलेली, आपल्याच
विश्वात गुंग असणारी, पंजाबी
ड्रेस मधली तू.. तुझा एक मोरपंखी रंगाचा ड्रेस होता.. खुपवेळा तोच घालायचिस. आवडता
होता काय..’
हे ऐकून तर संपी आता चाटच पडली. ‘ह्याचं इतकं लक्ष होतं आपल्याकडे?? कधी?’ खरंतर मंदार म्हणजे topper होता. सगळ्या शिक्षकांचा, विद्यार्थ्यांचा फेव्हरेट!
‘हो अरे तो एकदम फेव्हरेट होता माझा. आईशी भांडून घेतला होता. पण तो
ड्रेस मी सोडून बाकी कोणालाच कधीच आवडला नाही.. सगळ्या मैत्रिणी हसायच्या मला. पण
मी कै तो घालायचा सोडला नाही.’ यावर हसत तिने त्याला टाळी द्यायला हात वर केला. तो मात्र शांत
नेहमीप्रमाणे.
वर गेलेला हात खाली घेत संपी म्हणाली,
‘तू हसत वगैरे नाहीस का रे? सीरियस हंक!’
यावर पुन्हा एक लहानसं स्मित करून तो शांत झाला. आणि मग तिला
प्रतिप्रश्न करत म्हणाला,
‘आणि तू कायम हसतच असतेस का?’
यावर जरासा विचार करून, आणि आठवून ती म्हणाली,
‘हो म्हणजे ऑल्मोस्ट.. मी एकतर झोपते.. नाहीतर खाते.. नाहीतर मग हसत
असते..’
‘हाहा.. ब्लेस्ड यू आर..’ मनापासून हसत तो म्हणाला.
‘ब्लेस्ड? का..’
‘अगं म्हणजे.. यू आर सिम्पल.. लायव्ली. नॉट अॅट ऑल कॉम्प्लिकेटेड..
म्हणून म्हणालो.. मी नाहीये असा. आय’म introvert टाइप्स.
खूप विचार करणे, कमी
बोलणे वगैरे गुणधर्म.’
‘हम्म.. पण तेच भारी वाटतं. कसला composed वाटतोस तू माहितीये.. विचार करून
उत्तर देणं वगैरे.. मला कधी जमेल की..’
‘कशाला जमायला हवंय. जशी आहेस तशीच खूप भारी आहेस. डोन्ट चेंज!’
यावर संपी त्याच्याकडे पाहत जराशी हसली.
‘चल, उशीर
झालाय.. ताई वाट पाहत असेल. निघतो मी. It was Nice to meet you 😊 ’
‘हो.. चालेल.. बाय.. आय मीन सेम हियर..’ संपी स्वत:च्या वेडेपणावर पुन्हा हसली.
तिच्याकडे पाहत हसत त्याने गाडी स्टार्ट केली.
संपी आज रोजच्या पेक्षा जराशी जास्तच हसत होस्टेलवर आली. मीनल तिचं ते
ध्यान पाहतच होती.
‘संपे, क्या
हुआ? कुछ ज्यादाही
खुश लग रही है आज.. क्या बात है..’
संपी तिने विचारण्याचीच वाट पाहत होती. तिने मीनलला लगेच तिच्या
गेट-टुगेदरचा पूर्ण वृत्तान्त ऐकवला. श्रीनिवास कशी मजा करत होता, श्वेता कशी वेड्यासारखी वागत होती, वगैरे वगैरे सगळं. हो पण, मंदारचा उल्लेख मात्र तिने क्वचितच
केला.
याने समाधान न होऊन मीनल म्हणाली,
‘बस.. इतनाही? मुझे
तो कुछ औरही लग रहा है..’
‘कुछ और म्हणजे?’
‘तू ही बता.. क्या हुआ है?’
इतकावेळ कसंतरी पोटात ठेवलेलं मंदार प्रकरण मग संपीने शेवटी तिला
सांगूनच टाकलं. त्याने कसं तिला इथवर सोडलं, काय काय म्हणाला.. सगळं!
‘मुझे पता था.. पहलेसेही.. जैसे तुम दोनो लगे रहते हो ना मोबाइल पे..
पता था मुझे..’ एखादा
खजिना सापडावा अशा आनंदात मीनल बोलत होती. पण, तिच्या बोलण्याचा काही अर्थ न लागून संपी म्हणाली,
‘काय? क्या
पता था तुझे?’
‘यही.. की वो पसंद करता है तुझे..’
‘चल काहीपण..’ संपी
ती गोष्ट नाकारत म्हणाली.
‘तू कुछ भी कह.. लेकीन है तो ऐसाही..’ मीनल मात्र ठामपणे म्हणाली.
संपीला तिचं म्हणणं आतून सुखावत तर होतं. पण ते खरं मानायला ती अजून
तयार नव्हती. याच विचारात मग तिला बेडवर पडलेलं विन्सी कोड दिसलं. झालं. बाकी सारं
विसरत तिने त्याच्यावर पुन्हा उडी मारली आणि त्या विश्वात कधी हरवून गेली तिचं
तिलाही समजलं नाही.
डिक्शनरीत एकेक शब्दाचा अर्थ पाहत पालथं पडून पुस्तक वाचणार्या
संपीकडे पाहून मीनल हसत म्हणाली,
‘क्या होगा इस लडकी का क्या पता..’ आणि ती स्वत:च्या कामाला लागली.
थोड्यावेळाने संपीच्या फोनने टुन्न केलं. पुस्तकातलं डोकं काढून तिने
फोनकडे पाहिलं,
‘विन्सी वाचत असशील.. हाय सांग तुझ्या Dan ला..
बाय द वे, फेल्ट
नाइस टूडे. असे गेट-टुगेदर्स अरेंज केले पाहिजेत आपण वरचेवर..
यापुढे एक विंकिंग स्मायली..’
मंदारचा मेसेज. तो वाचून संपी हसली. तिला मीनलचं बोलणं पुन्हा आठवलं.
पण लगेच तो विचार बाजूला सारत,
‘हो खरंच’ असा
रीप्लाय टाइप करून ती पुन्हा तिच्या पुस्तकात शिरली. आणि ते हातात घेऊनच कधीतरी
गाढ झोपीही गेली..
18
‘संपे उठ.. संपे.. संपदा.. अरे आज कॉलेज नई आना क्या तुझे?’
बेडवर पालथी झोपलेली संपी ढिम्म हलली नाही. तिच्या स्वप्नात ती अजून
विन्सी कोड मध्येच होती. Uniform घालून तयार असलेल्या मीनलने शेवटी तिच्या
अंगावरचं पांघरूण खसकन ओढलं आणि म्हणाली,
‘उठ जा यार चल.. आज शायद रिजल्ट आयेगा.’
रिझल्ट हा शब्द ऐकून मात्र संपी खाड्कन उठून बसली,
‘काय? रिजल्ट? कुठे? कधी?’
‘आज. अभी. उठ. चल. नाही तो फर्स्ट लेक्चर गया..’ मीनल गडबडीने म्हणाली.
संपी डोळे चोळत उठली. आणि ब्रश कडे धावली. पण पाहते तर रोजच्या जागी
ब्रश काही दिसेना. पिंजरलेले केस खाजवत, अर्धवट झोपेत, मीनलची नजर टाळत ती ब्रश शोधायला लागली.
‘अरेच्चा.. गेला कुठे हा.. इथेच तर होता. Dan ने गायब केला वाटतं. हीही’
त्या अति घाईच्या वेळेत आणि अर्धवट झोपेतसुद्धा संपीला असले फालतू
जोक्स crack करताना
पाहून मीनलने डोक्यालाच हात लावला. एवढ्यात तिला संपीच्या बेडवर पडलेल्या विन्सी
कोड मधून टूथब्रशचं डोकं बाहेर डोकावताना दिसलं. संपीने ते काल रात्री चक्क
बूकमार्क म्हणून वापरलं होतं आणि आता साफ विसरून गेली होती.
‘हां.. उसिने गायब कीया है.. वो देख..’ मीनल रागातच म्हणाली.
‘अरेच्चा! हो
रात्री मीच घेतलं होतं..’ संपी
हसत दात घासायला पळाली.
दोघी कॉलेज मध्ये पोचतायत तोवर पहिलं लेक्चर अर्थातच सुरू झालेलं
होतं. आणि आज ते चक्क mechanics चं होतं. Mechanics म्हणजे टेंशन हे आता संपीच्या डोक्यात फिक्स झालेलं. शिकवणार्या
प्राध्यापिका बाईही कमालीच्या खडूस होत्या. मीनलच्या मागे लपून संपी वर्गात शिरली
आणि ठरलेला मागचा बेंच पकडून बसली. रिझल्टच्या बातमीमुळे आज वर्गात लक्ष तसं
कोणाचंच नव्हतं. प्रत्येकीच्या मनात नाही म्हटलं तरी धाकधूक होतीच. पहिलं लेक्चर
झालं, दुसरं झालं, तिसरं झालं, recess ही उरकला. पण रिझल्टचं नामोनिशाण
काही कुठे दिसेना. आता आज काही तो लागत नाही म्हणत सगळे बर्यापैकी निर्धास्त झाले
होते. संपी तर शेवटचं लेक्चर बंक करून विन्सी चे राहिलेले शेवटचे ५० पेजेस वाचून
काढावे या विचारात होती पण तितक्यात कोणीतरी धावत वर्गात बातमी घेऊन आलं. ‘रिझल्ट लागलाय!’
झालं. सगळ्यांच्या पोटात नाही म्हटलं तरी गोळा आलाच. इंजीनीरिंगचा हा
पहिला निकाल. नंतर नंतर सेकंड, थर्ड इयर ला ‘अरे आज
निकाल आहे. चल आधी एखादी मूवी टाकून येऊ. कसा लागेल काय माहित.’ वगैरे गेंड्याची कातडी टाइप्स
अॅटीट्यूड बनत जातो. पण पहिल्या सेमिस्टरच्या निकालाची मात्र सगळ्यांनाच धास्ती
आणि उत्सुकताही असते. संपीच्या ग्रुपची अवस्थाही काही वेगळी नव्हती. ती, मीनल, मेघा, प्राजक्ता चौघी एकमेकांचे हात घट्ट धरून गेल्या
रिझल्ट पहायला. लिस्ट मध्ये नाव शोधताना मनाची जी काही अवस्था होत असते ना तिची
तुलना कशाशीच होऊ शकत नाही. प्राण डोळ्यांत आणून संपीची नजर स्वत:चं नाव शोधत
होती.. पण तिच्या आधी ते मीनलला दिसलं.
‘संपे, इधर
इधर..’ तिने संपीला
जवळ-जवळ ओढलंच.
संपीने ते पाहिलं. ‘संपदा मिलिंद जोशी..’ आणि पुढे विषयवार पास.. पास.. पास.. दिसत गेल्यावर तिचा जीव भांड्यात
पडायला लागला. आणि सगळ्यात शेवटी एकूण ‘पास’ दिसल्यावर तर ती ‘हुश्श..’ असं मनातल्या मनात म्हणालीही.
यथावकाश मीनल आणि प्राजक्ताही संपीप्रमाणेच ‘क्लियर’ होत्या. मेघाचा मात्र एक backlog आला. तिच्या सांत्वनाखातर चौघी मग
बर्याचं फिरल्या आणि तिला फ्रेश करण्याच्या नादात रग्गड पोटपुजा करत स्वत:च ‘फ्रेश’ झाल्या.
पहिलं सेमिस्टर तरी संपीने सही-सलामत पार केलं होतं. आता तिला थोडाफार कॉन्फिडंस
आलेला होता. मुलांची वाटणारी भीतीही आता कमी झाली होती. समोर मुलं दिसली तर ती मान
खाली घालून किंवा वाट बदलून वगैरे आता जायची नाही.
या काळात तिला अजून एका गोष्टीची प्रथमच जाणीव झाली, ती म्हणजे ‘आपण ‘छान’ वगैरे दिसतो!’. मंदार अधून-मधून हे तिला म्हणायचाच. पण, श्री-मयूर देखील बर्याचवेळा या
गोष्टीचा उल्लेख करायचे. ‘दिसणं’ या गोष्टीविषयी इतके दिवस पुर्णपणे
अनभिज्ञ असलेली ती, किंवा
आतून कुठेतरी स्वत:लाच अन्डररेट करणारी ती आता ‘आरशात’ पहायला लागली होती. मीनलमुळे नुकतीच तिची ‘पार्लर’ या गोष्टीशी ओळखही झाली होती. त्यामुळे, एकूण राहण्या-वागण्यातला गबाळेपणा
काही अंशी कमी झालेला होता. गळयातली ओढणी जाऊन आता tshirts आले होते. केसांची लांबी कमी झाली
होती. कोरलेल्या भुवयांमुळे टपोरे डोळे आता आणखीच खुलून दिसायला लागले होते.
हे सगळे दृश्य, बाह्य
बदल सोडले तर आतूनही ती आता बदलायला लागली होती. विचार करण्याची पद्धत बदलत होती.
चूक-बरोबरच्या संकल्पना बदलत होत्या. आयुष्य नावाची गोष्ट दोन्ही हात पसरून तिला
खुणावत होती. अगणित स्वप्नं, धुंदावणारे
दिवस, मैत्रिणींसोबतचा
कल्ला, जुन्या मित्र-मैत्रिणीसोबत
गप्पा, नवीन विषयांशी
होत असलेली ओळख, ऋतू-निसर्ग-भोवताल-माणसं-देश-राजकारण-जग या सगळ्यांचं नव्याने येऊ लागलेलं भान, ते व्यक्त करण्याची अपार ओढ, मंदारसोबत होत असलेल्या अभ्यासा
बरोबरच अवांतर चर्चा, त्यातून
त्याचं वचन आणि आवाका किती मोठाय याची तिला होणारी जाण, आणि परिणामी तिचाही वाढत जाणारा
अभ्यास या सार्यात संपी कमालीची बदलत चालली होती. एक गोष्ट मात्र कायम होती ती
म्हणजे तिच्यातला निरागसपणा.. चार-चौघात उठून दिसेल असा तिचा तो दुर्मिळ दागिना
होता आणि तोच सगळ्यांना तिच्याकडे आकर्षितही करायचा.
दिवस भराभर जात होते. अशातच एक दिवस संपी आणि मंदारची अजून एकदा अगदी
न ठरवता भेट झाली. निमित्त होतं रोबोटिक्स workshop चं.. बदललेल्या संपीला प्रथम त्याने
ओळखलंच नाही. आणि जेव्हा ओळखलं तेव्हा तिच्याकडे पाहतच राहिला.. तो दिसताक्षणी
संपी उत्फुल्ल हसत त्याला सामोरी गेली तेव्हा क्षणभर काय बोलायचं ते त्याला सुचलंच
नाही..
19
‘अरे काय..
तू पण इथे?’ ब्लॅक
टी-शर्ट आणि ब्ल्यु जीन्स घातलेली संपी मंदारच्या टेबलकडे येत म्हणाली.
मंदार त्याच्या तीन-चार मुलं-मुली असलेल्या ग्रुपसोबत बसून workshop सुरू होण्याची वाट पाहत होता. दुरूनच त्याला संपी येताना दिसली. पण
आधी ही कोण मुलगी आणि अशी काय फार ओळख असल्यासारखी एकदम बोलतेय असं त्याला वाटलं.
पण, मग ती जवळ
आल्यावर ही आपली संपी आहे हे त्याच्या लक्षात आलं. आणि तो अक्षरश: अवाक झाला.
त्याच्या ग्रुपमध्ये जवळ-जवळ घुसून संपी तिचं नेहमीसारखं उत्फुल्ल हसू चेहर्यावर
झळकवत मंदारपाशी आली. तो असा अचानक भेटल्याचा आनंदही होताच त्यात. पण, तिच्यातल्या बदलांनी आश्चर्यचकित
झालेल्या त्याचं मात्र ती जवळ आल्याने एकदम लाजाळूचं झाडच झालं. त्यात त्याच्या
मित्र-मैत्रिणींच्या नजरा या दोघांवरच खिळलेल्या. क्षणभर त्याच्या तोंडातून शब्दच
बाहेर आले नाहीत. पण मग लगेच सावरत तो तिला म्हणाला,
‘अगं हो, अगदी
लास्ट मिनिट ठरलं माझं.. तूही काही म्हणाली नाहीस रजिस्ट्रेशन केलंयस वगैरे..’
‘अरे हो.. त्याची ना गम्मतच झाली. माझंही लास्ट मिनिटच ठरलं.
अॅक्चुअल्ली मीनल म्हणलेली सनडे आहे तर ट्रेकला जाऊ. तर आम्ही जाणार होतो ट्रेकला.
सकाळी सहाला निघायचं ठरलेलं. पण ना अरे मी उठलेच नाही :D. नऊ वाजता रागावून तिने पाण्याची बदली ओतल्यावर
मला जाग आली. मग काय मॅडम बसल्या ना माझ्यावर फुगून. तिचा रुसवा काढता काढता
माझ्या नाकी नऊ यायला लागले. तितक्यात वरच्या फ्लोरवरची रेवा आली या workshop विषयी सांगत. तिच्या ग्रुपमधल्या
दोघींनी ऐनवेळी तिला टांग दिली होती. मग मला संधीच मिळाली. खूप छान असतं, खूप छान असतं म्हणत मीनलला कसंतरी
समजावल आणि आम्ही आलो इथे. आता कुठे ती माझ्याशी बोलायला लागलीये..:D’
संपीचं हे मोठ्या आवाजातलं आणि हशांनी भरलेलं पुराण ऐकून मंदारने
डोक्यालाच हात लावला. मुख्य म्हणजे हे सगळं ती त्याच्या अख्ख्या ग्रुपसमोर सांगत
होती. अर्थात त्याचं तिला काहीच गम्य नव्हतं. पण प्रत्येक गोष्ट तोलून-मापून, विचारपूर्वक, उद्या बोलायच्या गोष्टींची पण आजच तयारी
करणार्या मंदारला मात्र उगाच कसंतरी झालं. त्यात आता त्याच्या मित्र-मैत्रिणीच्या
चेहर्यावर अवतरलेले ‘कोणय
ही?’ असं
प्रश्नचिन्ह आणि ‘आम्हीही
इथे आहोत!’ असं
उद्गारवाचक चिन्ह दोन्ही त्याला लख्ख दिसले.
मग ती अजून काही बोलायच्या आत उगाच जरासा घसा खाकरत त्याने तिची
सगळ्यांशी ओळख करून दिली. तिनेही सगळ्यांना हाय केलं. आणि ती आता त्यांच्याशीही
गप्पा मारण्याच्या बेतात असताना त्याने तिला जवळपास ओढूनच बाजूला आणलं.
‘अरे! काय
झालं? तू बोलायचास ती
मैत्रेयी हीच का.. क्यूट ए फार.. बोलू दे ना मला..’
‘अगं हो जरा हळू.. इतक्या वेगाने तर मॅथ्सचे प्रोब्ल्म्स पण सोडवत नाही
मी. एकतर धक्क्यांवर धक्के देतेयस आणि बोलणं! श्वास तरी घे.. हे सगळे आत्ता शांत
वाटताहेत. नंतर चिडवतील मला..’
‘कसले धक्के? आणि
तुला का चिडवतील सगळे?’
यावर मग पुन्हा स्वत:च्याच डोक्याला हात लावत हसू लपवत तो म्हणाला,
‘ते सोड.. हे इतकं बोलायला कधी शिकलीस गं तू? शाळेत तर तोंडातून शब्द फुटायचा
नाही.’
‘हाहा.. कोणी सांगितलं तुला. तेव्हाही मी अशीच बडबडायचे. फक्त माझ्या
ग्रुपमध्ये. आता सगळीकडेच बडबडते. हाहा एवढाच काय तो बदल.’
‘एवढाच? आणि हे
काय आहे.. मी ओळखलंच नाही आधी तुला.. संपीची samy झालीयेस तू..’
मग स्वत:कडे पाहत तिची ट्यूब पेटली आणि ती म्हणाली,
‘अरे हो.. तुला सांगायचंच राहिलं ना.. ती पण फार मोठी गम्मत आहे..’
एवढ्यावर तिचं वाक्य मध्येच तोडत तो म्हणाला,
‘राहुदे राहुदे. गमती आपण नंतर डिसकस करू.. workshop सुरू होईल आता..’
इतक्यात संपी कुठे दिसत नाही म्हणून तिला शोधत मीनल तिथे अवतरली. आणि
तिला पाहून पुन्हा तितक्याच उत्साहाने तिने तिची आणि मंदारची ओळख करून दिली.
त्याला तिथे पाहून मग मीनल म्हणाली,
‘अच्छा.. तो इसलीये आना था तुझे यहा..’
यावर संपी, ‘अगं नाही
गं.. मला माहितच नव्हतं. अगदी अचानक भेटलो आम्ही..’ असं काहीतरी म्हणाली.
मीनलकडे पाहून मंदार म्हणाला,
‘थॅंक यू..’
मीनलला प्रश्न पडला.
‘का?’
‘संपीच्या मेकओवर साठी गं.. नाहीतर हिच्या आईबाबांना प्रश्न पडला होता
या गबाळीशी लग्न कोण करणार असा..आता बघ रांग लागेल.’
यावर मीनल आणि मंदार दोघेही खोखो हसले.
‘ए गप रे तू.. खडूस कुठला. असा काही प्रश्न नाही पडला बरं आईबाबांना.
आणि मुळात मी लग्नच करणार नाहीये.. सो चिल्ल..’
‘ओह असं का.. हा नवीन विचार वाटत सध्याचा..’ मंदार मिश्किलपणे म्हणाला.
‘गप रे तू.. जा सुरू होईल workshop.’ संपी चिडून म्हणाली.
‘हो हो जातोय..
आणि हळूच जाता-जाता कानात, ‘छान दिसतेयस!’ असं म्हणून मंदार त्याच्या ग्रुपमध्ये जाऊन
मिळाला.
नाही म्हटलं तरी संपी जराशी लाजलीच.
पुढे workshop सुरू झालं. पण दोघांचंही अर्धं-निम्म लक्ष एकमेकांकडेच लागलेलं होतं. त्यात
अर्ध workshop झाल्यावर
संपीच्या मोबाइलवर मंदारचा मेसेज झळकला,
‘कॉफी आफ्टर workshop? यू अँड मी..?’
संपी गालात हसली. आणि तिने रीप्लाय केला,
‘hmmm.. विल थिंक अबाऊट इट..;)’
त्यावर लगेच मंदारचा रीप्लाय,
‘तू आणि थिंक?? हाहा’
यावर मग रागाने लाल झालेली दोन तोंडं तिने त्याला रीप्लाय म्हणून
पाठवून दिली.
आता दोघेही workshop संपण्याची वाट पाहू लागले होते..
20
‘अरेच्चा.. पाऊस काय पडायला लागला अचानक..’
ऐन चैत्रात पावसाची सर पाहून मंदारने आश्चर्य व्यक्त केलं आणि गाडी
लगेच बाजूला घेतली. पण, पावसाचा
जोर एवढा की तेवढ्यातही दोघे
जरासे भिजलेच. छान संध्याकाळ होती. अंधार पडायला अजून बराच अवकाश होता. रस्ता
प्रशस्त आणि झाडांनी भरलेला होता. एका झाडाखाली दोघे थांबले. प्लान बिघडणार की काय
म्हणून मंदारच्या चेहर्यावर नाही म्हटलं तरी आठी उमटली. संपी मात्र तो पाऊस पाहून
जाम खुश झाली. तिचं मन अजूनही अंगणातल्या पावसात खेळणार्या अल्लड मुलीप्रमाणेच
होतं. हात पुढे करून ते पाउसकण हातात झेलत तिने एकवार मंदारकडे पाहिलं तर तो
खट्टू.
‘काय रे काय झालं? चेहरा
का पडलाय असा?’
‘आपला प्लान बिघडवणार बहुतेक हा पाऊस..’ मंदार पावसाकडे पाहत म्हणाला.
‘कसला प्लान? कॉफीचाच
ना? काय तू.. इतका
मस्त पाऊस पडतोय. वातावरण बघ कसलं भारी झालंय. उलट आभार मान त्याचे. ती बघ तिकडे
समोर चहाची टपरी दिसतेय.. पाऊस थोडा ओसरला की तिथे जाऊन मस्त आल्याचा चहा घेऊ.
सोबत भजी मिळाली तर बहारच! पावसाचाच प्लान बेस्ट ए scholar!’
तिच्या त्या पावसा सारख्याच निखळ, चैतन्याने रसरसून भरलेल्या हसण्याकडे आणि
बोलण्याकडे मंदार पाहतच राहिला. खरंच होतं की तिचं. हा असा मस्त पाऊस, सोबतीला ती अजून काय हवं! कॉफी हुकली
म्हणून खट्टू झालेल्या स्वत:चच मग त्याला हसू आलं.
‘हम्म.. कधी कधी बोलतेस तू लॉजिकल!’
‘हो का? मिस्टर.
प्रॅक्टिकल!..
..bdw, काय बोलणार होतास.. why कॉफी अँड ऑल?’
‘काही नाही गं.. शहाण्यासारखं खूप वागून झालं. तुझ्याकडून थोडासा
वेडेपणाचा डोस घ्यावा म्हटलं. मग बॅलेन्स होईल सगळं..’
तिची फिरकी घेण्याच्या सुरात तो उत्तरला.
‘वा रे शहाणं बाळ.. मला वेडी म्हणतोयस?’
‘यस.. इन ए गुड वे.. अॅक्चुअल्ली समटाइम्स आय एन्वी यू.. असं
तुझ्यासारखं सहज, सोपं
जगता नाही येत मला..’
यावर संपी जराशी शांत राहिली. तिला पुन्हा मीनलचं बोलणं आठवलं.
‘काय पाहतेयस अशी? प्रेमात
वगैरे पडलीस का काय माझ्या?’ डोळे
मिचकावत मंदारने विचारलं.
त्यावर आपल्या मनातला विचार याला ऐकू गेला की काय म्हणत तिने ते साफ
झिडकारलं.
‘प्रेमात? ह्या..
मी मुळात लग्नच करणार नाहीये!’
‘लग्न?? मी
फक्त प्रेमाविषयी बोललो.. तू लग्नापर्यन्त जाऊन पोचलीस.. याने कुछ तो जरूर है..’ मिश्किल हसत त्याने पुन्हा तिची
फिरकी घेतली.
संपी आपला बावळटपणा पाहून अजूनच वैतागली,
‘ए गप रे तू.. मी नाही पोचले कुठेही. ते आपलं मी जस्ट क्लियर केलं.. ती
तुझी मैत्रेयी आहे बघ तुझ्या प्रेमात.. कशी पाहत होती तुझ्याकडे..’
‘माझी मैत्रेयी?? हाहा
काहीही.. जळण्याचा वास येतोय कुठूनतरी..’
‘शी.. मी आणि जलस? हाहा..
फनी.. पण, ती आहे
खरंच तुझ्या प्रेमात..’
‘नाही गं.. मैत्रीण आहे फक्त.’
यावर संपी काहीच म्हणाली नाही.
मंदारने मग फोन ऑन करून एफएम सुरू केलं.. पावसाळी वातावरण पाहून
त्यावर नेमकं सलील-संदीपचं,
‘तुझ्या माझ्यासवे कधी गायचा पाऊसही
तुला बोलावता पोहोचायचा पाऊसही’ हे गाणं लागलं.
आजचा दिवस नक्कीच काहीतरी वेगळा उगवला होता. सगळं भलतंच घडत होतं.
त्या गाण्याने दोघेही जरासे अवघडले. दोघांनी आधी एकमेकांकडे पाहिलं आणि नंतर
हवंहवंसं ते गाणं, धुंदावणारं
वातावरण, एकमेकांची
सोबत अनुभवत एकमेकांकडे पाहणं मात्र टाळलं. मनातलं डोळे बोलून गेले तर काय! गाणं
पुढे जात राहिलं..
... कशी भर
पावसातही आग माझी व्हायची
तुला जेव्हा असा बिलगायचा पाऊसही..
या ओळींवर मात्र त्याने तिच्याकडे पाहिलंच. तिने नजर पुन्हा टाळली.
लाजण लपवू पाहणार्या अर्धवट ओलेत्या तिच्याकडे तो पाहतच राहिला..
पुढे कधीतरी गाणं संपलं.
पावसाची अवचित सर आली तशी रस्ता ओला करून गेलीही. रस्त्यावर पुन्हा
तिन्हिसांजेचं केशरी उन्ह पसरलं. खूपच आल्हादायक वातावरण. संपीच्या आग्रहाखातर मग दोघेही
चहाच्या टपरीवर फक्कड चहा प्यायला गेले.. चहा पित पित संपीचे धमाल किस्से आणि
बोलणं, मंदार ऐकत कमी
आणि तिच्याकडे पाहत जास्त होता. दोघांनाही एकमेकांसोबत असं असणं जाम भारी वाटत
होतं. पण, मनातलं
ओठांवर काही येत नव्हतं. खूप हसत आणि एकमेकांना चिडवत मग त्यांची ती संध्याकाळ
अगदी मजेत गेली.
तिला हॉस्टेलवर सोडून मंदार परतला. तिच्यासोबत असणं त्याला आता फार
हवंहवंसं वाटायला लागलं होतं. तिचीही अवस्था काही वेगळी नव्हती. दोघांतली मैत्री
आता घट्ट होत चालली होती. नातं खेळकर व्हायला लागलं होतं. ते आता पुढच्या
टप्प्यावर न्यायचं की नाही, जाऊ
द्यायचं की नाही या संभ्रमात दोघेही होते. एकतर करियर दोघांच्या दृष्टीने महत्वाचं
होतं आणि इतक्यात केलेली कमिटमेंट आपल्याला नंतर खर्या अर्थाने किती काळ निभावता
येईल याची भीतीही दोघांना वाटत असावी. आणि तो विचार न करता भावनावेगात पुढे पाऊल
टाकण्याइतके अविचारी दोघेही नव्हते. त्यामुळे स्टेटस quo maintain करण्याकडे दोघांचा कल होता.
त्या रात्री बेडवर पडल्या पडल्या संपीच्या मनात पुन्हा पुन्हा
मंदारचेच विचार येत होते. आल्यापासून मीनलही पुन्हा पुन्हा तिला त्यावरूनच चिडवत
होती. पण याबाबतीत ‘वाटतंय’ म्हणून पटकन बोलून टाकणार्यांपैकी
संपी नव्हती. जे व्हायचंय ते होईल म्हणत शेवटी तिने तो विषय बाजूला सारला. आणि
कानांत हेडफोन्स घालून एफएम वर ‘पुरानी जीन्स’ ऐकत
बसली..
21
बापरे! शेवटचं कधी लिहलंय मी यात.. किती दिवस झाले डायरी उघडून!
पूर्वी नेहमी काहीतरी करायचे हिच्यासोबत. आता कमी आय मीन बंदच झालंय. अरे हां..
तेव्हा मोबाइल नव्हता नाही का माझ्याकडे. आता आहे. आणि अर्धा निम्मा वेळ त्यातच तर
जातो. श्रीनिवास भलतीच मज्जा करत असतो. परवा तर चालू लेक्चर मध्ये त्याचा मेसेज
वाचून मोठयाने हसले मी. सगळे आधीच वेडी समजतात त्यादिवशीपासून ठार वेडी समजतायत.
वेडी वरुन आठवलं, मंदार
पण वेडी म्हणाला काल मला. आणि म्हणे, ही इज एन्वी ऑफ माय madनेस! हाहा..
काहीतरीच बोलतो. भलताच हुशार आहे बाबा तो. म्हणजे दडपण यावं इतका. मी म्हणते कशाला
असावं इतकंही हुशार वगैरे. साधं-सोपं असावं मस्त. तरी आता कै मी घाबरत नाही
त्याच्या त्या औराला. पूर्वी यायचं दडपण. आता मज्जा येते. जमेची बाजू म्हणजे माझं
इंग्लिश फारच सुधारायला लागलंय बाबा त्याच्याशी बोलून बोलून.. हाहा.
पण ना एक प्रॉब्लेम होतो, त्याच्यापुढे जरा जास्तच गोंधळते मी. आणि त्याला
माझा वेडेपणा जरा इतरांपेक्षा जास्त आणि लवकर कळतो. हसतो नुसता. आजकाल तर चिडवायला
पण लागलाय. सारखं काय लग्न अन प्रेम! प्रेमावरून आठवलं, ती मैत्रेयी खरंच त्याच्या प्रेमात
आहेसं वाटतं. कळतं ते बोलण्या-वागण्या वरुण लगेच. माझ्या वरून पण कळत असेल का? छे, मी कुठेय त्याच्या प्रेमात. असं काही नाहीच. आणि
मुळात मी लग्नच करणार नाहीये. ठरलंय माझं. बाय द वे, कालचं ते गाणं भारी होतं..
मेधाने काल एक नवीन पुस्तक दिलंय वाचायला. गौरी देशपांडेचं. म्हणजे
ऐकलंय मी त्यांच्याविषयी.
पण पुस्तकाला हात लावावासा वाटत नाहीये अजून. Dan ने जादुच तशी केलीये ना. दुसरं काही वाचावसंच
वाटत नाहीये. वाचण्यावरून आठवलं, अरे मी अभ्यास पण करत नाहीये किती दिवस झाले. केला पाहिजे बाबा आता.
आत्ता येईल परीक्षा. Submissions पण. बापरे, बर्याच files incomplete आहेत यावेळेस. दांडया पण भलत्याच
मारल्यात या सेम मध्ये. लूज पडले काय मी. आणि आळशी पण झालेय जरा. शी बाबा कपडे
धुवायचेत. खूपच साचलेत. कपड्यांवरून आठवलं, काल गम्मतच झाली. तो मंदार म्हणे, मी जिनी असतो तर माझ्याकडे काय
मागितलं असतंस तू? हाहा..
मी म्हटलं, येऊन
माझे कपडे धुवून दे. बास. बाकी कसलीच इच्छा नाही माझी. देवा, काय हसला तो. वर मला अशक्य आहेस
म्हणाला. त्याच्याशी बोलायला लागलं की वेळ कसा जातो कळत नाही. मला म्हणे, शास्त्रीय संगीत ऐकतेस की नाही? यावर मी काय सांगू त्याला, मला टन टना टन टन टन टारा टाइप्स
गाणी आवडतात. अजून हसला असता. ‘हो हो’ म्हटलं
मग मी फक्त. शास्त्रीय मधल्या श शीही माझा दूर दूर तक संबंध नाहीये. झेपतचं नाही
राव. बाबा ऐकतात माझे कधी कधी. बाबांवरून आठवलं, आई-बाबा येणारेत पुढच्या आठवड्यात. रूम आवरली
पाहिजे बुवा. कपाट तर काय झालंय. पॅंट सापडली तर टॉप सापडत नाही आणि टॉप सापडला तर
ओढणी नाई. परवा
गम्मतचं झाली. आधीच उशीर झालेला. मग हाताला येईल ते जरा कलर्स मॅच करून घातलं. टॉप
एक, ओढणी वेगळीच
आणि पॅंट तिसरीच. कहर म्हणजे, कोणालाच
कळलं नाही ते वेगवेगळंय. हाहा. आता मी असंच मिसमॅच करायला मोकळी. मीनलला कळलं
होतं. डोक्याला हात लावला तिने. ती भारी नीटनेटकी राहते बाबा. आणि तिला सगळं येतं
सुद्धा. मागे एकदा न पाहवून तीनेच माझं कपाट आवरून दिलं होतं. जरा गिल्टच येतं
अशावेळी. पण मी काही सुधरत नाही.
मॅथ्सची असाइनमेंट पूर्ण करायचिये. पण कंटाळाच आलाय जरासा. मॅथ्स 2
थोडं अवघडच आहे. आणि mechanics पण. पहिलं
सेम सोपं होतं तसं. यावेळी फिज़िक्स पण थोडं जडच वाटतंय. तो प्रोफेसर घाईच करतो
फार. सगळ्या पोरी काय मरतात त्याच्यावर! पर्सनॅलिटी भारीचे तशी.
शी! मी काहीही लिहतेय.. पण डायरी त्यासाठीच असते ना. ‘काहीही’ लिहण्यासाठी. मग कशाला विचार करायचा. जसा मनात
येईल तसं कागदावर! इतरवेळी लावावेच लागतात ना filters, मनाला, बुद्धीला, जिभेला.. कोणाला काय वाटेल, याने माझी इमेज काशी दिसेल इ. इ.
मेसेजिंग मध्ये पण विचार करावाच लागतो. मला तर फारच. त्या मंदारशी
बोलताना तर जास्तच. मी बोलते आणि मग माझाच पोपट होतो. डायरी बेस्ट ए. पण खरंच, नाती पण अशीच हवीत ना, फिल्टर्सची गरज नसणारी. एकदम निखळ.
तशा नात्यांमध्ये मजाय. आईसोबत असतं तसं नातं. इथेही आहेच की मीनल, मेधा सोबत. कधी कधी करावा लागतो
विचार पण फार नाही. मंदारसोबतचं नातं काही कळत नाही बुवा. कधी खूप जवळचा वाटतो तर
कधी कधी खूप अनोळखी. आवडतं मला बोलायला पण फिल्टर्स असतातच. हम्म पूर्वीइतके नाही.
पूर्वी खूप असायचे. आता तसं खूप मोकळं वाटतं. पण अर्थात डायरी इतकं नाही. त्या
लेवलचा फ्रँकनेस यायला हवा. येईल का? काय माहित! कदाचित हो, कदाचित नाही.
जाऊदे बाबा, फारच
विचार झाला. फार प्रश्न पडायला लागले की नको वाटतं विचार करायला. पुस्तक वाचावं का? पाहुच काय म्हणणं आहे गौरी बाईंचं! ‘थांग’ म्हणे. वेगळंच नाव ए नाई पुस्तकाचं.
अरेच्चा आधी ते चहाचं भांडं धूतलं पाहिजे. ती मीनल आत्ता येईल. आणि
अजून तसंच पाहून जीव घेईल माझा. पण ठिकाय. ती रोज सकाळी जो फक्कड चहा पाजते ना
त्यापुढे सात खून माफ!
22
सेमिस्टरचा शेवट जस-जसा जवळ येऊ लागला, तस-तशी संपी सीरियस व्हायला लागली. लेक्चर्स बंक करणं बंद झालं.
प्रॅक्टिकल्सला आवर्जून हजेरी लागायला लागली. कोणाची फाइल कंप्लीट आहे, कोणाकडून ती कशी मिळवायची, शेवटी शेवटी प्राध्यापक लोक जणू
ब्रह्मदेव आणि आपण त्यांचे परम शिष्य आहोत अशा पद्धतीने त्यांच्याशी वागणं इ. इ.
गोष्टी आता संपीला जमायला लागल्या होत्या. परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे चाप्टर्स
वेगळे करणं, ‘किती’ चाप्टर्सचा अभ्यास केला की आपण पास
होऊ याची गणितं मांडण, संभावित
प्रश्नांचीच फक्त तयारी करणं वगैरे वगैरे गोष्टीही आता ती शिकली होती. इंजीनीरिंगला
आलेला प्रत्येक विद्यार्थी ‘इंजीनीरिंग’ शिको न शिको या सगळ्या गोष्टी नक्कीच
शिकतो आणि त्या जोरावरच ‘इंजीनियर’ देखील होतो. पाण्यात पडल्यावर
पोहायला शिकणे टाइप्स थ्यरी नुसार संपीही या सार्यात निपुण व्हायला लागली होती.
दरम्यान, एका
दिवशी रात्री तिला अनपेक्षितपणे श्वेताचा फोन आला. संपी जेवण उरकून जर्नल कंप्लीट
करत बसली होती. तिने फोन उचलला तर पलिकडून श्वेताचा रडवेला आवाज. हिला काही कळेचना
काय झालंय. शेवटी हुंदका आवरत श्वेता म्हणाली,
‘तुला माहित होतं ना.. तरी काही म्हणाली नाहीस मला..’
‘काय? कशाविषयी
बोलतेयस तू? आधी ते
रडणं थांबव.. आणि नीट सांग काय ते..’
‘हेच की मयूरला ‘तू’ आवडतेस..’ असं म्हणून तिने अजून मोठयाने हंबरडा
फोडला.
‘काय???’ संपी
जागची दोन फूट उडालीच.
‘हो! मी आज
ठरवलं होतं, काही
करून त्याच्याशी मनातलं बोलायचंच. पण तितक्यात श्रीचा मेसेज आला म्हणून त्याच्याशी
बोलू लागले. मग वाटलं, श्रीलाच
सांगावं मयूरशी बोलायला म्हणून मग त्याला सांगितलं मी वेड्यासारखं सगळं.’ श्वेता रडणं आवरत बोलत होती.
‘मग?’ संपीने
न राहवून विचारलं.
‘मग काय!! उगाच बोलले असं झालं माझं. श्री म्हणाला, दहावीत असल्यापासून संपदा मयूरचं
क्रश आहे. तो बोलत नाही पण त्याला ती फार आवडते वगैरे..’ तिचं रडणं अजून वाढलं.
संपी प्रचंड गोंधळली. एक तर आपण कोणाचं तरी तेवहापसून क्रश वगैरे असू
शकतो ही गोष्टच तिच्या मेंदुपर्यंत पोचायला आणि मग त्याने ती अॅक्सेप्ट करायला वेळ
लागला. त्यात वरून मयूर? मयुरला
आपण आवडतो? संपीला
आधी हे सगळं झेपलंच नाही. आणि वर पुर आल्यासारखं अखंड रडणार्या श्वेताला आता काय
आणि कसं समजावायचं हेही तिला कळेना. तिला खरंतर तिच्याविषयी वाईट वाटायला लागलं
होतं. तिला तो किती आवडायचा हे तिला माहितच होतं. पण आता तिच्या दु:खाचं कारण आपण
ठरतोय हे तर म्हणजे डील करायला अगदीच नवीन आणि अवघड वाटलं तिला.
‘श्वेता रडू नको अगं, मला खरंच नाही माहिती यातलं काहीच.. कधी म्हणाला नाही तो. आणि मला अशा
गोष्टी फार कळत नाहीत तुला माहितीच आहे ना..’
श्वेता काहीच बोलली नाही. संपीच पुढे म्हणाली,
‘तू थांब, मी
बोलते मयूरशी.. त्याला सांगते तुला तो किती आवडतो ते..’
यावर श्वेता चिडलीच,
‘काही नको.. नको बोलूस त्याच्याशी काहीच.. त्याला ना, किम्मत नाहीये माझ्या फीलिंग्सची..’
असं म्हणून श्वेताने फोन कट केला.
संपीला कानांवर काहीतरी आदळल्यासारखं वाटलं. नाही म्हटलं तरी ‘प्रेम’ या उल्लेखापाशी ती जराशी अडखळलीच. एकदम तो शब्द
तिला फार मोठा वाटायला लागला. आणि श्वेताकडून तो अशा पद्धतीने ऐकण तिला क्षणभर
झेपलंच नाही. श्वेताचा अगदी देवदासचं झालेला होता. पहिल्या ‘प्रेमाची?’ जखम वगैरे शब्दप्रयोग तिने सुरू केले
होते. त्याने तेवढ्यातही संपीला जरासं हसूच आलं.
पण मग काहीवेळाने वाईटही वाटायला लागलं. तिचे दोन जवळचे फ्रेंडस आता
विनाकारण तिच्यापासून दुरावणार होते. मयुरला तिच्याविषयी काय वाटतं हे कळल्यामुळे
आणि तिला त्याच्याविषयी ‘तसं’ काही वाटत नसल्यामुळे तिला आता त्याच्याशी
पूर्वीसारखं वागणं जडच जाणार होतं आणि श्वेता तर काय जग बुडाल्याच्या दु:खात वावरत
होती आणि ते बुडण्याचं कारण तिच्यालेखी संपी होती.
जराशा चक्रावलेल्या अवस्थेत संपी खाली बसली. समोर पसरलेला जर्नल्सचा
पसारा पाहून नाही म्हटलं तरी ती अजून चक्रावली. आणि तिने आता मूड गेला म्हणत त्या
पसार्याकडे साफ दुर्लक्ष करत गौरी देशपांडेचं थांग उघडलं. काही ना काही कारणाने
ते वाचायचं मागेच पडत होतं. पुस्तक हातात घेतल्यावर नाही म्हटलं तरी तिच्या मनात
जर्नलचा विचार आलाच. आणि जिचं जर्नल ‘उद्याच परत करते!!’ असं दहावेळा सांगून आणलं होतं ती अश्विनी रखुमाई सारखी तिच्या
डोळ्यांसमोर उभी ठाकली. पण मग संपीनेही ‘मारू अजून थोडा मस्का तिला’ म्हणत डोळ्यांसमोरची रखुमाई
निग्रहाने बाजूला सारून ‘थांग’ मध्ये डोकं खुपसलं आणि त्यातली ‘कालिंदी’ तिच्या डोळ्यांसमोर हळू-हळू आकार घ्यायला लागली..
संपी कधी त्यात बुडून गेली तिचं तिला कळलं नाही. गौरी देशपांडे नावच्या अजब
रसायनाशी ती तिची पहिलीच गाठ होती. तिचे विचार आणि एकूण जगाकडे पाहण्याची दृष्टी
दोन्ही संपीच्या वैचारिक बैठकीला आव्हान देणारे होते. पण, गोष्ट पुढे-पुढे जाऊ लागली तस-तशी
संपीला कालिंदी आणि तिला उभं करणारी गौरी देशपांडे दोन्ही आवडायला लागल्या. गौरी
आता ‘त्या’ वरून ‘ती’ झाली होती. वेधक, विचार
करायला भाग पाडणारे विचार, मनाचा
ठाव घेणारी, डोळ्यांसमोर
उभी राहणारी पात्रं.. संपी कधी त्या कथेत गुंतत गेली तिचं तिलाही कळलं नाही..
खिडकीतला चंद्र वर येत गेला आणि संपी पुस्तक वाचतच गेली..
पुस्तकाच्या जवळपास मध्यावर, ‘दिमित्री’ च्या एका वाक्यावर ती थांबली..
‘असं हलकं फुलकं, जाता-येता, लहर लागली म्हणून जरा वेळ प्रेम करणं
जमायचं नाही मला.. किंवा तुलाही, तेंव्हा जपून..’
संपी विचारात पडली. या वाक्याने तिला प्रचंड आकर्षित केलं.
आणि मग ‘क्रश’, श्वेताने उल्लेख केलेल्या 'फीलिंग्स' आणि हे दिमित्रीने कालिंदीला
उद्देशून व्यक्त केलेलं अव्यक्त ‘प्रेम’ या
सार्याविषयीचे विचार तिच्या मनात घोळू लागले. कुठल्या निष्कर्षापर्यन्त ती पोचली
नव्हती. पण, गौरीने
विचारांची, समजांची
नवी वाट तिच्यासमोर खुली केली होती.. आणि संपी नकळत त्या वाटेने चालूही लागली
होती.
याच विचारात कधीतरी उरलेलं पुस्तक उद्या उठल्या-उठल्या पूर्ण करायचं
ठरवून ती झोपी गेली..
23
दुसर्या दिवशी सकाळी संपी उठली ती आईच्या फोननेच. झोपेतल्याच विश्वातून
आईशी एक-दोन वाक्य बोलल्यावर आईच्या चढलेल्या सुराने ती खाड्कन जागी झाली आणि आज आई-बाबा भेटायला
पुण्यात येणार होते हे तिला आठवलं. रात्री श्वेता आणि गौरीच्या नादात ती हे साफ
विसरून गेली होती.
‘आम्ही सकाळी आत्याकडे पोचलो. तासाभरात तुझ्याकडे येतोय’ असं म्हणून आईने फोन ठेवला.
डोकं खाजवत संपी उठली आणि पटापट अवरायला लागली. दात घासत घासत बेड
स्वच्छ केला. कुठेही कसेही पडलेले कपडे उचलून सरसकट laundry bag मध्ये कोंबले आणि त्यात न बसू शकलेले
शेवटी कपाटात. बेसिन मधला भांड्यांचा पसारा पाहून मात्र तिचं अवसान गळालं. ते
घासण्याची तिची टर्न होती आणि रात्री तिने आळस केला होता. आता झाली की पंचाईत.
तिने केविलवाण्या नजरेने मीनलकडे पाहिलं. मीनलने रागात तिच्याकडे पाहिलं आणि ‘जा तय्यार हो ले..’ म्हणत तिने भांडी साफ करायला घेतली.
संपीने खुश होत मग हळूच मागून तिला मिठी मारत तिच्या गालांचा मुका घेतला. ‘आपण दात घासत होतो’ हे तोवर ती विसरून गेली होती. मग तसच
हातात झाडू घेऊन तिने कधी नव्हे इतक्या sincerely रूम झाडून काढली. आणि बाथरूममध्ये अंघोळीसाठी
पळाली. ती बाहेर येईतो मीनलने रूम लख्ख केली होती.
आई-बाबा
येणार म्हणून संपी आता फार excite झाली होती. बाबांनी पाहिलेलं असलं तरी तिच्या
आईने अजून तिचं हॉस्टेल आणि कॉलेज पाहिलेलं नव्हतं. संपीची लगबग पाहून एव्हाना
आजूबाजूच्या रूम्समध्येही तिचे आई-बाबा येणार असल्याची वार्ता पोचली होती. यथावकाश
तेही पोचले. खाऊने भरलेल्या दोन जड बॅगा घेऊन संपीसोबत ते गेट मधून आत आले. गर्ल्स
हॉस्टेल असल्याने तिच्या बाबांना ऑफिस मध्येच बसावं लागलं. आईला मात्र सगळा परिसर
दाखवत संपी तिच्या रूममध्ये घेऊन आली. वाटेत कामवाल्या बाईपासून सीनियर दीदी
लोकांपर्यंत सगळे थांबून संपीच्या आईची चौकशी करत होते. ‘आपकी संपदा बहोतही cute है हां आँटी’ असंही आवर्जून सगळे सांगत होते.
लख्ख आवरलेली रूम पाहून संपीच्या आईने क्षणाचाही विलंब न करता,
‘मीनल, छान
ठेवलीयेस रूम. खूप ऐकलंय मी संपीकडून तुझ्याविषयी’ म्हटलं.
यावर नीटनेटकी खोली पाहून आई आपलं कौतुक करेल अशी अपेक्षा ठेऊन
असलेल्या संपीचा चेहराच पडला. पण आपली आई आपल्याला ‘नीट’ ओळखते हेही तिला कळून चुकलं. मग आईशी बर्याच
गप्पा, आणलेले पदार्थ
चाखून पाहणं इ.इ. तिचं बराच वेळ सुरू होतं. त्यात सतत सगळ्या मुली आवर्जून येऊन
भेटून जात होत्या. ‘संपीच्या
आईला’ पाहण्याची
सगळ्यांनाच भलती उत्सुकता होती. त्यात हॉस्टलवर असं कोणाच्या घरून कोणी आलं की
उगाच आपलं प्रत्येकाला आपल्याही घरच्यांची आठवण वगैरे यायला लागते तसंही काहीसं
होतं. संपीची आई संपीहून अगदीच निराळी असल्याचं सगळ्यांना जाणवलं. संपी वेंधळी तर
तर तिची आई अगदी नीटनेटकी आणि हुशार. कुठे, कधी, काय बोलायचं कसं वागायचं याचं पुरतं भान असलेली.
बोलण्यातूनही त्यांची बुद्धिमत्ता दिसायची. त्यांच्या वागण्यावरून त्यांनी संपीचा
वेडगळपणा आपलासा केलेला जाणवत होताच पण तिच्यातला innocence ही जपल्याचं दिसत होतं. उगाच ‘हे असं करू नको’, ‘ते तसं करू नको’, किंवा ‘हे काय जीन्स घालायला लागलीस?’ वगैरे टिपिकल तिची आई नव्हती.
आईशिवाय संपीचं पानही हलायचं नाही. आज तर तिला आईला काय दाखवू आणि काय नको असं
झालेलं.
आई आणि मीनलचं काहीतरी बोलणं सुरू असताना संपीच्या फोनने टुन्न केलं.
पाहिलं तर मंदारचा मेसेज. संपीच्या आईला संपीचे सगळे मित्रामैत्रिणी ठवूक होते.
पूर्वी झालेल्या गेट-टुगेदर विषयीही तिने आईला सगळं सांगितलं होतं. मंदारही अर्थात
त्यांना माहीत होता. पण आता त्यांची वाढत चाललेली मैत्री, वेगळ्या वळणावर उभं असलेलं नातं, तिच्या मनात नव्यानेच फुलू पाहणार्या
भावना या सगळ्या विषयी मात्र काहीही तिने आईला सांगितलं नव्हतं. सांगू शकतही
नव्हती. कितीही मोकळं नातं असलं तरी आई-वडिलांचे अशा बाबतीत विचार वेगळे असतात.
आणि मुलं सगळंच त्यांच्याशी बोलू शकतात असं नाही.
संपीने हळूच मेसेज वाचून घेतला,
‘काय मॅडम, फार
फेमस झाला आहात तुम्ही सध्या!’
संपीला काहीच अर्थ लागेना. समोर आई बसलेली. तिला नीट बोलताही येत
नव्हतं. सो ‘आई
आलीये रात्री बोलते’ असं
त्याला सांगून तिने फोन बाजूला ठेऊन दिला. पण डोक्यात विचारांचा किडा मात्र आता
वळवळू लागला होता.
इकडे हाहा म्हणता श्वेता-मयूर-संपी प्रकरण अख्ख्या ग्रुप मध्ये पसरल
होतं. मयुरला संपी आवडते ही गोष्टही चांगलीच पसरली. मंदारच्याही कानांवर हे अर्थात
पडलं. आणि त्याला उगाच insecure वाटायला लागलं. पण तसं दाखवताही येत नव्हतं. संपी मुळात कोणालाही
आवडेल अशीच होती. त्यामुळे खरी गोष्ट काय आहे किंवा संपीचं याबाबतीत म्हणणं काय हे
जाणून घ्यावं म्हणून न राहवून त्याने तिला मेसेज केला होता. पण अशा आलेल्या
रीप्लायने तो अजून विचारात पडला.
संपीला मात्र या कशाचाही गंध नव्हता. ती आई-बाबांसोबत मस्त
कॅम्पसमध्ये भटकत होती. सगळं म्हणजे सगळं तिने त्यांना दाखवून घेतलं. तिघांनी मस्त
जेवण वगैरे केलं. दिवस मावळल्यावर आई-बाबांना आत्याकडे सोडून संपी हॉस्टेलवर परतली
तेव्हा प्रचंड थकली होती. बेडवर पडल्या-पडल्या तिचा डोळा लागला.
थोड्यावेळाने फोनच्या रिंगमुळे तिला जाग आली. पाहते तर मयुरचा कॉल! ती
विचारात पडली. तिला कालचं पूर्ण प्रकरण आठवलं. तिने कॉल रेसिव्ह केला.
‘हॅलो, संपदा..’
‘हॅलो..’
‘हम्म.. झाल्या प्रकाराबद्दल जो काही त्रास तुला झाला त्याबद्दल सॉरी!
तुला त्रास वगैरे देण्याचा माझा उद्देश नव्हता. मला तू आवडतेस हे खरंय. आणि तुला
मी त्या अॅंगलने आवडत नाही हेही मला माहितीय. सो, लेट्स जस्ट forget इट..’
त्याने अतिशय शांत आवाजात सगळं बोलून टाकलं. संपीला काय बोलायचं, कसं रियक्ट व्हायचं काहीच कळलं नाही.
गोंधळून ती फक्त ‘ओके’ म्हणाली. आणि मग ‘ओके देन’ म्हणून मयुरने फोन ठेऊनही दिला.
संपी फोनकडे पाहतचं राहिली. मयुरचं वागणं तिला क्षणभरासाठी खूप mature वाटलं. आणि त्याच्या ‘फीलिंग्स’ विषयी वाईटही वाटलं. पुन्हा प्रेम
वगैरे गोष्टींविषयीचे विचार तिच्या मनात यायला लागले. त्याबरोबर तिला दोन गोष्टी
आठवल्या. एक म्हणजे काल अर्धवट राहिलेलं गौरीचं पुस्तक आणि दुपारी मंदारसोबत
झालेलं अर्धवट बोलणं. एका
हाताने पुस्तक जवळ घेत तिने मंदारला मेसेज टाकला,
‘हाय, काय
करतोयस?..’
आणि रीप्लाय ची वाट पाहत पुस्तकात तोंड खुपसलं.
24
बर्याच वेळाने मंदारचा
रीप्लाय आला,
‘हाय..’
संपी तोवर पुस्तकात गढून गेली होती. मेसेज पाहून तिने पुस्तक बाजूला
ठेऊन दिलं आणि त्याला रीप्लाय केला,
‘अरे आई-बाबा आले होते आज. जाम मजा आली. आईला हॉस्टेल आवडलं. मी ना
तिला कोल्ड कॉफी पाजली. नको नको म्हणत होती पण मग आवडली तिला. आणि बाबांना आइस
टी..:D’
संपीची नेहमीसारखी सुटलेली गप्पांची ट्रेन पाहून दिवसभर नसते विचार
करत बसलेल्या मंदारच्या चेहर्यावर हसू उमटलं.
‘अरे वा.. भारीये.’
तुटक रीप्लाय करणं काही त्याने थांबवलं नाही पण.
‘हम्म.. अरे खूप धमाल. तू बोल.. काय करतोयस आणि काय म्हणत होतास सकाळी
ते फेमस वगैरे?’
‘काही नाही.. फॅन फॉलोइंग वाढत चाललंय ना तुझं.. म्हणून म्हटलं.. मयूर, श्री.. वगैरे वगैरे..’
संपीची ट्यूब आत्ता पेटली.
‘हाहा.. ओहह.. असंय का..’
‘हो..’ मंदार
म्हणाला.
‘अरे काय सांगू.. ती श्वेता उगाच मला ब्लेम करतेय.. तसं काहीच नाहीये
बरं. तरीही. हे क्रश वगैरे प्रकरण काहीच माहीत नव्हतं मला’
यावर मग मंदार जरावेळ काहीच म्हणाला नाही. पण मग थोडसं बळ एकवटून
म्हणाला,
‘तुलाही आवडतो का तो?’
आता संपी जराशी शांत झाली.
‘आवडतो म्हणजे हो, चांगलाय
तो तसा. पण, त्या
दृष्टीने वगैरे नाही पाहिलं मी त्याच्याकडे कधी..’
संपी प्रांजळपणे म्हणाली.
‘अच्छा..’
मंदारला थोडसं हुश्श झालं खरं पण त्याच्या मनातली insecurity काही कमी झाली नाही. पण, मोजकंच बोलण्याच्या त्याच्या
स्वभावानुसार तो फार काही बोलला नाही.
एक अस्वस्थ शांतता दोघांत पसरली.
मग थोड्याशा इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर त्यांचं मेसेजिंग
त्यदिवशी पुरतं तरी थांबलं. मनात मात्र बरेच नवे प्रश्न उभे होते.
रविवार असल्याने मीनल आणि संपी दोघी रात्री बाहेर जेवायला गेल्या. पण
जेवण न करता त्यांनी त्यांचा मोर्चा त्यांच्या एरिया मध्ये नव्यानेच उघडलेल्या
पिझ्झा सेंटर कडे वळवला. कॅम्पस ओलांडून बाहेर जाताना कोपर्यावर उभ्या पिवळ्या
धम्मक बहाव्याने संपीचं लक्ष वेधलं. इतके दिवस हिरवाई अंगावर घेऊन उभ्या असलेल्या
त्या झाडाकडे संपीचं क्वचितच लक्ष जायचं. पण आता ते त्याचं बहरलेलं पिवळं सौंदर्य
पाहून ती अवाक झाली होती. तिने पहिल्यांदाच असा फुललेला बहावा पाहिला होता. त्यात
आभाळात पौर्णिमेचा चंद्रही उगवला होता. या अशा रात्री संपीला जाम आवडायच्या.
पिझ्झा खाऊन परतताना त्या बराच वेळ कॅम्पस मधल्या फुलांच्या सड्यांनी
भरलेल्या रस्त्यांवरून फिरल्या. रविवारची संध्याकाळ असल्याने कॅम्पस मुला-मुलींनी
भरला होता. शॉर्ट्स मध्ये फिरणार्या मुली, लो वेस्ट जीन्स मधली मुलं.. मुला-मुलींचे जथ्थे, गप्पा, हशे, कुठेतरी एखादं कपल हातात हात गुंफून बसलेलं.. ही
तिथली नेहमीची दृश्यं होती. संपीही आता या सार्याला सरावली होती. सुरुवातीच्या
दिवसात मात्र फार बुजून जायची. आता तसं नव्हतं. तीही आता त्या दृश्याचा भाग बनलेली
होती.
पहिलं वर्ष संपत आलं होतं. तो परिसर, तिथली झाडं सारं आता संपीच्या ओळखीचं झालेलं
होतं.
आजचा दिवस अनपेक्षित घटनांनी भरलेला होता. मयूरचं बोलणं तिला पुन्हा
पुन्हा आठवत होतं. ‘तू मला
आवडतेस’ असं पहिल्यांदा
तिला कोणीतरी म्हटलेलं होतं. मंदार सोबत असताना विशेष फीलिंग तिला जरूर यायचं पण
त्याच्या बोलण्यातून त्याने असं काही कधी डायरेक्ट्लि व्यक्त केलेलं नव्हतं.
त्याचं आजचं तुटक बोलणंही तिच्या नजरेतून सुटलं नव्हतं.
वार्याच्या झुळुकेबरोबर अंगावर पडलेल्या बहाव्याच्या फुलांनी संपी
तिच्या विचारांमधून बाहेर आली. आणि वर झाडाकडे पाहत नेहमीसारखी उत्फुल्ल हसली.
घडायच्या त्या गोष्टी घडतील म्हणत आत्ताच्या क्षणावर मग तिने मन वळवलं आणि बराच
वेळ दोघी गाणी ऐकत बहाव्याखाली बसून राहिल्या.
पुढचा महिना फार धावपळीचा असणार होता. Submissions, viva, आणि मग exams.. या सेमिस्टर मध्ये परीक्षेची भीती
तशी कमी झाली होती. अभ्यासही थोडा असा-तसाच झालेला होता. आता सिरियसली तो करणं भाग
होतं. इतर सगळे विचार बाजूला सारत लक्ष अभ्यासावर केन्द्रित करायचं ठरवून संपी
हॉस्टेलवर परतली..
इकडे मंदारही त्याच्या रूटीन मध्ये व्यस्त झाला. संपीचं-त्याचं अधून मधून बोलणं व्हायचं पण
आता ते अभ्यासाविषयीच. त्याच्या सोबत राहून संपी ‘पाठ’ करणे पद्धतीपासून दूर जाऊ लागली होती. विषय समजून
घेणे, नोट्स काढणे इ.
प्रकार तिला आवडायला लागले होते. अभ्यास ‘कसा’ करायचा याचा हा नव्याने होत असलेला अभ्यास तिला
तिच्या विषयांच्या जवळ नेत होता. मॅथ्स, मेकनिक्स आ वासून समोर उभे असले तरी त्यातली
गम्मत आता तिला कळायला लागली होती आणि एकूण इंजीनीरिंगही कमालीचं इंट्रेस्टिंग
वाटायला लागलेलं होतं..
भरपूर जुगाड करून जर्नल्स पूर्ण झाली, submissions पण उरकली. ‘submission’ या गोष्टीची एक्झॅम पेक्षाही अधिक
धास्ती असते इंजीनीरिंगच्या पोरांना. वर्षभर केलेली मस्ती यावेळी बरोबर उतरते.
प्राध्यापक लोक ‘अब आया
उंट पहाड के नीचे’ अशा
अॅटीट्यूड ने वर्षभराचं उट्ट काढायला टपलेले असतात. कोणाला कसं आणि किती जेरीस
आणायचं यात त्यांचा हातखंडा असतो. त्यामुळे submissions सहीसलामत पार करणे म्हणजे अर्धी लढाई
जिंकल्या सारखंच असतं. शेवटचं submission उरकून रूम वर परतल्यावर संपीने एकदाचं हुश्श
केलं.. आणि त्याच आनंदात मॅगीचं पाकीट उघडलं..
25
Days pass by,
Leaving memories behind.
Our laughter, cheers, glooms..
Everything, then, gets a
room in that memory lane
So, my dear,
Give your future,
A gift of memories that would be
worth celebrating..
And then,
Wear your memories like a crown..
Like a damn precious crown..!!
- Sampada..
संपदा गॅलरी
मध्ये बसून जुन्या डायरीची पानं धुंडत होती. बाजूला लॅपटॉप होता आणि हातात कॉफी. भुरभुर
केसांचा लूज बन वर टाय अप केलेला.
बर्याच दिवसांनी मिळालेली निवांत संध्याकाळ गॅलरीमधल्या
झाडा-झुडपांसोबत आणि पलीकडून मावळणार्या सूर्यासोबत घालवावी असं तिच्या मनात चालू
असतानाच दुपारी ती नसताना घरी येऊन पडलेल्या कूरियर कडे तिचं लक्ष गेलं. वर आईचं
नाव पाहून तिने ते लगोलग उघडलं आणि खजिना सापडावा अशा आनंदात ते घेऊन कधी गॅलरीत
येऊन बसली तिचं तिला कळलं नाही.
संपदाच्या आईने घराचं renovation करताना संपदाच्या सापडलेल्या जुन्या जपून
ठेवलेल्या काही वस्तु तिला कूरियर केल्या होत्या. तो बॉक्स उघडल्यावर आत आठवणींचा
तो पेटारा पाहून ‘serendipity’ चा खरा अर्थ संपदाने अनुभवला. एकेक वस्तु पाहून, जवळ घेऊन, त्या-त्या आठवणीत जरावेळ रमून दुसर्या
वस्तूला हात लावायचा.. असं तिचं चालू होतं. डायरी, त्यातली सुकलेली फुलं-पानं, आठवणी, कविता, जपून ठेवलेले कीचेन्स आणि किती काय काय! सगळ्यात
खाली एका बॅगमध्ये घडी घालून ठेवलेला मोरपंखी पंजाबी ड्रेस पाहून तर अलगद तिच्या
डोळ्यांत पाणी तरळलं. ती नक्की हसत होती की रडत होती तिचं तिलाही उमगत नव्हतं.
टाइम-मशिन मध्ये बसल्या सारखं एका मोठा प्रवास मात्र तिचं मन करून येत होतं
नक्कीच.
इंजीनीरिंगच्या दुसर्या-तिसर्या कुठल्याशा वर्षात तिने लिहलेली ही ‘memories’ नावाची कविता! तिने आज ती पुन्हा
पुन्हा वाचली. नव्हे ‘जगली’ म्हणायला हवं. कॉफी कधीची गार पडली
होती पण त्याचं तिला गम्य नव्हतं. कामाचा वाढता व्याप, करियरच्या अगदी महत्वाच्या टप्प्यावर तिने घेतलेली
रिस्क, त्यात कष्ट आणि
प्रयत्नांअंती मिळू पाहत असलेलं यश.. या सार्यात मनातला हा कोपरा कुठेतरी गुडुप
झाला होता. ते दिवस आठवणीत मागे पडले होते. पण, आज ते असे अवचित डोळ्यांसमोर उभे राहिले आणि संपदा मधल्या संपीने
कितीतरी दिवसांनी पुन्हा डोकं वर काढलं. आणि ते अर्थात खूप सुखद होतं. आपल्याच
जुन्या व्हर्जनशी अवचित आपली गाठ पडावी तसं काहीसं. ती आतून सुखावून गेली.
स्वत:च्या तेव्हाच्या वेंधळेपणावर तिचं तिलाच हसू येत होतं.
आणि मग गुलाबासोबत त्याचे काटेही हातांना सापडावे तशा मनात खोल
दडवलेल्या काही आठवणीही डोळ्यांसमोर तरळू लागल्या. आपआपल्या दिशांना विखुरलेले
मित्र-मैत्रिणी.. घडलेले काही प्रसंग.. काही माणसं.. आणि अर्थात मंदारही! काही
माणसं आयुष्यात येतात, जन्मोजन्मीची
ओळख असल्यासारखे भासतात, आपल्या
असण्यावर/व्यक्तित्वावर खोल परिणाम करतात आणि एका क्षणी अगदी कुठेतरी नाहीसे होऊन
जातात.. त्या सोबतीची सवय झालेल्या आपल्या मनाचं मग काय करायचं असतं? ती पोकळी कशाने भरून काढायची?
मावळणार्या सूर्याकडे पाहणारी संपदाची नजर क्षितिजावर आता वेगळंच
काहीतरी शोधत होती.. इतक्यात फोन वाजला म्हणून ती भानावर आली. राधाचा फोन. राधा..
संपदाची पार्टनर कम जिवलग कम एव्रिथिंग.. इंजीनीरिंगच्या शेवटल्या वर्षात दोघींची
गाठ पडली आणि दोघी सख्ख्या बहिणी वाटाव्या इतक्या एकमेकींच्या झाल्या. कॅम्पस
मध्ये selection झाल्यावर
संपदाला आनंद नक्कीच झाला होता पण तोवर ‘जॉब करणे’ हे काही आपलं अंतिम ध्येय नाही हेही तिला कळलेलं
होतं. मग राधासोबत
जॉब सांभाळून केलेला landscape designing चा कोर्स.. पुरेसे पैसे साठल्यावर त्यातच करियर
करायचं ठरवून जॉबला ठोकलेला राम-राम.. संपदाचा प्रवास वेगळा आणि नक्कीच रोमांचक
होता.
‘संपदा अगं, त्या
राठींचा कॉल आला होता.. त्यांचा तो पाचगणीचा प्रोजेक्ट.. उद्या थोडंस कमी आहे काम.
जाऊन यायचं का तिकडे?’
राधा गडबडीत बोलत होती.
स्वत:ची मनोवस्था सावरत, भानावर येत मग संपदा उत्तरली,
‘हो.. माझ्याहि डोक्यात अगदी हेच आलं होतं.. जाऊया.. डिटेल्स whatsapp कर..’
‘ओके चालेल.. काय गं.. आवाज का असा येतोय? यू ओके?’
‘अगं हो.. झोपेतून उठले आत्ता.. सो..’ संपदाने विषय टाळला.
दुसर्या दिवशीची तयारी करत पुन्हा ती मनात येणार्या विचारांमध्ये
गुंतली. मधला सगळा घटनाक्रम आठवू लागला. पहिल्या दोन वर्षात केलेली धमाल. नंतर
करियर, relationship सार्याच
बाबतीत आलेली एक जबाबदारीची जाणीव, मंदारसोबत इतर मित्र-मैत्रिणीसोबत घालवलेले सोनेरी दिवस, आणि नंतर अवचित निर्माण झालेला
दुरावा.. जो आजतागायत टिकून होता.. सारा पट उलगडू लागला.
तसं फेसबूक वर अधून-मधून स्ंनीक केल्यावर कळायचं कोणाच्या आयुष्यात
काय चाललंय पण मंदार या सगळ्याच बाबतीत खूप अलूफ आधीपासूनच असल्याने त्याचं फारसं
काही समजायचं नाही.. कुठल्याशा बीच वरचा एक काहीवर्षांपूर्वीचा फोटो सोडला तर
त्यावर दुसरं काहीही नव्हतं. एकमेकांच्या अगदी जवळ येऊन आता असं इतकं दूर जाणं
मनाला वेदना देणारं असलं तरी त्यासोबत जगणं संपीने आता अंगवळणी पाडून घेतलं होतं.
आणि दुख्ख वेदना कुरवाळत बसणार्यांपैकी ती मुळात नव्हतीच. आला दिवस आणि आव्हाने
हसत आपलंसं करत खळाळत्या झार्या सारखी ती जगायची. कामही आवडीचं आणि चॅलेंजिंग.
त्यामुळे यश-आनंद तिला दाही-दिशांनी हाकारत होते. तीही जगण्याला भिडत होती.
पण आज हा असा अवचित मनाचा हळवा कोपरा छेडला गेला होता.. आणि ती बावरून
मावळलेल्या सूर्याकडे कितीतरी वेळ पाहत बसली होती..
26
पीएल, viva, exams.. महिना-दीड महिना संपीने मान मोडेपर्यंत अभ्यास केला. एकदा पुस्तकात घुसली की
घुसलीच असा सगळा विषय.
मेच्या किर्र उन्हात, गुलमोहराच्या सुखावह लाल सड्यावरुन हलकेच पाय टाकत शेवटचा पेपर सोडवून
ती हॉस्टेलवर परतत होती. उन्हाळा, परीक्षेचा ताण सार्यामुळे चेहरा सुकलेला होता पण आता परीक्षा
संपल्यामुळे थोडासा निवांतपणाही त्यावर उमटला होता. वाकून गुलमोहराची एक-दोन फुलं
तिने उचलून हातात घेतली. तो लाल रंग डोळ्यांत साठवत समोर पाहते तर फूटपाथच्या
बाजूला स्कूटी लावून मंदार उभा असलेला तिला दिसला. क्षणभर भास होतोय असंच तिला
वाटलं. पण, मग जवळ
जायला लागली तशी खात्री होत गेली की तो मंदारच होता, तिचीच वाट पाहत उभा असलेला. तिचा सुकलेला चेहरा
क्षणात उजळला.
‘तू काय करतोयस इथे??’ उत्साहाच्या भरात तिने विचारलं.
शर्ट-टाय-ट्राऊजर मधल्या संपीला तो शांतपणे निरखत होता. तिच्याकडे
पाहत गाडीवर बसत, गाडी
स्टार्ट करत तो म्हणाला,
‘सांगतो. तू बस आधी. आपल्याला जायचंय एका ठिकाणी. थोडंस काम आहे.’
संपीला काही कळेचना.
‘अरे पण, कुठे? कसलं काम?’
‘तू बस गं आधी..’
फार विचार न करता मग संपी त्याच्या मागे बसली. मुख्य रस्त्याला
लागल्यावर तिने पुन्हा त्याला विचारलं.
‘सांगशील का आता तरी..’
‘अगं.. आमच्या कॉलेजच्या यावर्षीच्या टेकफेस्ट मध्ये तीन-चार प्रायजेस
मिळालेयत मला...’
हे ऐकताच त्याचं बोलणं अर्ध्यात तोडून संपी म्हणाली,
‘वॉव.. भारीच की. आणि काय रे हे आत्ता सांगतोयस तू? फेस्ट होऊन दोन-तीन महीने होत आले
आता.’
‘हो म्हणजे, तसा
काही विषय नाही निघाला आपल्यात..’
पुन्हा त्याचं बोलणं अर्ध्यात तोडत ती म्हणाली,
‘विषय नाही निघाला म्हणजे? अरे वेड्या मला मिळाले असते तर मी ओरडून सांगितलं
असतं जगाला.. त्यासाठी विषय क्रिएट करायलाही कमी केलं नसतं.. हाहा.. काय तू..’
यावर तो नेहमीसारखा किंचित हसला फक्त. एक-दोन मिनिटांनी संपीच पुढे म्हणाली,
‘अरे पण त्याचा आत्ता काय संबंध? कुठे जातोय आपण?’
‘काही नाही. एक्झॅम संपलीये. रात्री घरी जायला निघतोय. नेक्स्ट
वीकमध्ये आईचा वाढदिवस पण आहे. तर विचार असा आहे, की मिळालेल्या प्राइज मनी मध्ये थोडा पॉकेट मनी
मिसळून तिच्यासाठी एखादी साडी घ्यावी.. माझे असे हे पहिलेच पैसे आहेत ना.. सो..’
‘ओहह.. भारीये की आयडिया.. मस्त! काकू खुश होतील’ संपीला त्याचा विचार आवडला,
‘मग आत्ता काय आपण साडी घ्यायला जातोय?’
‘हो.. मला त्यातलं काही कळत नाही. म्हणून तुला घेऊन जातोय.’ मंदार उत्तरला.
‘हाहा.. कोणाला निवडलयस तू!! मला साड्यांमधलं काहीही कळत नाही!’ संपी मोठयाने हसत म्हणाली.
‘त्याची कल्पना आहेच. तरी मला एकट्याला जमलं नसतं म्हणून आलो
तुझ्याकडे..’
‘ठिके रे.. पाहू आपण. काही काळजी करू नकोस.. संपी है तो सब पॉसिबल है..’ संपीने उगाच कॉलर उडवली.
यावर जरासं हसत मंदारने नेहमीसारखी ‘महितीय!’ अशा अर्थाने मान हलवली.
एका भल्यामोठ्या साड्यांच्या दुकानात दोघेही येऊन पोचले.
‘कशा साड्या आवडतात काकूंना?’ संपीने मंदारला विचारलं.
यावर मंदारने जरासा विचार केला.
‘साध्याच आवडतात तिला.. म्हणजे तशाच नेसते तरी.’
‘आणि रंग कुठला आवडतो?’ संपीने पुढे विचारलं.
‘रंग?..’ मंदारने
पुन्हा क्षणभर विचार केला. आणि त्याच्या लक्षात आलं आपल्याला माहितीच नाही आईला
कुठला रंग आवडतो ते.. त्याने तसं संपीला सांगून टाकलं.
दोघेही मग साड्या पहायला लागले. असे कॉलेज गोइंग मुलं-मुली सोबत दिसले
की सगळे उगाच संशयाने पाहू लागतात. दुकानातल्या सेल्समनचंही तेच चालू होतं.
संपीने चार-दोन साड्या पाहिल्या. सगळ्या जुनाट वळणाच्या. तिने मग
लेटेस्ट कलेक्शन त्यांना दाखवायला लावलं.
‘ए, अगं, आई नाही नेसत अशा साड्या..’ मंदार गडबडीने म्हणाला.
‘तू गप्प बस.. तुला साधं त्यांना कुठला रंग आवडतो तेही माहित नाहीये..’
संपीने मग मंदारच्या बजेटमध्ये बसेल अशी एक मस्त अबोली रंगाची
सुपरनेटची साडी निवडली. त्यावर नाजुक embroidery वर्क केलेलं होतं..
‘हम्म.. ही घेऊन टाक. मस्त दिसेल तुझ्या आईवर..’ संपी मंदारकडे पाहत म्हणाली.
‘संपदा, मला
नाही वाटत आई अशी साडी नेसेल..’
‘तू देऊन तरी बघ.. आधीच काय नाही म्हणतोयस!’ संपी ठामपणे म्हणाली.
तिच्या आग्रहस्तव मग मंदारने ती साडी विकत घेतली. आणि दोघे
दुकानाबाहेर आले.
‘कॉफी?’ मंदारने
तिला विचारलं.
‘फक्त कॉफी? मला
जाम भूक लागलीये.. काय खाशील विचार.’ संपी लगोलग म्हणाली.
‘हाहा.. ओके.. काय खाशील तू संपदा..’ तो हसत म्हणाला.
‘मिसळ.. मिसळेची भूक लागलीए मला..’ डोळे मिचकावत ती म्हणाली.
मिसळ यायची वाट पाहत दोघे टेबलवर बसले होते. मंदारने Sack मधून एक पुस्तक काढलं आणि संपदा समोर
ठेवलं. ते नवं-कोरं dan brown चं पुस्तक पाहून संपी जाम excite झाली. ती ते हातात घेऊन पाहतेय तोवर मंदार
म्हणाला,
‘तुझ्यासाठी..’
संपीला ते त्याचं वाटलं होतं. पण, ‘तुझ्यासाठी’ असं ऐकल्यावर ती नाही म्हटलं तरी जराशी अवघडली.
असं कोणाकडून काही गिफ्ट घ्यायची तिला एकतर सवय नव्हती. पण दुसर्या क्षणी तिला
खूप छानही वाटलं.
‘तू हे माझ्यासाठी घेतलंयस?’ कुतुहलाने पुस्तक चाळत तिने विचारलं.
‘हो..’ तो
शांतपणे म्हणाला.
पुस्तकावरची नजर त्याच्यावर स्थिरावत ती त्याला,
‘थॅंक यू..’ म्हणाली.
तिच्या चेहर्यावरचा आनंद पाहत तो, ‘मोस्ट वेल्कम’ म्हणाला. आणि दोघेही क्षणभर एकमेकांकडे पाहत
राहिले.
आणि तितक्यात टेबलवर मिसळ अवतरली.
गरमा-गरम मिसळ पाहून संपीने तिच्यावर ताव मारायला सुरुवात केली.
‘मग तू कधी जातेयस घरी?’ मंदारने खात-खात तिला विचारलं.
‘मी? उद्या
जाईन रात्री..’ मिसळवरची
नजरही न हलवता संपी म्हणाली.
‘अच्छा.. भेटू मग.. घरी बोलावशील ना मला..’ मंदार शांतपणे म्हणाला.
यावर धक्का लागल्यासारखी संपी त्याच्याकडे पहायला लागली..
‘घरी?? मी
विचार नाही केला असा कधी.. आई काय विचार करेल!..’
‘हाहा.. चिल गम्मत करतोय मी. आय नो, आपल्या गावात इतकं मोकळं वातावरण नाहीये..’
यावर मग संपी काहीच म्हणाली नाही.
‘मेसेजिंग चालू राहीलच ना आपलं..’ मिसळ संपवत संपी उत्तरली.
नंतर मग मस्त कॉफी पिऊन आणि बिलाचं संपीच्या आग्रहास्तव टीटीएमएम करून
दोघेही आपआपल्या हॉस्टलवर परतले..
27
पहिलं वर्ष पार पाडून संपी घरी परतली. खूप दिवसांनी आल्यामुळे अर्थात खूप आनंदात होती. तिला बर्याच
दिवसांनी पाहणार्यांना तिच्या राहणीमानातले बदल ठळक जाणवले. ती आता पूर्वीपेक्षा
जास्त confidently बोलत-वावरत
असल्याचंही कोणाच्या नजरेतून सुटलं नाही. काही लक्षणीय बदल झालेले असले तरी तिचा
मूळ स्वभाव थोडाच बदलणार होता? पीएल मध्ये केलेल्या जागरणांची पूर्ण भरपाई तिने आल्यावर रोज सकाळी
अकरा-बारा वाजेपर्यंत झोपून केली. तिथून मग निवांत उठणे, खाणे-पिणे, माऊ सोबत खेळणे, नमी सोबत भांडणे वगैरे वगैरे
ठरलेल्या वळणांनी तिचा दिवस जात राहायचा.. दुपारुन एखादी मैत्रीण तरी घरी यायची
किंवा ही तरी कोणाकडे जायची. दिवाळीच्या सुट्ट्या तशा कमी असल्यामुळे फार कोणाच्या
गाठी तेव्हा पडल्या नव्हत्या. पण, यावेळी मात्र जवळपास सारेच सुट्टीच्या निमित्ताने घरी परतलेले होते.
त्यामुळे रोज कोणा-न-कोणा
मैत्रिणीसोबत संपीची धमाल सुरू होती. श्वेताने मात्र मयूर प्रकरणानंतर संपीशी
बोलणं जरासं कमीच केलेलं होतं. त्यामुळे ती काही हिला भेटली नाही.
आज मात्र संपी जरा जास्त खुश होती. मधु तिची एक्झॅम संपवून
कोल्हापूरहून काल परतली होती आणि दोघी जवळपास वर्षभराने आज भेटणार होत्या. दोघींना
एकमेकींना किती काय सांगू असं झालेलं होतं. दुपारी मधु घरी आली तेव्हा संपी पालथी
पडून मांजरीला दूध पाजवत होती. ती आलेली पाहून संपीने ‘मधे...’ म्हणत जाऊन तिला कडकडून मिठी मारली.
‘संपे.. काय ए हे.. haircut, eyebrows.. omg.. भारीच की एकदम. संपीची samy झालीस की तू!!’
तिची गळाभेट घेऊन मधु उत्साहाने बोलत होती.
‘हाहा.. मंदार पण सेम हेच म्हणाला..’ संपी अनावधानाने बोलून गेली.
‘मंदार..? कोण तो
अवचट??’ मधुने
आश्चर्याने विचारलं.
‘हो अगं.. अवचट! आम्ही एका वर्कशॉप मध्ये भेटलो होतो एकदा.. तो पण
पुण्यातच असतो ना.. आणि मी ते गेट-टुगेदर विषयी बोलले होते ना तुला.. मधु यार तू
असायला हवं होतं. फार धमाल आली. तो श्रीनिवास आठवतो ना तुला.. जाम भारीये.. खूप
हसवतो.. आणि..’
पुढचं बोलता-बोलता मात्र ती थांबली. आई पण तिथेच आहे हे तिला जाणवलं
बहुतेक.
‘हो मी ऐकलं.. मजा करताय तुम्ही सगळे पुण्यात. आमच्या कोल्हापूरला काही
नाही बघ.’ मधु
म्हणाली.
मग खाणं-पिण करत हॉस्टेल, कॉलेज, नव्या मैत्रिणी, अभ्यास, रिजल्ट, पुणे, जुने मित्र-मैत्रिणी सगळ्याविषयी दोघींनी भरपूर
गप्पा मारल्या. मधून-मधून संपीच्या फोनचं टूण-टूण चालूच होतं. आणि मधुशी बोलत-बोलत
संपी सराईतासारखी रीप्लाय पण करत होती. मधुच्या नजरेतून हे अर्थात सुटलं नाहीच.
बर्याच वेळाने दोघी गच्चीवर आल्या तेव्हा मधु तिला म्हणालीच,
‘संपे, जाम
बदललीयेस गं तू.. पूर्वी मुलांची नावं जरी घेतली तरी गडबडायचीस. आता बिनधास्त
गप्पा मारतेयस..’
‘हो.. पूर्वी मी घाबरायचे. आणि ते थोडं चुकीचंही वाटायचं. मीनल तर मला
म्हणायची ‘तुला
बॉइज फोबिया आहे’ हाहा.
पण ना आता माझ्या लक्षात येतंय, त्यात चुकीचं किंवा घाबरण्यासारखं काहीच नाहीये.. आता तू जशी माझी
मैत्रीण आहेस, तसेच
मंदार, श्री, मयूर, निखिल इ. इ. पण आहेत. आम्ही खूप गप्पा मारतो.
अभ्यासविषयी बोलतो, चिडवा-चिडावी
करतो, प्रोब्ल्म्स
शेअर करतो.. मजा येते. मी उगाच वेगळे समज बाळगून होते पूर्वी.’
‘हम्म.. हे खरंय.. आपण त्या दिशाला पण किती नावं ठेवायचो ना.. पण, ती तेव्हापासून असाच विचार करत
असणार. आपण आत्ता करायला लागलोय इतकंच..’ मधु म्हणाली.
‘हो ना.. अगं दिशाचा काही कॉनटॅक्ट आहे का? मुंबईला आहे असं कळलेलं पण माझ्याकडे तिचा नंबरच
नाहीये. ती गायबच झाली एकदम..’
‘अगं हो, तुला
सांगायचंच राहिलं, दिवाळीत
तो अनिरुद्ध भेटला होता मला. सांगलीला लागलाय. त्याने दिला होता दिशाचा नंबर. पण
मी काही फोन नाही केला. तुला हवाय का?’
‘हो.. दे ना.. मला किती दिवसांपासून बोलायचंय तिच्याशी..’
‘घे.. सेव्ह कर..’ मधुने
नंबर दिला. आणि फोन बाजूला ठेवत म्हणाली,
‘बाय द वे संपे, या
अवचटचा ‘मंदार’ कधीपासून झालाय? हम्म.. कुछ तो है..’ तिने डोळे मिचकावले.
यावर नाही म्हटलं तरी संपीने तिची नजर टाळली,
‘गप गं, तू पण
आता मीनल सारखी बोलू नकोस.. तसं काही नाहीये..’
‘हाहा.. हो का?’ मधु
हसली.
‘हो.. म्हणजे चांगलाय तो. आवडतो मला. पण तसं पहायला श्रीपण चांगला
मित्र आहे माझा आणि मयूर सुद्धा.. ते पण चांगलेच आहेत.. हम्म मंदारशी थोडं जास्त
बोलणं होतं इतकंच..’
‘इतकंच?’ मधुने
विचारलं.
‘हो.. म्हणजे सध्यातरी इतकंच.. तसं थोडं विशेष फीलिंग येतं तो असला
की.. पण ते तसं ‘प्रेम’ आहे की नाही मला माहीत नाही.. मुळात
प्रेम म्हणजे काय हेच माझं अजून क्लियर व्हायचंय..’
मधुने थोडं आश्चर्याने संपीकडे पाहिलं. पूर्वीची वेंधळी संपी आता तिला
खूप विचारी आणि संयमी वाटली.
दोघींनी मग प्रचंड कल्ला केला.. नमिला सोबत घेऊन भटकल्या..
संध्याकाळी मधु घरी जायला निघाली तेव्हा संपीच्या फोन वर श्रीचा मेसेज
झळकला,
‘आपल्या 11-12वीच्या कॉलेज मध्ये आपल्या बॅचचं गेट-टुगेदर करायचं
ठरवलंय पोरांनी.. पुण्यात कसे सगळेच नसतात ना.. आता सुट्टीत सगळे आहेत तर भेटू असा
विचार आहे.. मुली पण येतायत. सो ये तू पण. आणि अजून कोणी असतील तर त्यांनाही
सांग..’
संपीने तो मेसेज लगेच मधुला दाखवला. यावर मधु खुश झाली.
‘अरे वा.. चालेल जाऊ की आपण.. तुझ्या ‘मंदार’ला भेटता येईल मला..’
यावर डोळे मोठे करून हसत संपीने तिच्याकडे पाहिलं. जावं की जाऊ नये
याविषयी यावेळी मात्र संपीच्या मनात साशंकता होती. तिथे अर्थात मयूर आणि श्वेताही
असणार होते.. सो सिचुएशन उगाच awkward होईल असं तिला वाटत होतं..
28
संपीची आई सकाळपासून कामात व्यस्त होती. कधी नव्हे ते आज लवकर उठलेल्या संपीने चहा पित
पित तिची ती लगबग पाहून आईला विचारलं,
‘काय गं.. काही आहे का आज?’
संपीकडे एक कटाक्ष टाकून आई म्हणाली,
‘वटपौर्णिमा आहे आज..’
संपीची ट्यूब पेटली. आता पूजा, वड, नैवेद्य, पुरणाचा
स्वयंपाक इ.इ. टिपिकल सीन तिच्या डोळ्यांसमोर उभा राहिला. सोवळयातल्या स्वयंपाकात
गुंग असलेल्या आपल्या आईकडे पाहून ती म्हणाली,
‘काय गं आई, दरवर्षी
तेच तेच करून कंटाळा नाही का येत तुला? तेच सणवार.. कुळाचार.. स्वयंपाक.. तोही
सोवळ्यात.. देव-धर्म.. बरं स्वयंपाकाचा मेनू पण तोच-तोच..
पुरणपोळी-आमटी-भजी-भाज्या-पंचामृत.. वगैरे वगैरे.. देव बोअर नाही का होत तेच तेच
खावून.. चेंज ऑफ टेस्ट म्हणून थोडं वेगळं आणि चटपटीत काहीतरी नैवेद्य म्हणून
दाखवायला हवं.. बघ लगेच खुश होईल तो.. तुम्ही लोक पिढ्या-अन-पिढ्या तेच-तेच खाऊ
घालताय त्याला..’
पुरण वाटता-वाटता आईने एकवार लेकीकडे पाहिलं आणि ‘महितीयेत हो हे सगळे विचार, या सगळ्यातून जाऊनच इथवर पोचलोय
आम्हीही..’ अशा
टाइपचे expressions चेहर्यावर
आणत ती म्हणाली,
‘काही गोष्टी नियम-व्रत म्हणून करायच्या असतात संपे.. आवड-निवड-कंटाळा
वगैरे आहेच की इतरवेळी. मनाला आणि शरीरालाही थोडं वळण हवं. तरच वाकड्या वाटेने
जाण्याची मजा कळते. आणि बरोबर आहे तुझं तसं.. कंटाळाही येतो कधी कधी.. पण आता या
सार्याची आम्हाला इतकी सवय झालीये ना की सगळं नीट केल्याशिवाय मनाला चैन पडत
नाही. आणि काय गं, तोच-तोच
मेनू म्हणतेस आणि दरवेळी मिटक्या मारून खातेस पण की.. तेव्हा कुठे जातं हे चेंज ऑफ
टेस्ट वगैरे.. बरं त्यालाही ना नाही. तू जेव्हा या सगळ्यात पडशील ना तेव्हा काय
हवा तो नैवेद्य दाखव देवाला. काही म्हणणं नाही माझं. तेव्हा देवासोबत आम्हालाही
घडेल चेंज ऑफ टेस्ट का काय ते.. आमचं वळण मात्र आम्हाला हेच सगळं करायला सांगतं
बरं!’
यावर नेहमीप्रमाणे संपी आईसमोर गप्प झाली. आईकडे नेहमीच कसं सगळ्याच
अगदी चपखल उत्तर असतं?
‘तू जेव्हा यात पडशील..’ या शब्दांनी मात्र संपी विचारात पडली. आणि नाही म्हटलं तरी मनातल्या मनात ‘बापरे.. हे सगळं आणि मी??’ असं तिचं झालं.
पुरणपोळी खावून सकाळची झोप संपीने दुपारी भरून काढली. काही वेळाने फोन
वाजल्याचं निमित्त झालं आणि तिला गाढ वामकुक्षीतुन बाहेर यावं लागलं. फोन मधुचा
होता. आज पाच वाजता सगळे जुन्या कॉलेज मध्ये जमणार होते. संपी जराशी निरुत्साहीच
होती. पण, हो-नाही
करता करता ‘जायचंय’ असंही तिच्या मनाचं कधीतरी ठरलेलं
होतं. तशी ती तयार झाली. साधासा पंजाबी ड्रेस आणि मोकळे केस. मधु आल्यावर दोघी
कॉलेजच्या दिशेने निघाल्या.
कॉलेज प्रशासनाकडून परवानगी काढून त्यांच्या जुन्या क्लासरूमचा
अॅक्सेस सगळ्यांनी मिळून मिळवला होता. आणि वर्गात सारे जमाही झालेले होते. आठवणी
जागवत जो-तो आपआपल्या पूर्वीच्या जागेवर बसलेला होता. सगळ्यांनाच शक्य झालं नसलं
तरी जवळपास पन्नास टक्के पब्लिक जमलेलं होतं. श्रीनिवास अर्थातच आघाडीवर होता.
बाकी मयूर, मंदार, निखिल, मृणाल, श्वेता, अनिरुद्ध, निखिल इ इ सगळेचं आलेले होते. शिवाय मधु सारखे
इतर शहरात असलेलेही बरेचजण हजर होते. संपी आणि मधु पोचल्या (नेहमीप्रमाणे उशिरा)
तेव्हा श्री डाएस वर उभा राहून काहीतरी बोलत होता आणि सारे त्याच्या विनोदावर हसत
होते. त्याचं लक्ष दारात उभ्या संपीकडे गेलं आणि मग त्याने सार्यांचं लक्ष
दाराकडे वेधत,
‘तर मित्रहो, आपल्या
कॉलेजचं सदाबहार व्यक्तिमत्व, कायम
हसतमुख, उशिरा येण्यात
ज्यांचा वकुब आहे.. मनाने अगदी निरागस आणि बोलण्यात आजकाल बुलेट ट्रेन असलेल्या, संपी उर्फ संपदा जोशींचं आगमन झालेलं
आहे.. टाळ्या होऊन जाउद्या..’
श्री हे असं नक्कीच वागू शकतो हे माहित असल्याने संपी त्याच्याकडे
पाहत हसत-हसत आत आली. आणि तिच्या ठरलेल्या बेंच कडे ती जात असतानाच श्री तिला
उद्देशून म्हणाला,
‘संपदा मॅडम, एक-एक
मिनिट.. इथे येऊन तुम्ही तुमचे मौलिक विचार जर आज उपस्थित जनांसोबत शेअर केले तर
सगळ्यांना खूप आनंद होईल..’
त्याच्या या sarcastic बोलण्याने संपी सकट पूर्ण वर्ग पुन्हा खलखळून
हसला. मग ‘फारचं
बोलतोयस, थांब.’ म्हणत संपीही डाएस वर येऊन उभी
राहिली. सगळ्यांवरून तिने एक नजर फिरवली. समोरच्या बेंच वर बसलेला मंदार, दोन रांगा सोडून मागे असलेला मयूर
तिला ठळकपणे दिसले. मंदार नेहमीप्रमाणे किंचित हसत तिच्याकडे पाहत होता. त्याच्या
त्या पाहण्यात तिला दरवेळी एक वेगळीच चमक मात्र नेहमी जाणवायची. आजही ती जाणवली.
तिने हसून त्याच्याकडे पाहिलं. मयूरकडे पाहून मात्र एक अवघडलेल स्मित तिच्या चेहर्यावर
उमटलं. आणि मग श्री कडे एकदा पाहून ती सर्वांना, नेहमीसारखी हसत,
‘हॅलो.. everybody..’ म्हणाली.
‘हॅलो..’ सगळ्यांचा
समूहस्वर वर्गात घुमला.
मग श्री कडे आणि बाकी सगळ्यांकडे पाहत संपी म्हणाली,
‘तर, तुम्हाला
सगळ्यांना माहित असल्याप्रमाणे आपले परममित्र, खरतर जगन्मित्र, कायम फुल्ल ऑफ लाइफ असलेले, कोणत्या गल्लीत कोणती मुलगी राहते
याची चालती-फिरती डायरेक्टरी असलेले, वर त्या-त्या मुलीच्या ‘इतिहास-भूगोलाचीही’ मेमोरी डिस्क कायम सोबत बाळगणारे, भावी इंजीनियर, श्रीनिवास राव यांनी आज हे आपलं
गेट-टुगेदर अरेंज करून आपल्या सगळ्यांची एकमेकांशी गाठ घालून दिल्याबद्दल
सगळ्यांच्या वतीने मी त्यांचे जाहीर आभार मानते..’
यावर वर्गात एकच हशा पिकला. श्री तर प्रत्येक वाक्याला हसत होता.
एवढ्यावर न थांबता, संपी श्रीला म्हणाली,
‘तर श्रीनिवास माझ्यापेक्षा तूच तुझे ‘मौलिक’ विचार आज सगळ्यांपुढे मांडलेस तर सगळ्यांच्याच ‘जनरल नॉलेज’ मध्ये कमालीची भर पडेल’
संपीने आपला गेम आपल्यावरचं उलटवलेला पाहून श्री तिच्यापुढे हात जोडत
हसत म्हणाला,
‘मॅडम.. माझं चुकलं. आपण प्लीज आपलं आसन ग्रहण करून मला उपकृत करा. मला
आज माझीच ‘हिस्टरी-जॉग्रफी’ धोक्यात आल्यासारखी वाटतेय’
पुन्हा वर्गात जोराचा हशा पिकला.
हसत हसत संपी खाली उतरली आणि पाहते तर काय मधु आणि मंदार एकमेकांशी
तिच्याचकडे पाहत हसत काहीतरी बोलत होते. मनातल्या मनात ‘बरं!!’ म्हणत संपी जाऊन समोरच्या एका बेंचवर बसली..
29
सगळ्यांच्या मग बर्याच गप्पा-टप्पा झाल्या.. इतकी वर्ष एका वर्गात
असूनही आज खर्या अर्थाने होत असलेल्या ओळखी.. दंगा-मस्ती.. धमाल चालू होती. संपी काही वेळाने उठून
कोपर्यात एकटीच बसलेल्या श्वेता जवळ गेली,
‘श्वेता हाय..’
श्वेताने तिच्याकडे पाहून जुजबी स्मित केलं फक्त. संपीच पुढे म्हणाली,
‘आपण बोलूया का थोडंस?’
श्वेता ने काही न बोलता बाजूला सरकून संपीसाठी जागा केली.
संपी मग तिच्या बाजूला बसत म्हणाली,
‘कशी आहेस?’
‘ठीक आहे.’ उदास
चेहर्याने श्वेता म्हणाली.
‘अच्छा.. किती दिवस आहेस इथे? कधीपासून सुरू होतंय कॉलेज तुमचं?’
‘होईल आठ एक दिवसात..’ पुन्हा तसाच थंड प्रतिसाद.
संपीने मग विषयालाच हात घातला,
‘श्वेता, मी
समजू शकते अगं तुला खूप वाईट वाटलंय.. पण मला खरंच यातलं काहीच माहित नव्हतं गं.
तुला जितका धक्का बसला ना तितकाच मलाही बसलाय..’
यावर मग श्वेता दाटून आलेले काढ दाबत म्हणाली,
‘ठिके गं संपदा.. तुझ्यावर नाही चिडले मी. ते पहिल्यादिवशी रागाच्या
भरात बोलले असेन. पण आता तसं काही नाही.’
हे ऐकून संपीला मनावरचं मनभर ओझं कमी झाल्यासारखं वाटलं. आणि तिने
एकदाचं हुश्श केलं (मनातल्या मनात)
श्वेताची मात्र ट्रेन आता फुल्ल वेगात धावू लागली होती,
‘तुला माहितीये कित्ती मनापासून प्रेम करायचे मी त्याच्यावर. खरं-खरं
प्रेम होतं गं माझं.’
खरं-खरं वर शक्य तितका जोर देऊन श्वेताने ओढणीचं डोळ्याला लावली. आता
ही ढसा-ढसा रडते की काय वाटून संपी कमालीची अस्वस्थ झाली. ती तिला काही म्हणणार
इतक्यात पुन्हा श्वेता सुरू झाली,
‘मला तर ना उगाच मनातलं बोलून बसे असं झालंय. झाकली मूठ राहिली असती तर
माझं ‘दु:ख’ किमान माझ्यापाशी तरी राहिलं असतं.’
संपीला काय बोलावं कळेना.
‘आता हे सगळ्यांना माहित झालंय. त्यालाही कळलं असेलचं की. पण साधा एक
मेसेज पण नाही केला गं त्याने..’ यावर मात्र आता तिचा बांधच फुटला.
आता संपीलाही उगाच वाईट वाटायला लागलं. ती श्वेताला थोपटत राहिली
फक्त. मग बराच वेळ तिच्याजवळ बसून ती थोडी हसायला वगैरे लागली की संपी तिथून उठली.
सगळे गप्पांमध्ये दंग होते.
दुरून तिला मयूर कोणाशी तरी बोलत असलेला दिसला. श्वेताकडे एकवार पाहून
काहीतरी विचार केल्यासारखी संपी त्याच्या दिशेने गेली.
त्याच्या मागे उभी राहून ती म्हणाली,
‘मयुर..’
मयुरने मागे वळून पाहिलं. उभ्या असलेल्या संपी कडे पाहून अतिशय
शांतपणे म्हणाला,
‘संपदा, हाय..
बस नं..’ ना
चुळबुळ, ना आश्चर्य, ना ओवर excitement.
संपी त्याच्या समोरच्या बेंच वर बसत ‘हाय..’ म्हणाली. आणि काही क्षणांसाठी तीच चुळबुळली.
‘कशी आहेस?’ शांतपणे
हसत मयुरने विचारलं.
‘मी छान अगदी.. तू कसा आहेस?’
‘मी पण..’
थोडावेळ शांतता. संपीने इकडे-तिकडे पाहिलं. तेवढ्यातही पहिल्या रांगेत
बसलेला मंदार तिला दिसला. तो तिच्याचकडे पाहत होता. आता नजर वेगळी होती.
‘काही बोलायचं होतं का?’ मयूरच्या प्रश्नाने ती भानावर आली.
आणि मग जरासा विचार करून म्हणाली,
‘तुला खरंच श्वेता विषयी तसं काही वाटत नाही?’
मयुरने क्षणभर खाली पाहिलं. आणि मग शांतपणे तिच्या डोळ्यांत पाहत
म्हणाला,
‘मला एकाच व्यक्तिविषयी ‘तसं’ काही
वाटतं.. पण, अनफॉर्चुनेटली
त्या व्यक्तिला माझ्याविषयी ‘तसं’ काही वाटत नाही’
आता संपी पुन्हा अवघडली. पण ऐकून न ऐकल्या सारखं करत, सावरत म्हणाली,
‘तरी तू एकदा तिच्याशी बोलावस असं वाटतं मला. तिला खूप वाईट वाटलंय. तू
बोललास तर बरं वाटेल.’
‘मला तिचे गैरसमज अजून वाढवायचे नाहीत. मी बोलायला जाईन आणि ती वेगळाच
विचार करत बसेल. ते नको आहे मला..’
‘नाही करणार ती वेगळा विचार वगैरे. साधा मित्र म्हणून नक्कीच बोलू
शकतोस तू..’
यावर तो काहीच म्हणाला नाही.
‘असो, मी मला
वाटलं ते सांगितलं, बाकी
तुझी मर्जी’
असं म्हणून त्याच्याकडे पाहत किंचित हसत संपी तिथून उठली आणि जायला
निघाली.
मयूर तिच्या पाठमोर्या आकृतीकडे पाहत राहिला.
संपी तिच्या ठरलेल्या जुन्या बेंचवर जाऊन बसली. तिला पाहून मधुही तिथे
आली,
‘काय झाल्या का गाठी-भेटी?’
‘हम्म.. चालू आहेत. तुझं झालं की नाही मंदारशी बोलून?’
‘हाहा.. हो झालं!’
‘काय बोललात काय एवढं?’
‘बोललो काहीतरी.. तुला का सांगू’
‘हो का? ठिके
नको सांगू.. मला काय त्याचं!’
‘चिडली.. चिडली.. एक मुलगी चिडली..’
इतक्यात समोरून मंदार त्या दोघींकडे येताना त्यांना दिसला.
तो जवळ आल्यावर त्याच्याकडे पाहत, ‘चालूदे तुमचं. मी आलेच.’ म्हणत मधु तिथून गेली.
संपीच्या बाजूला बसत मंदार म्हणाला,
‘मग संपदा मॅडम.. काय चाललंय..’
संपीची धडधड उगाच वाढली. तो प्रथमच तिच्या इतक्या जवळ येऊन बसला होता.
‘माझं काही नाही.. खाणे-पिणे-झोपणे आणि उंडारणे.. निवांत एकदम..’ हसण्याचा आव आणत संपी म्हणाली.
‘अजूनही बरंच काही चालूये असं दिसतंय..’ मयुरकडे पाहत तो म्हणाला.
‘म्हणजे? काय
म्हणायचंय..’
‘काही नाही.. पाहतोय फॅन फॉलोइंग..’ तो हसत म्हणाला.
‘हो का? तुमचंही
काही कमी नाही बरं ‘फॅन
फॉलोइंग’! मैत्रियीने
लास्ट वीक तुला प्रपोज केलं असं ऐकलंय..’
हे ऐकून मंदार उडालाच. ‘तुला कोणी सांगितलं?’
‘समजलं ‘सूत्रांकडून’’
‘ओहह.. आय सी.. सूत्र!!’
‘हम्म..’
‘यस अॅक्चुअल्ली.. तिने सगळ्यांसमोर विचारलं यार.. मी अवाक झालो.
पहिल्या प्रथम तू आठवलीस. तुझा अंदाज खरा ठरला ना म्हणून..’
‘ओहह’
‘हम्म..’
‘मग?’
‘मग काय?’
‘तू काय म्हणालास तिला?’
‘काय म्हणालास म्हणजे? ‘नाही’ म्हणालो.. i dont feel that way..’
‘ओहह..’
‘हम्म म्हणजे डायरेक्ट्लि असं नाही म्हणालो.. समजाऊन सांगितलं तिला..’
‘अच्छा..’
दोघे मग काही मिनिटं शांत झाले.
‘धिस बेंच.. का आवडायचा गं इतका तुला?’
‘भिंतीजवळ आहे म्हणून.. हाहा..’
‘हम्म.. माझ्या त्या तिसर्या रो मधून एका साइडने किंचित चेहरा दिसायचा
तुझा. तेही मधु बाजूला झाली तर..’
‘omg.. एवढं लक्ष होतं तुझं?’
‘हम्म.. हो म्हणजे.. जायचं लक्ष मोरपंखी रंगाच्या ड्रेस कडे.. काय
करणार!’ तो तिच्याकडे
पाहत होता.
तिने नजर खाली वळवली.
‘मग.. कधी जातेयस पुण्याला परत?’ थोड्या वेळाने विषय बदलत मंदारने विचारलं.
‘मी? काही
ठरलं नाही अजून. जाईन आठ एक दिवसात’
या दोघांना असं कोपर्यात बसलेलं पाहून मंदारला कोणीतरी हाक मारली. ‘आलो’ म्हणत जराशा अनिच्छेनेच तो उठला..
‘अशावेळी नको इतकी आठवण येते या लोकांना माझी..’
संपीकडे पाहून म्हणाला.
संपी गालातल्या गालात यावर हसली फक्त..
नंतर गप्पा-खाणं-पीणं-भेंड्या अशा अंगांनी गेट-टुगेदर पुढे जात राहिलं.. पण, संपीच्या मनाचं मात्र का कोणास ठाऊक
आता गोड फुलपाखरू झालेलं होतं..
30
‘नमे, चल
मस्त पाणीपुरी खाऊन येऊ..’
सगळ्या मैत्रिणींशी यथेच्छ भेटून झालेली संपी आता घरी बसून बोअर
व्हायला लागली होती. गेट-टुगेदर होऊनही पाच-सहा दिवस होत आलेले होते. त्यादिवशी
खूप धमाल जरी केलेली असली तरी काही गोष्टी मात्र unsolved puzzle सारख्या तिच्या मनात घर करुन होत्या.
मंदारचं आजूबाजूला असणं, पाहणं, बोलणं तिला सुखावह वाटत होतं. पण, त्याचवेळी श्री सोबत केलेली बेफिकीर
मस्तीही हवीहवीशी वाटत होती. आणि यासगळ्या पलिकडे मयूरविषयी तशा काही फीलिंग्स
नसतानाही त्याचं ‘पाहणं’, शांतपणे मनातली गोष्ट बोलून टाकणं, तेही समोरच्याकडून नकरार्थी उत्तर
येऊ शकतं हे
माहित असताना, हे
सगळं तिच्या मनात खोल घर करून गेलं होतं. एखाद्या कडून मनाजोगत्या प्रतिसादाची
अपेक्षा नसताना, आपल्या
नाजुक भावना त्याच्यासमोर शांतपणे कुठलीही अपेक्षा न ठेवता व्यक्त करता येण्यासाठी
एक वेगळ्या लेवलची clarity आपल्या भावनांविषयी, हेतुंविषयी असावी लागते. ती बहुधा मयूरकडे होती. आणि हीच गोष्ट संपीला
आकर्षित करत होती. पण, मन
पुढे जात नव्हतं. ते कुठेतरी मंदारसाठी तिच्या मनात दाटून येणार्या खोल, गहिर्या, उत्कट भावनांमध्ये अडकलं होतं.
क्षणभर तिच्या मनात प्रश्न येऊन गेला, ‘का आपण इतकी घाई करतोय निष्कर्षापर्यन्त येण्याची? चांगले मित्र आहोत तर तसेच नाही का
राहू शकत.. का दरवेळी ‘relationship’ नावाच्या कोंदणात स्वत:ला, इतरांना, फीलिंग्सना घट्ट बसवण्याची धडपड करायची.. why
not let our heart wander a little more?’ या विचारासरशी ‘शी
फारच विचार करतोय बाबा आपण.. पुरे आता..’ म्हणत तिने मनातल्या विचारांसोबत त्या विषयालाही
बाजूला झटकल आणि पालथी पडून सिरियल्स पाहणार्या नमिला तिने मस्का मारायला घेतला.
‘आत्ता? अंधार
पडलाय बघ बाहेर.. नुसती पोरं असतात तिथे. मी नाई येणार बाबा. हे कै तुझं पुणे
नाहीये..’
संपीचा प्लान क्षणात धुडकावत ती पुन्हा सिरियल मध्ये घुसली.
‘सात तर वाजलेयत.. काही कोणी खात नाही आपल्याला.. चल ना..’
नमिने टीव्हीकडे पाहत नकरार्थी मान हलवली फक्त. संपी चिडलीच.
‘नमे.. ह्या असल्या सिरियल्स आणि कधीपासून पहायला लागलीस तू?’
‘ए गप गं.. ती निशा बघ किती दुष्टय. आज तिचं भांडं फुटणार ए..’
संपीने डोक्यालाच हात लावला.
आणि मग सरळ जाऊन टीव्ही बंद करत म्हणाली, ‘खोटं असतं ते! उठ चल.’
जाऊदे म्हणत चार दिवसांसाठी आलेल्या आपल्या बहिणीला कशाला दुखवायचं
असा विचार करत नमि नाईलाजाने उठली.
गावातल्या त्यांच्या ठरलेल्या पाणीपुरीवाल्याकडे दोघी आल्या. गर्दी
होती बर्यापैकी. पण नमि म्हणाली तसं मुलंच होती सगळी. नमि उगाच अवघडून जात होती
आणि बोलतही हळू-हळू होती. संपीने चटकदार पहिली पुरी तोंडात टाकली आणि डोळे मिटून
जोरात ‘आहाहा..!!’ म्हणाली. तिच्या त्या बोलण्याने नमि
उगाच ओशाळली. आणि हळू आवाजात संपीला म्हणाली,
‘अगं, हळू
ना.. मुलींनी असं मोठयाने बोलायचं नसतं..’
तिच्या या वाक्याने पुरी संपीच्या गळ्यातच अडकली आणि तिला ठसकाच
लागला.
‘काय??? मुलींनी
काय करायचं नसतं?’
‘हेच असं नको इतकया मोठयाने हसणं, बोलणं.. वगैरे..’
‘ओये आजीबाई!! कोणी भरलंय हे तुझ्या डोक्यात? काहीही काय बडबडतेयस... मागच्या
वेळेस आले होते तेव्हा तर बरी होतीस.’
‘कोणी काही भरवल नाहीये. मलाच असं वाटतं!’ नमि ठामपणे म्हणाली.
संपी तिच्याकडे पाहतच राहिली. जेमतेम आठवीतली ही आपली बहीण.. आणि हा
असा विचार करायला लागलीये?
‘नमे असं काही नसतं बरं.. काढून टाक असले विचार डोक्यातून’
नमि यावर शांतच राहिली.
तेवढ्यात संपीच्या फोनने टुन्न केलं.
‘काय करतेयस?’ मंदारचा
मेसेज.
संपी किंचित हसली आणि रीप्लाय केला,
‘पाणीपुरी खातेय..’
‘अरे वा.. अकेले अकेले का?’
‘नाही.. नमि आहे ना सोबत..’
‘अच्छा..’
‘ये खायला तू पण..’
‘मी?’
‘हो..’
‘बघ हां खरंच येईन.’
संपीने नमिकडे पाहिलं. आणि तो खरंच आला तर काय गम्मत होईल म्हणत
‘हो.. येच..’ म्हणाली.
त्याचा स्वभाव पाहता या अशा ठिकाणी गावात, त्याचं घर तिथून जवळ असलं तरी तो येईलच याची
संपीला खात्री नव्हती. सो फोन पर्स मध्ये ठेवत तिने पुन्हा तिचं लक्ष पाणीपुरीवर
केन्द्रित केलं.
दोन-तीन प्लेट पोटात गेल्यावरच तिने मान वर केली.
आणि पाहते तर खरंच समोरून मंदार येताना तिला दिसला. ती गप्पच झाली
क्षणभरासाठी.
तो जवळ आला आणि एकदम अचानक एकमेकांसमोर आल्यासारखं भासवत,
‘अरे संपदा, तू?’ म्हणाला.
नमिच्या भुवया उंचावल्या. तोंडातली पुरी गिळत संपी म्हणाली,
‘अरे हो.. पाणीपुरी खायला आलेले. तू इकडे?’
‘मी पण!!’ तो हसत
म्हणाला.
नमिच्या चेहर्यावरची प्रश्नचिन्हं वाढायला लागली.
‘अच्छा..’
संपीचं लक्ष नमिकडे गेलं. मग ती तिला उद्देशून म्हणाली,
‘नमे, अगं हा
मंदार.. माझा जुना क्लासमेट.’
नमिने मग जिवावर येऊन हसत असल्यासारखं एक जुजबी स्माइल केलं फक्त
त्याच्याकडे पाहून..
‘तू मागव ना पाणीपुरी..’ संपी मंदारला म्हणाली.
‘हो..’
मग त्याची प्लेट येईपर्यंत त्या दोघांच्या वरवरच्या गप्पा नमि खाली
मान घालून ऐकत होती. एकतर अंधार पडलेला, आजूबाजूला मुलं-माणसं आणि त्यात आपली बहीण एका
मुलाशी गप्पा मारत थंबलीये हे सगळं नमिला पचवायला जरा वेळच लागत होता. घरी गेल्या-गेल्या
आईला हे सगळं सांगायचं असं मनातच ठरवत ती गपचूप पाणीपुरी खाऊ लागली.
संपीला मात्र जाम धमाल येत होती.
तेवढ्यात मंदार नमिला म्हणाला,
‘मग नम्रता, कसा
चालुये अभ्यास..’
‘बरा’ नमि
रुक्षपणे म्हणाली.
‘गणिताला कोणय तुम्हाला? पाटील सर का?’ त्याने
पुढे विचारलं.
‘हो’ त्याच्याकडे
पाहत नमि म्हणाली.
‘अरे देवा.. आवडीचा विषयपण नावडीचा होतो त्यांच्यामुळे’ मंदार हसत पुढे म्हणाला,
‘tuition वगैरे लावलीस की नाही मग गणितासाठी?’
आपलया आस्थेच्या विषयाला त्याने हात घातल्यामुळे आता नमि बोलायला
लागली,
‘लावायचिये मला. पण आई म्हणते आठवीपासून काय ट्यूशन लावायची.. कर
मुकाट्याने अभ्यास.’
‘अरे काय संपदा, तू
सांग ना मग आईला समजाऊन. ते पाटील सर किती 'भारी' शिकवतात माहितीये ना तुला..’ मंदार.
‘हम्म.. सांगते’ पाणीपुरी
खात खात संपी म्हणाली.
नमिसाठी आता मंदार ‘अरे बापरे!’ कॅटेगरीमधून ‘ओके’ कॅटेगरी मध्ये आलेला होता. त्यामुळे ती फार बोलत
नसली तरी घरी गेल्याबरोबर आईला सगळं सांगण्याचा विचार मात्र तिने पुढे ढकलला.
थोड्यावेळाने मंदारला बाय करून दोघी घरी परतल्या.
वाटेत नमिच्या अनपेक्षित प्रश्नाने संपीला धक्काच बसला.
‘बॉयफ्रेंड ए का तो तुझा?’
संपीने आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं. आणि काय उत्तर द्यायचं या
विचारात पडली. ‘आहे की
नाही?’ तिने स्वत:लाच
विचारलं. आणि मग झटकन तो प्रश्न बाजूला सारत नवाच आणि महत्वाचा प्रश्न तिच्या मनात
उमटला आणि ती लगेच नमिला म्हणाली,
‘तुला काय माहित गं बोयफ्रेंड म्हणजे कोण ते..’
‘माहितीये मला. जो आपल्याला प्रपोज करतो आणि आपण ज्याचं प्रोपोजल
अप्रूव करतो तो आपला बॉयफ्रेंड!’
नमिच्या अचाट ज्ञानाकडे पाहून संपी स्वत:च चाट पडली.
‘नमे तुझी शाळा घेतली पाहिजे असं वाटतंय मला आता. काहीतरी भलतंच साठलंय
तुझ्या डोक्यात. आणि हो, तो
मित्र आहे माझा. बॉयफ्रेंड वगैरे नाही..’
दोघी मग काही विशेष न बोलता घरी परतल्या..
31
‘हाय झोपलीयेस का?’
मध्यरात्र उलटून गेली होती. संपी पेंगुळलेले डोळे मोठे करून करून dan brown वाचत बसली होती आणि तेवढ्यात मंदारचा
मेसेजने टुन्न केलं. इतक्या उशिरा त्याचा मेसेज पाहून तिने पुस्तक बाजूला ठेवलं.
आणि डोळ्यांसमोर मोबाइल धरत आडवी झाली.
‘नाही अजून.. पुस्तक वाचतेय’
‘अच्छा..’
‘तू बोल नं.. काय करतोयस?’
खोदुन विचारल्याशिवाय हा जे बोलायचंय ते पटकन बोलत नाही हे संपीच्या
एव्हाना लक्षात आलेलं होतं.
‘काही नाही.. आईचा वाढदिवस celebrate केला बारा वाजता..’
‘अरे.. हो की.. वाढदिवस आहे ना आज.. विसरलेच मी..’
‘हम्म.. साडी आवडली आईला खूप..’
‘दिलीस तू? काय
म्हणाल्या?’
‘तुझा चॉइस नाहीये हा असं म्हणाली..’
‘😊 तू काय म्हणालास मग?’
‘माझ्या चॉइस चा चॉइस आहे असं म्हणालो..’
यावर दोन-तीन मिनिटं विचार करून संपीने रीप्लाय केला,
‘म्हणजे? किती
कॉम्प्लिकेटेड बोलतोस रे’
‘किती साधं-सरळ वाक्य आहे.. तूच माठ आहेस.’
‘ओये.. गप्प बस तू.. तूच आहेस माठ’
‘हाहा..’
संपीला पहिल्या प्रथम झेपलं नाही. पण मग काही मिनिटांनी तिची ट्यूब
पेटली. तो ‘मला’ त्याचा चॉइस म्हणाला का?? ती आतून शहारली. मनाला कितीही
शहाणपणाचं वळण दिलं तरी त्याला आतून काय वाटतंय ते सांगितल्याशिवाय ते राहतही
नसतं.
सुट्ट्या संपल्या तशी काही दिवसांनी संपी पुन्हा पुण्यात आली. पावसाळा
सुरू झाला होता. भुरभुर पावसानं सगळीकडे हजेरी लावली होती. असा पाऊस पाहिला की
मनसुद्धा हिरव्या मखमालीसारखं होऊन जातं.. त्यात सध्या तर संपीच्या मनात नव्या
जाणिवांचा, नव्या
नात्यांचाही पाऊस पडायला लागला होता. स्वप्नांनी भरलेलं, अशक्य स्वप्नं पाहणारं मन गार वार्यावर
तरंगत होतं. सगळं जग खूप सुंदर वाटायला लागलं होतं..
हे सगळं मंदारमुळे वाटतंय.. तो आपल्याला आवडतो.. हे तिने आता तिच्या
मनाशी कबूल केलं होतं. पण त्याचं काय? त्यालाही असंच वाटत असेल का? बोलण्यातून, vibes मधून जाणवतं पण खरंच तसं असेल का? या सार्या प्रश्नांची उत्तरं तिला
हवीहवीशी वाटू लागली होती..
ती आलेली असली तरी तो अजून पुण्यात आलेला नव्हता.
संपीचं कॉलेज सुरू झालं होतं. सेकंड येयर ऑफ इंजीनीरिंग. सगळ्यांचे
डेपार्टमेंट्स आता आपआपल्या ब्रांच नुसार वेगवेगळे झाले होते. मीनलची ब्रांच वेगळी
असल्याने संपी आणि ती आता एका वर्गात नसणार होत्या. नव्या मैत्रिणी, नवे विषय.. प्रॅक्टिकल्स..
इलेक्ट्रॉनिक्सशी खर्या अर्थाने होत असलेली ओळख यात संपी गुंतून गेली. दुसर्या
वर्षाचं अॅडमिशनही झालं. पण आता डोक्यावर टांगती तलवार होती ती रिजल्टची. फर्स्ट
येयर चा रिजल्ट अजून लागलेला नव्हता. पहिल्या सेम पेक्षा दुसर्या सेम मध्ये
केलेली ढिलाई टेंशन वाढवत होती.
वर्गात आता डिप्लोमाचे नवे चेहरेही डोकावू लागले होते. डायरेक्ट सेकंड
येयरला अॅडमिशन घेतलेले. त्यांचा वेगळा ग्रुप जिथे-तिथे दिसायचा. इलेक्ट्रॉनिक्स
डिपार्टमेंटच्या नव्या टीचिंग स्टाफशीही आता ओळख व्हायला लागली होती. पहिलं वर्ष
तसं मजेतच गेलेलं असल्यामुळे इंजीनीरिंग म्हणजे नेमकी काय चीज आहे ते संपीला
यावर्षी कळणार होतं. त्याची झलकही नव्या subjects मधून दिसत होती. सिग्नल्स अँड सिस्टम्स, सॉलिड स्टेट डिवायसेस अँड सर्किट्स..
एकेक नावं वाचूनच घेरी यावी.
याच सुमारास कधीतरी रात्री ती मेस मध्ये जेवायला गेलेली असताना तिला
मंदारचा फोन आला. नेहमी मेसेजेस मधूनच बोलणारे ते एकमेकांना क्वचितच फोन वगैरे
करायचे.
‘हाय.. संपदा जी.. कशा आहात..’
‘हाहा.. हे काय जी वगैरे.. bdw, चक्क फोन केलास तू आज? मला वाटलं गायब झालास कुठेतरी. मेसेज
नाही काही नाही..’
‘अगं आजच आलो पुण्यात..’
‘इतक्या उशिरा? का?’
‘लग्न होतं चुलत बहिणीचं..’
‘ओह अच्छा..’
‘ऐक नं.. रिजल्ट लागला आमचा आज..’
‘काय सांगतोस? स्कोर?’
‘एट पोइंटर.. सेकंड इन द कॉलेज..’
‘वॉव.. omg.. कसलं
भारी!! Coep चा topper!’
‘ :) ’
‘नुसती स्माइल नकोय.. पार्टी हवी! ती पण मोठ्ठी!!’
संपी excite होऊन
बोलत होती. तिला मंदारचं जाम कौतुक वाटत होतं.
‘नक्की.. कुठे आणि कधी सांग..’
‘ह्या वीकएंडला?’
‘डन!’
दोघांनी फोन ठेवला. संपीला त्याचा रिजल्ट ऐकून अर्थात छान वाटलं. पण
आता स्वत:च्या रिजल्टचा विचार करून तिच्या पोटात गोळाही येऊ लागला..
राठीचं प्रोजेक्ट पहायला संपदा आणि राधा दोघी पाचगणीला निघाल्या
होत्या. पावसाळा तोंडावर होता. या दिवसात त्यांच्या कामाचा लोड खूपच वाढायचा.
पावसाळ्याच्या पुढे-पुढे landscapes design करून घ्यायची ज्याला-त्याला घाई..
राधा ड्रायविंग करत होती. संपदा खिडकी बाहेर पाहत होती..
‘काय गं तब्येत ठीक नाही का?’ राधाने तिला विचारलं.
‘अम्म.. हो.. का गं?’
‘गप्प गप्प आहेस.. तुझी बडबड ऐकायची सवय झालीये मला..’
जरासं हसत संपदाने तिच्याकडे पाहिलं,
‘काही नाही गं.. उगाच उदास वाटतंय कालपासून..’
‘क्युं?’
‘पता नही यार.. feeling a bit nostalgic.. आईने काल तो आठवणींचा पेटारा पाठवला
आणि सगळं आठवायला लागलं..’
‘ओहह.. हम्म.. सगळं म्हणजे..’
संपदाने राधाकडे पाहिलं.. आणि गप्पच राहिली.
राधाच म्हणाली,
‘अम्म.. समझ गयी.’
यावरही संपदा काहीच म्हणाली नाही.
‘काय घडलं होतं गं एवढं तेव्हा.. अजून ती गोष्ट सोडायला तयार नाहीस
ती..’
‘ट्रक!’
विषय टाळत आणि राधाचं लक्ष रस्त्याकडे वळवत संपदा म्हणाली.
‘ठिके मॅडम नका सांगू.. टॉप सीक्रेट! तू आणि तुझा मंदार.. वेडे आहात
दोघेही.’
संपदाने आता सरळ कानांत हेडफोन्स घातले आणि पुन्हा खिडकीबाहेर पाहू
लागली..
32
शनिवारची दुपार. आदल्या
दिवशी पावसात भिजल्यामुळे आजारी पडलेली संपी सकाळपासून झोपूनच होती. कॉलेजला पण
दांडीच मारली होती तिने. पण बाहेर अचानक वाढलेल्या आवाजाने आणि अॅम्ब्युलेन्स च्या
सायरनने ती जराशी दचकूनच जागी झाली. मीनल कॉलेजला गेलेली होती. डोळे चोळत संपी
रूममधून बाहेर आली. पाहते तर वरांड्यात मुलींची नि हॉस्टेल स्टाफची ही गर्दी
जमलेली.. तिला क्षणभर समजलंच नाही काय झालंय. सगळे श्रुतीच्या रूमच्या दिशेने पाहत
होते. भयग्रस्त वातावरण. दोन-तीन मिंटांतच तिच्या कानावर कोणाचं तरी वाक्य आलं,
‘अरे अभ्भि एक घंटा पेहले देखा था मैने उसे कॉलेजसे आते हुए..’
‘हां क्या?’
‘हम्म.. गुमसुम थी.. बिना कुछ बोले ही रूममे चली गयी.. और आधे घंटे बाद
तो उसके रूममेट की चींख सुनाई दी..’
‘असं कसं केलं यार तिने.. किती हसरी होती..’
‘रूम मे कोई नही था क्या?’
‘नही शायद, वो पलक
है ऊसकी रूममेट.. कॉलेज से आके उसने रूम खोला तो सामने श्रुती सीलिंग फॅन से लटकी
हुई दिखी.. तबसे सदमे में है.. देख कैसे कोनेमे बैठी है..’
‘क्युं किया लेकीन उसने सूइसाइड?’
‘अरे फर्स्ट येयर इंजीनीरिंग का रिजल्ट आया है आज सुबह.. श्रुती का
येयर डाउन है शायद..’
हे सगळं ऐकून संपी सुन्न झाली. श्रुती तिच्याच वर्गात होती. फार
मैत्री नसली तरी ओळख होतीच. रोज दिसणारा एक चेहरा! तिने सूइसाइड करावं?? का??? संपी प्रचंड अस्वस्थ झाली.. आलेले पोलिस, अॅम्ब्युलेन्स.. त्यांनी नेलेलं तिचं
पार्थिव.. संपी दुरून पाहत होती. मृत्यू नावाच्या गोष्टीशी ही तशी तिची पहिलीच
गाठ. आज सकाळीच नाश्ता करताना तिला दिसलेली श्रुती.. आता अशी निपचित पडली होती.
प्रश्नांचं काहूर उठलं संपीच्या मनात..
काही वेळाने मीनल कॉलेजमधून परतली. ही गोष्ट आता सगळीकडे पसरली होती.
तिलाही अर्थात समजलं होतंच. संपीच्या शेजारी जाऊन ती बसली. ती दिसताच संपीने तिचा
हात घट्ट पकडला. दोघींनी एकमेकींकडे पाहिलं पण बोलल्या काहीच नाहीत.
वायडी झालं म्हणून आत्महत्या?? घडला प्रकार संपूर्णपणे कठीण होता पचवायला.
बर्याचवेळाने हळू-हळू संपीला realise झालं की ‘रिजल्ट’ लागलाय.. आपलाही! आज नेमकं कॉलेजला न गेल्याने
तिला याचा काही पत्ताच नव्हता. तिने मीनलकडे पाहिलं आणि म्हणाली,
‘रिजल्ट?’
‘हो..’
‘काय लागला?’ संपी
घाबरून विचारत होती.
मीनल क्षणभर काहीच म्हणाली नाही. संपीचं टेंशन वाढायला लागलं.
‘सांग नं..’
‘एक-एक backlog आहे आपल्या दोघींचाही..’
संपीचा चेहरा पडला. पहिल्या सेम मध्ये ऑल क्लियर झाल्यामुळे ती दुसर्या
सेम मध्ये बरीचशी लूज पडली होती. इतकी वर्षं कधी कुठल्या विषयात फेल होणं माहितच
नसल्याने एक backlog असणंही
तिला फार अपमानास्पद वाटलं.
तशाच सुन्न अवस्थेत तिने कधीतरी अंघोळ केली. जात नव्हतं तरी पोटात
काहीतरी ढकललं. तशाच कोरड्या डोळ्यांनी गोळ्या घेतल्या. आणि छताकडे पाहत पडून
राहिली. एकीकडे डोळ्यांसमोर हसणारी श्रुती, दुसरीकडे तिचं पार्थिव.. आणि पुन्हा स्वत:चा
रिजल्ट!! विचारांची आवर्तनं डोक्यात अव्याहत सुरू होती. ती थिजत चाललेली. इतक्यात
फोन वाजला. नावही न पाहता संपीने तो उचलला.
‘हॅलो.. काय लागला रिजल्ट? आणि उद्या कुठे भेटायचं?’
आवाजावरून तिच्या लक्षात आलं, मंदार आहे. ती क्षणभर काहीच बोलली नाही.
‘हॅलो.. संपदा..’
‘हॅलो..’
‘अगं बोल नं.. तब्येत ठीक नाही का?’
‘अम्म? हम्म..
एक backlog आहे.’
‘ओह.. कोणता..?'
दुपारपासूनच्या सार्या घटना, रिजल्ट यामुळे बधिर झालेलं मन आणि बुद्धी..
मंदारचा आवाज आणि बोलणं ऐकून तिला एकदम भरूनच यायला लागलं.. खूप प्रयत्न करूनही
तिला रडू थांबवता आलं नाही.. आणि ती रडायला लागली..
'इट्स ओके.. होतं अगं.. इंजीनीरिंग आहे हे.. इतकं टेंशन नको घेऊस तू..
रडू नकोस संपदा.. इट्स ओके एकच विषय राहिलाय.. तू करशील manage या सेम मध्ये.. डोन्ट क्राय डियर..’ त्याला कळेना हिला कसं समजवायचं..
कसंबसं रडू आवरत मग संपी बोलू लागली,
‘आज सकाळी बोलले होते अरे मी तिच्याशी.. असं कसं म्हणजे? आत्ता आत्ता पर्यन्त होती इथे आणि
आता चक्क कुठेच नाही??’ ती
पुन्हा रडायला लागली.
या वाक्याचा मात्र मंदारला काही अर्थच लागेना.
‘संपदा, काय
झालंय.. कोण नाहीये?’
‘श्रुती.. समोरच्या रूममधली. सूइसाइड केलं तिने दुपारी..’
‘काय???’
‘हो.. yd झालं
होतं तिचं.. फॅनला लटकून..’ संपीला
पुढचं काही बोलवेचना..
‘ओहह गॉड.. सो sad..’
मंदारही सुन्न झाला.
पण लगेच सावरत तो म्हणाला,
‘वाईट झालं.. पण संपदा तू सावर स्वत:ला.. नको इतका विचार करूस.’
संपदा शांत झाली होती. रडल्यामुळे तिला जरासं शांत वाटायला लागलं
होतं. पण अजून स्फुंदत होतीच.
‘ऐक नं, मी येऊ
का भेटायला? थोडा
फेरफटका मारला तर बरं वाटेल तुला..’
‘नाही अरे नको.. मला काहीच करावसं वाटत नाहीये..’
‘बरं ठिके.. मग झोपतेस का जराशी..’
‘हो झोपते जरावेळ.. तब्येत पण ठीक नाहीये थोडी..’
‘ओके झोप झोप.. विचार नको करू फार. मी करतो रात्री परत फोन.. आणि वाटल्यास उद्या येतो भेटायला..’
‘ओके.. चालेल.. बाय..’
‘बाय.. tc..’
मंदारशी बोलल्यावर संपीला जरासं हलकं वाटायला लागलं. गोळ्यांनीही
सुस्ती यायला लागली होतीच.. काही वेळातच ती झोपी गेली..
33
श्रावण महिना. भुरभुर पाऊस आणि झाडांच्या फांद्यांमधून डोकावणारं
उन्ह.. आल्हाददायक आणि चैतन्याने रसरसून भरलेलं वातावरण. कॉलेज कॅम्पस मधल्या
ओल्या तरीही उन्हात चमकणार्या प्रशस्त रस्त्यांवरून संपी आणि मंदार फेरफटका मारत
होते. सूर्य पश्चिमेकडे झुकला होता. दोघेही फार काहीच बोलत नव्हते. नेहमी बडबडणारी
संपी आज खूप शांत होती. ओल्या रस्त्यांवरून फिरताना दोघांची पावलं मात्र अगदी एका
लयीत पडत होती. ती शांतता अवघडलेली नव्हती. त्यात संपीच्या बाजूने ती जशी आहे तशी
असण्याचा एक खूप समाधानकारक फील होता. कुठलंही दडपण नाही, जे वाटतंय त्याहून वेगळा मुखवटा धारण
करण्याची केविलवाणी धडपड नाही. आणि मंदारच्या बाजूने निखळ स्वीकार.. संपीच्या
मनोवस्थेचा, विचारांचा
आणि खुद्द संपीचाही.
थोड्या वेळाने बंद कॉलेजच्या रिकाम्या पायर्यांवर येऊन दोघे बसले.
एरवी गजबजलेला परिसर रविवार असल्याने शांत होता.
‘फीलिंग बेटर?’
बाजूला फुललेल्या monsoon लिलीज कडे पाहत असलेल्या संपीला मंदारने विचारलं.
‘अम्म?..
हो.. थोडं बरं वाटतंय आता..’
लिलीज वरची नजर मंदारकडे वळवत ती किंचित हसत म्हणाली.
‘हम्म.. गुड!’
पुन्हा काहीवेळ शांतता.
काही वेळाने समोरच्या रस्त्याकडे पाहत संपी बोलू लागली,
‘किती स्ट्रेंज आहे ना हे.. पुन्हा पुन्हा असं वाटतंय, श्रुतीने कोणाशी तरी बोलायला हवं
होतं.. किंवा कोणीतरी तिच्यासोबत तरी असायला हवं होतं.. ती वेळ टळायला हवी होती.
कदाचित आज चित्र वेगळं असलं असतं.. कदाचित ती आज इथे असती.. पूर्वीसारखीच हसत.’
‘हम्म..’
‘फेल होण्याचं फीलिंग प्रचंड वाईट आहे आय अंडरस्टॅंड.. बट त्यामुळे
इतका टोकाचा निर्णय! नो यार..’
‘……’
मंदार तिला फक्त ऐकत होता. आणि तिलाही आत्ता तेच अपेक्षित होतं.
‘तुला माहितीये, मला
यावेळी आतून फीलिंग येतच होतं.. माझा विषय राहणार आहे कुठलातरी असं.. तसंच झालं
बघ. रात्री फोनवर आईला हे सांगताना इतक्या वर्षात कधी आलं नाही इतकं बेक्कार
फीलिंग आलं. स्वत:ची लाज, चीड, शरम.. सगळं सगळं वाटून गेलं.. आई
काही म्हणाली नाही. पण तिला वाटलंच असणार ना..’
‘हम्म.. मी समजू शकतो..’
संपी पुन्हा शांत झाली. तिचा तो गिल्टने भरलेला, अतिशय प्रामाणिक चेहरा मंदार पाहत
राहिला. नकळत संपीच्या डोळ्यांत पाणी दाटून आलं. ते पाहताच त्याच्याही नकळत एका
हाताने तिला जवळ घेत मंदार म्हणाला,
‘ऐ वेडाबाई, इट्स
ओके.. डोन्ट थिंक अ लॉट.. मला खात्रीये यावेळी पुन्हा जंप बॅक करशील तू.. असं
रडायचं नाही..’
त्या स्पर्शातली माया असेल, आपुलकी असेल किंवा अजून काही.. माहीत नाही, पण त्यामुळे संपीचा बांध फुटला आणि
ती रडायला लागली..
खूप रडली. त्यानेही तिला रडू दिलं. नुसताच गोंजारत राहिला.
त्याच्या खांद्यावर डोकं ठेवलेली ती. हळू हळू रडणं ओसरत गेलं. ती शांत
होत गेली..
वातावरण निवळावं म्हणून मग काहीवेळाने मंदार म्हणाला,
‘आता आणखी थोडं जरी रडलीस ना तर मला माझा शर्ट पिळून काढावा लागेल..
इतका तो ओला केलायस..’
संपीने मान हलवून लागलीच पाहिलं, खरंच तो संपीने डोकं ठेवलेलं तिथे ओला झाला
होता..डोळे पुसत, हसत ती
बाजूला झाली..
‘सॉरी..’
‘सॉरी? फॉर
व्हॉट?’
‘शर्ट.. ओला..’
‘हाहा.. अगं गम्मत केली मी..’
तिने हसून पाहिलं त्याच्याकडे. तो पुढे म्हणाला,
‘बरं एक सांगू का तुला?’
‘काय..’
‘रडताना ना..
तू..
फार घाण दिसतेस.. :D’
दोघेही यावर खूप हसले.
‘हो का.. असुदे..’ हसत
हसत लटकी रागावत संपी म्हणाली.
हसणार्या तिच्याकडे मंदार बराच वेळ पाहत राहिला. त्याला खरंतर आज
तिला मनातलं सांगायचं होतं.. त्यादिवशी तिने मागितलेल्या पार्टीला डन म्हणताना
त्याच्या मनात हाच विचार होता.. पण काल घडलेला प्रसंग, संपीचा रिजल्ट, मूड या सार्यामुळे त्याने तो विचार मनातून काढून
टाकला होता..
पण तिथल्या त्या वातावरणात त्याला का कोणास ठावूक काय वाटलं, तो बोलून गेला,
‘पण तरी खूप आवडतेस मला..’
संपीने दचकून त्याच्याकडे पाहिलं. तिच्यावर रोखलेले त्याचे डोळे.
तिच्या अंगातून एक तीव्र वीज चमकून गेल्यासारखं तिला वाटलं.
एवढ्यात वार्याची एक मोठी झुळूक आली आणि वरच्या झाडाची फांदी हलून
त्यावरचं पावसाचं पाणी त्यांच्यावर ओघळलं.
तिने आनंदून वर पाहिलं. त्याने क्षणभर डोळे मिटले आणि पुन्हा
तिच्याचकडे पाहत राहिला..
संपी बावरून गेली. पण बोलली काहीच नाही.
इतक्यात मंदारचा फोन वाजला.. त्याने फोन कडे पाहिलं, मैत्रेयीचं नाव..
संपीलाही ते दिसलं. तिने मान वळवली.
मंदारने फोन घेतला,
‘हॅलो..’
‘अरे कुठेयस तू? आजचं
ठरलंय ना आपलं.. सगळे जमलेयत.. तुझीच वाट पाहतायत’
‘अररे.. हो.. विसरलोच मी..’
‘वाटलंचं मला.. ये लवकर’
तिने फोन ठेवला.
मंदारने संपीकडे पाहिलं.
तिचा प्रश्नार्थक चेहरा.
‘अगं.. आज ग्रुपला पार्टी द्यायचं ठरलं होतं.. आम्ही दोघे देणार होतो..’
‘तुम्ही दोघे?”
‘मी आणि मैत्रेयी..’
‘..?’
‘ती फर्स्ट आहे ना आणि मी सेकंड.. कॉलेज मध्ये.. सो रिजल्टची पार्टी..’
तो बोलून गेला पण नंतर उगाच बोललो असं त्याला वाटलं.
‘ओहह..’
संपीला नाही म्हटलं तरी थोडं वाईट वाटलं. कदाचित थोडी जलसीसुद्धा..
विषय झटकत आणि काही झालंच नाही अशा आविर्भावात ती जागची उठली आणि
म्हणाली,
‘अरे वा! मस्त. कॅरि ऑन देन.. चल निघूया.. उशीर होईल तुला..’
मंदार थोडं विचार करून म्हणाला,
‘यू शुअर?’
संपी काहीच म्हणाली नाही.
‘तो प्लान पोस्टपोण होऊ शकतो.. ईफ यू विश..’
खाली बसलेला मंदार उभ्या असलेल्या संपीकडे पाहत बोलत होता.
‘नो नो.. कशाला.. जा तू.. एंजॉय!’
फार काही न बोलता ती जायला निघाली. आणि स्वभावाप्रमाणे शांत राहत लगेच react न होता तोही तिच्या मागे जायला
निघाला..
34
मेचं उन्ह डोक्यावर चढायला लागलं होतं. पण परिसर आल्हाददायक असल्याने
संपदा आणि राधा दोघींना ते जाणवलं नाही. साधारण दुपारच्या आसपास त्या पाचगणीला
पोचल्या. सृष्टी सोनेरी रंगात नाहत होती. आता काहीच दिवसात येऊन पोचणार्या
पावसाने ही सोनेरी कळा जाऊन तिच्यावर हिरवा शालू चढणार होता. आपापली sacks सांभाळत दोघी गाडीतून उतरल्या.
त्यांचा असिस्टेंट रवीन आज काही कारणाने येऊ शकला नव्हता. गेटजवळ स्वत: राठी
दोघींच्या स्वागतासाठी उभे होते.
‘या या.. ते तुमची जर्नी ऑल वेल नं? नाई रास्ता तसा चांगला आहे..’
‘हो.. राठीजी एकदम छान झाला प्रवास..’ राधा म्हणाली.
गेट मधुन आत आल्यावर त्या भल्यामोठ्या, नव्या=कोर्या रिसॉर्टचं दर्शन दोघींना झालं.
समोरचा प्रशस्त परिसर एक-दोन तुरळक झाडं सोडली तर अगदीच ओका-बोका दिसत होता.
‘रिसॉर्टचं काम आता पुर्न झालय. पन मी स्पष्ट सांगून ठेवलाय बघा lawn अँड गार्डनचं काम मार्गी
लागल्याशिवाय बूकिंग घ्यायच्या नाहीत..’
राठी उत्साहाने बोलत होते.
रिसॉर्ट मधल्या प्रशस्त ऑफिस मध्ये तिघे येऊन बसले.
दोघींची व्यवस्थित सरबराई करून झाल्यावर राठींचं पाल्हाळ बोलणं थांबवत
संपदा म्हणाली,
‘ठिके आम्ही जागा पाहून घेतो. माती, जमिनीचं texture वगैरे गोष्टी पहाव्या लागतील. त्यानुसार
डिजायनिंग करावं लागेल. त्यानंतर रिसॉर्टही आतून फिरून पहावा लागेल. Indoor काय-काय करता येऊ शकतं त्याचीही
चाचपणी आत्ताच केलेली बरी. आम्हाला पुन्हा-पुन्हा इथे येणं शक्य होणार नाही. काम
आखून दिलं की आमचे अस्सिस्टंट्स मग पाहतील पुढचं सगळं.’
‘रिसॉर्ट आतून? फोटोज
पाहून नाही का होणार काम..’
‘फोटोज पाहून? आम्ही
काय पुण्याहून इथे तुमचं रिसॉर्ट फोटोत पहायला आलोय का राठीजी?’
संपदा प्लॉटचा नकाशा चाळत शांतपणे म्हणाली.
‘नाही तसं नाही.. त्याचं काय झालं काल रात्री उशिरा एक ग्रुप आलाय.
आम्ही बूकिंग बंद आहे म्हणून किती सांगितलं तरी ते ऐकेचनात. खूप request केली. मग नाइलाजाने आम्हाला परवानगी
द्यावी लागली. ते दोन दिवस राहणारेत..’
‘काय? मग
आम्हाला कशाला बोलावलंत? सांगायचं
तसं आधीच. पोस्टपोण नसता का केला प्लान..’
राधा आता चिडायला लागली.
‘नाही मॅडम त्याचं असं झालं की हे सगळं रात्री खूप उशिरा घडलं ना.. आणि
सकाळी तर तुम्ही निघालात..’
राठी गप्प.
‘बरं ठीक आहे! नॉट ए बिग इश्यू.. ते जे कोणी स्टे करतायत त्यांना request करा. आम्हाला फार वेळ नाही लागणार.
अर्ध्या-पाऊण तासात होईल सगळं.’
संपदा म्हणाली.
‘हां.. ठीक आहे. मी बोलतो. आधी बघतो ते आहेत का.. तोवर तुम्ही बाहेरचं
पाहून घ्या.’
राठी लगबगीने उठून गेला.
दोघी मग बाहेर आल्या. मॅप आणि प्रत्यक्ष परिसराचा अभ्यास सुरू झाला.
कुठे-कसं-काय प्लान करता येईल, रिसॉर्टला सूट होईल आणि त्यांच्या अपेक्षांना खरं ठरेल असं डिजाइन कसं
करता येईल आचे आडाखे दोघींच्या डोक्यात सुरू झाले. शिवाय त्या मातीत आणि वातावरणात
कुठली कुठली नेटीव्ह प्लांट्स छान वाढतील याचाही विचार त्या करू लागल्या.
समोर काम आल्यावर संपदाच्या मनावरची मरगळ दूर झाली. आणि ती जोमाने
कामाला लागली.
काम चालू असताना मध्येच राधा म्हणाली,
‘यू नो व्हॉट काल मी पुन्हा कांदे-पोहे खाल्ले. आठवड्यात दुसर्यांदा!’
‘वॉव.. ग्रेट!’
‘काय ग्रेट? नको
वाटायला लागलेयत आता. एकदा ठरूदे लग्न, वर्ष-दोन वर्ष त्या पोहयांकडे वळूनपण पाहणार
नाही!’
‘हाहा..’
‘anyways, तर सांगायचं हे होतं की मी आपलं हे काम त्यांना
समजावून सांगितल्यावर त्या मुलाची मावशी मला ‘माळी’ म्हणाली म्हणजे gradner!’
‘काय??’
‘हो.. असे भेटतात ना एक-एक.. हसूचं आलं मला. म्हणजे माळी असणं इज नॉट अ
बॅड थिंग. बट आपलं काम फक्त तेव्हढंच नसतं हे कसं समजावणार ना..’
‘हम्म.. खरंय..’
अर्ध्या पाऊणतासाने त्यांचं डिसकशन चालू असताना त्यांना मागून राठी येताना दिसले.
‘ते झालंय बरंका.. त्या पोरांना काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही करू शकता
तुमची पाहणी..’
‘ओह ग्रेट.. इकडचं झालं की आम्ही येतोच तिकडे..’ संपदा उत्तरली.
‘बरं ते सगळं तुम्ही करा तुमच्या मनाप्रमाणे.. सेक्रेटरी ने तुम्हाला
रीक्वायरमेंट्स सांगितल्याच असतील समजावून. फक्त एक request आहे, ते सोनचाफ्याचं झाड मात्र लावा हा एक.. त्याचं
काये माझ्या मिसेसना फार आवडायचं ते.. ते एक लावा. बाकी तुम्हाला हवं तसं करा..’
राठीचा स्वर उगाचच आर्जवी झाला.
‘लाऊ की नक्की!! नका काळजी करू..’
राधा आणि संपदा दोघी एकदाच म्हणाल्या.
थोड्यावेळाने बाहेरचं सारं आटोपून त्या रिसॉर्ट पहायला आत आल्या.
रिसॉर्ट नवं होतं. इंटिरिअरही सुरेख केलेलं दिसत होतं. दोघी पूर्ण जागा फिरून पाहत
होत्या. पाहत पाहत प्रशस्त हॉल पास करून व्हरांड्यातून संपदा वरच्या फ्लोर वर आली, तिथली प्रशस्त सामायिक बाल्कनी, झोपाळा पाहून तिथे बरंच काही करता
येऊ शकतं याची नोंद तिच्या मनाने केली. आणि जराशी रेंगाळून ती अजून आत वळली.
प्रशस्त बेडरूम्स आणि अध्ये-मध्ये मोकळी जागा, कॉफी टेबल्स अशी रचना होती. तिथून जाताना एका रूम
पाशी ती थबकली. आतून आवाज येत होते. ‘ओळखीचा आवाज?’ ती
स्वत:शीच पुटपुटली. पण लगेच तो विचार झटकत पुढे सरकली..
फिरून पुन्हा बाल्कनी पाशी आली. तिथून खालचा परिसर न्याहाळताना अजून
काही आयडियाज तिच्या डोक्यात तरळल्या. त्या राधाला सांगाव्या म्हणून ती झटकन वळली
आणि खाली जायला निघणार इतक्यात मगाशीच्या रूममधून बाहेर पडलेला घोळकाही खाली जायला
निघालेला होता. त्या गडबडीत संपदा त्यातल्या एकाला धडकता धडकता वाचली. जवळपास
तिच्याच वयाचा तो तरुण तिला सॉरी म्हणाला. त्याला इट्स ओके म्हणत स्वत:ला ती सावरत
असतानाच समोर एक ओळखीची आकृती विस्मयाने आपल्याचकडे पाहत उभी असल्या सारखा तिला
भास झाला. पण तिकडे दुर्लक्ष करत खाली पडलेला फोन उचलायला ती वाकली आणि तिच्या
कानांवर पुन्हा तोच ओळखीचा आवाज आला,
‘संपदा...?’
फोन हातात घेतानाच तिच्या डोक्यात वीज चमकून गेली, मंदारचा आवाज??
तिने झटकन वर पाहिलं आणि समोर तिच्याइतकाच विस्मयित चेहरा घेऊन उभ्या
असलेल्या मंदार कडे पाहून चकित झाली..
35
संपी हॉस्टेलवर परतली ती थोडीशी खट्टू होऊनच. खरंतर, तिने खट्टू होण्याचं तसं काही कारण
नव्हतं हे तिलाही कळत होतं पण वळत मात्र नव्हतं. तिला मुळात हेही कळत नव्हतं की तिला राग नक्की
कशाचा आलाय. मंदार
जाणार होता याचा की तो मैत्रेयीसोबत असणार होता याचा की मैत्रेयी topper आहे आणि आपला मात्र एक backlog आलाय याचा.. हळूहळू तिच्या लक्षात
येऊ लागलं की तिच्या खट्टू होण्यामागे थोड्याफार प्रमाणात या तिन्ही गोष्टी
होत्या. पहिल्या दोन कारणांचा विचार केल्यावर आपण मंदारवर नकळत हक्क दाखवायला
लागलोय हे तिला जाणवलं. त्या भुरभुर, सोनसळी पावसात तो जे बोलला तेही तिला आठवलं. पुन्हा ती मोहरली! पण, मग तिसरं कारण आठवलं, मैत्रेयी topper आणि आपल्याला केटी.. यात खेद होता.
स्वत:विषयी अकारण मूळ धरू लागलेलं एक नवंच न्यून होतं.. आणि थोडी असूयाही! असूया? या विचाराने मात्र ती चरकली. तिला
स्वत:चीच शरम वाटली. न्यून आणि असूया या दोन्ही गोष्टी चुकीच्या आहेत हे तिने
स्वत:ला पुन:पुन्हा बजावून सांगितलं. आणि डोळ्यांत तरळलेलं पाणी निग्रहाने बाजूला
सारत तिने यावेळी आपल्या क्षमता शत-प्रतिशत वापरण्याचा आणि ‘focused’ होण्याचा निश्चय केला!
मंदारचा विचार अर्थात येत होताच मनात. पण त्याला टाळण्याची तिला गरज
वाटेनाशी झाली. आणि आपल्या मनात काय आहे हे लगबगीने त्याला सांगण्याची घाईही वाटली
नाही. तो आपला आहे हे फीलिंग तिच्या मनात आता रुजलं होतं. त्याच्या बाजूनेही
काहीसं असंच असावं. तिने आत्ता अभ्यासाकडे लक्ष केन्द्रित केलेलं आहे हे जाणून
त्या दिवशीचा विषय त्यानेही पुढे फार लावून धरला नाही. ज्या फीलिंग्स डीप रूटेड
असतात त्यांना सततच्या validationची किंवा संपर्काची आवश्यकता बहुधा नसतेच. त्या ‘असतात’.. कायम!
हॉस्टेलवर आता संपीचं मन रमेनासं झालं. येता-जाता श्रुतीची रूम
दिसायची आणि मग खूप अस्वस्थ व्हायचं. रात्रीच्या वेळी भीतीही वाटायला लागली होती.
काही दिवसातच मग संपी आणि मीनलने हॉस्टेल सोडायचा निर्णय घेतला. परिसरात जवळच एक
नवीन बांधलेलं घरगुती हॉस्टेल त्यांना सापडलं. आणि मग दोघी तिथे शिफ्ट झाल्या. तिथे
त्यांना प्राजक्ताही येऊन मिळाली. तिनेही तिचं जुनं हॉस्टेल सोडलं होतं. सो एक
मेघा सोडली तर कॉलेज मधला त्यांचा ग्रुप आता एकत्र रहायलाही लागला होता. मेघाचं
पुण्यात घर असल्याने ती अधून-मधून यांच्या रूमवर येत-जात रहायची. चौघिंची गट्टी
तशी पहिल्या वर्षापासूनच असली तरी आता त्यांच्यातली मैत्री घट्ट होत चालली होती.
संपी आणि प्राजक्ता दोघी जवळपासच्याच छोट्या शहरांमधून आलेल्या होत्या. त्याचं
बॅकग्राऊंड, कुटुंबं
ही पण एकसारख्या वळणांची. त्यामुळे दोघी एकमेकिना खूप रीलेट करायच्या.
नवी जागा, नवी
मेस.. संपी काही दिवस चांगलीच व्यस्त राहिली. त्यात कॉलेजमध्ये आता lectures, प्रॅक्टिकल्स व्यवस्थित सुरू झाले
होते. विषय नवीन आणि गुंतागुंतीचे असल्याने तिथे प्रॉपर लक्ष देणंही गरजेचं होतं.
दिवस भराभर जात होते. मंदारशी बोलणं व्हायचं पण बाकी कोणाशी आता जवळपास नाहीच.
भेटी-गाठीही कमी झालेल्या. अभ्यासातून वेळ मिळाला की संपी इतर पुस्तकांना जवळ
करायची. गौरी देशपांडे आता तिची आवडती झाली होती. ती, मेघा आणि प्राजक्ता तिघींनी गौरीची पुस्तकं
वाचण्याचा सपाटाच लावला. तिघी एक-एक पुस्तक विकत घ्यायच्या आणि मग शेअर करायच्या.
त्या कथा, त्यातली
पात्रं हे त्यांचे खूप आवडीचे विषय झाले होते. वाचून झाल्यावर तिघींच्या त्यावर
भन्नाट चर्चाही रंगायच्या. केवळ दिमित्री, इयन, कालिंदीच नाही तर नमू, वनमाळी, तेरूओ, सुहास या व्यक्तिरेखा देखील मनात घर करू लागल्या.
गौरीची काही कालातीत वाक्यं तर संपीच्या मनात अगदी फिट्ट बसली होती. अगदी त्यांची
फ्रेम बनवून भिंतीला टांगावी इतकी.. उदाहरणच द्यायचं झालं तर,
“...जोपर्यंत माझ्यातील माणूस या व्यक्तीबद्दल तुझ्यातील माणूस या व्यक्तीला दया, मैत्री,सहानुभूती,प्रेम वाटत नाही किंवा वाटल्याचा मला प्रत्यय येत
नाही तोपर्यंत सर्व पुरुषांना सर्व स्त्रियांच्या संदर्भात (किंवा नरांना
माद्यांच्या संदर्भात) होणार्या
ग्रांथिक स्रावांना प्रेमबीम म्हणण्याच्या भानगडीत न पडणंच चांगलं!....”
- कारावासातून पत्रे
आणि
“माझ्यातल्या कुठल्याच 'गुणा'मुळे
तू माझ्या प्रेमात पडलेला नाहीस. प्रेमात असणं ही किती प्रचंड , सुंदर, जगायला आवश्यक गोष्ट आहे हे माझ्याकडे बघून तुला
उमजलं , एवढंच
.”
# तेरुओ
यातल्या पहिल्या वाक्याने तिच्या मनातली ‘प्रेमा’ विषयीची बैठक, व्याख्या पक्की झाली होती. इतके दिवस जे वाटतंय
ते प्रेमच आहे की आणखी काही या प्रश्नापाशी ती अडखळायची. पण आता ते ठरवणं तिला
सोपं जाऊ लागलं. श्री, मयूरला
पण ती आवडायची. तेही एका मर्यादेपर्यन्त तिला आवडायचे. पण तिच्या बाजूने तरी ते
आवडण खोल नव्हतं. श्रीचा गमतीशीर स्वभाव तिला आवडायचा, मयूरचं mature वागणं आवडायचं.. पण, अंतर्बाह्य एखादी व्यक्ति आवडण, त्या व्यक्तीचं सोबत असणं आवडण, त्या असण्यामुळे नकळत आपलं स्वत:चं ‘असणं’ही नुकत्याच उमललेल्या कळीसारखं सुंदर होत जाणं
या गोष्टींचा अनुभव तिला फक्त आणि फक्त मंदारसोबत असताना यायचा.. आणि इथेच
गौरीच्या दुसर्या वाक्याचा प्रत्यय तिला आला!
प्रेमात पडण हे समोरच्या व्यक्तीच्या गुणावगुणावर अवलंबून नसतं तर
प्रेम म्हणजे त्या सार्याच्या पल्याड जात सारे भेद बाजूला सारत दोन मनांचं एक
होणं आहे हे तिला उमजलं आणि इतके दिवस ही गोष्ट मान्य करायला टाळाटाळ करणारं तिचं
मन ‘आपण खरंच
प्रेमात पडलोय’ या
जाणिवेने आनंदाने बागडायला लागलं. हे सगळं मंदारला धावत जाऊन सांगावं असंही तिला
वाटायला लागलं. तिने तसं केलं नाही. पण काही दिवसांनी घडलं मात्र तसंच..
गणपती येऊन गेले होते. पाऊस अजूनही अधून-मधून दर्शन देतच होता. एका
दिवशी असेच ढग दाटून आले. रिमझिम पाऊस पण सुरू झाला. सुंदर वातावरण! मंदारच्या काय
मनात आलं काय माहित त्या पावसात अंगावर जॅकेट चढवून आणि डोक्यावर हेलमेट घालून तो
संपीच्या कॉलेज जवळ आला. आणि खाली थांबून त्याने संपीला कॉल केला. संपी होती
क्लासरूम मध्ये. एक लेक्चर संपलं होतं. दुसरं सुरू होण्याची वाट पाहत मस्ती करत
सार्याजणी बसलेल्या. संपीने फोन घेतला. आणि तो खाली थांबलाय हे ऐकून चकित झाली.
काही विचार न करता मीनलला सांगून sack घेऊन ती खाली आली, समोर झाडाखाली पावसात उभा मंदार!
तिने तिचं जॅकेट चढवलं, हूड वर घेतलं आणि त्याच्यापाशी गेली.
‘काय रे असा भिजत? काय
झालय?’
‘बस गाडीवर..’
‘का? कुठे
जायचंय?’
‘सिंहगडावर.’
‘काय?’
‘हो..’
‘अरे पण, पाऊस..’
‘तू पावसाला कधीपासून घाबरायला लागलीस? चल.’
त्याच्याकडे पाहत क्षणाचाही विचार न करता संपी बाईकवर बसली आणि दोघेही
सिंहगडाच्या दिशेने निघाले..
36
मस्त रोमॅंटिक वातावरणात दोघेही जवळपास भिजून सिंहगडावर पोचले.
चोहीकडे हिरवळ, हाताशी
येतील असे वाटणारे ढग आणि एकमेकांची साथ.. मंदार आणि संपी आज ढगातच होते.
‘भारी वाटतंय ना?’ गडावरचं
धुंद वातावरण पाहून मंदार संपीला म्हणाला.
‘हो.. मस्तय! मी पहिल्यांदाच आलेय इथे..’
थोडं अंतर चालून गेल्यावर, मंदार संपीकडे पाहून म्हणाला,
‘लास्ट वीक ग्रुप सोबत आलो होतो इथे.. तेव्हाच ठरवलं होतं, एकदा तुला घेऊन यायचं..’
संपी जराशी हसली.
दोघेही मक्याचं कणीस खात एका दगडावर टेकले. पाऊस ओसरला होता. हलकंसं
उन्हही मधून मधून डोकावत होतं.
‘मग अभ्यास काय म्हणतोय?’ मंदारने विचारलं.
‘चालूये..’ कणीस
खात संपी म्हणाली.
‘नक्की ना.. नाहीतर बसशील पुन्हा dan brown नाईतर कोण ती तुझी सध्याची
फेव्हरीट.. हं, गौरी
देशपांडे.. घेऊन!’
कणीस बाजूला ठेवत संपी म्हणाली,
‘हाहा.. नाही, करतेय
मी अभ्यास. उरलेल्या वेळात वाचते अधून-मधून. वेळ मिळाला तर. पण, bdw तुला काय एवढं वावडं आहे रे त्यांचं?’
‘मला? हाहा
नाही तसं काही नाही..’
‘मग कसंय?’
‘वेल, फॉर
यॉर काइंड इन्फॉर्मेशन, माझ्या
कॉलेजमधल्या मुली माझं एटेन्शन मिळावं म्हणून काय-काय करतात. आणि तू बसतेस त्या
पुस्तकांमध्ये डोकं खुपसून..’
‘मग देत जा की त्यांनाच एटेन्शन..’
‘हो का? देऊ का
खरंच?’
‘दे की.. मला काय विचारतोयस’
‘संपदा, तू कधी
सीरियस होणारेस गं?’
‘सीरियस म्हणजे?’
‘म्हणजे सीरियस.. अबाऊट एव्रिथिंग.. अबाऊट लाइफ..’
‘सी मंदार, आय’म सीरियस अबाऊट माय लाइफ. आता मला
तीनच गोष्टी दिसतायत.. इंजीनीरिंग आणि त्यानंतर चांगल्या ठिकाणी प्लेसमेंट.. अँड
आय’म वर्किंग फॉर
दॅट नाऊ..’
‘या दोनच झाल्या.. तिसरी कुठली?’
‘त्या समोरच्या स्टॉलवरची पिठलं-भाकरी.. जाम भूक लागलीये. या तुझ्या
स्वीट कॉर्नने काहीच झालं नाही.. हाहा..’
‘ओह गॉड.. संपदा, यू आर impossible!!’
‘आय नो..’ म्हणत
संपी पिठलं-भाकरी घ्यायला गेली सुद्धा.
दोघांसाठी दोन प्लेट्स घेऊन ती परत आली.
स्वत:ची प्लेट हातात घेत मंदार म्हणाला,
‘अँड व्हॉट अबाऊट अस?’
‘अम्म?’ संपीचा
घास तोंडातच अडकला, ‘व्हॉट...
अबाऊट अस?’
‘मी तुला विचारतोय!’
‘मी काय सांगू.. तूच म्हणाला होतास की मी तुला आवडते..’
‘हो..’
‘आवडते म्हणजे नक्की काय..’
‘आवडतेस म्हणजे आवडतेस.. खूप आवडतेस. तुझ्यासोबत असलं की छान वाटतं..
तू कायम सोबत असावस असं वाटतं.. तुझं ते श्री आणि मयूर सोबत बोलणं सोडलं तर बाकी
सगळंच आवडतं..’
‘हाहा.. पण मी बोलणं सोडणार नाहीचे त्यांच्यासोबत..’
‘यस.. आय नो दॅट अनफॉर्चुनेटली! आणि मी पण नाहीच सोडणार मैत्रेयीसोबत
बोलणं..’
संपीने चमकून त्याच्याकडे पाहिलं,
‘नको सोडूस.. मला काही फरक नाही पडत.’
‘असं का?? बर...’ हसू दाबत तो म्हणाला.
‘हसू नकोस तू.. खरंच मला काही फरक पडत नाही.’
‘हाहा.. असुदे. तिचं साधं नाव जारी घेतलं तरी चेहर्यावर बारा वाजलेले
असतात आपल्या..’
‘....’
दोघेही जरावेळ शांत झाले. हातातलं पिठलं-भाकरी पण संपलं होतं. संपीने sack मधून पाण्याची बाटली काढली. हात
धुवून पाणी प्यायली. आणि बाटली मंदारला दिली.
दिवस कलला होता. गार वारा सुटलेला.
सुरुवात कोणी करायची या प्रश्नापाशी अडलेले दोघे काहीवेळ नुसतेच
अवघडुन बसून राहिले.
काही वेळाने न राहवून मग संपीच म्हणाली,
‘ओके. बास आता. उठ आणि छान प्रपोज कर मला..’
‘काय?’ तो
दचकून म्हणाला.
‘हो.. बस गुढग्यावर.. आणि विचार..’
‘हाहा.. काहीही.. आर यू सीरियस?’
‘हो.. damn serious.. माझी फॅंटसी आहे, जो असं गुढग्यावर बसून विचारेल त्यालाच मी हो
म्हणेन..’
‘काय?? संपदा..
तू अ श क्य आहेस!’ मंदार
हसत म्हणाला.
‘माहितीये मला.. उठ..’
मंदारने क्षणभर विचार केला आणि मग तो खरंच उठला. शेजारच्या कुठल्याशा
वेलीवर उगवलेलं कुठलंसं फूल हातात घेतलं आणि संपीसमोर गुढग्यावर बसत, तिच्या डोळ्यांत पाहत म्हणाला,
‘संपदा, तू ठार
वेडी आहेस हे मला माहितीये. But still I’m in love with that
madness.. in love with ‘YOU’..’
नाही म्हटलं तरी आजूबाजूच्या चार चेहर्यांनी वळून बघितलंच.
संपी अवाक झाली होती. तो खरंच असं काही करेल, तिला वाटलं नव्हतं.
ती जागची उठली.
आणि ते फूल हातात घेत म्हणाली,
‘बरा बोलतोस तसा कधी-कधी..’
उभा राहत मंदार म्हणाला,
‘बास? मला
गुडघ्यावर बसायला लावलंस. तू एकदा नुसतं तरी म्हण.. उत्तर दे.. you do
or not?’
संपीने एकदा हातातल्या फुलाकडे पाहिलं, एकदा त्याच्याकडे आणि मग काहीच न म्हणता मान
वळवून गालातल्या गालात हसली फक्त..
‘ओह माय गॉड.. लाजलीस तू चक्क?? बघू इकडे..’
चेहरा सावरत मग संपी त्याला म्हणाली,
‘गप्प बस.. चल आता उशीर झालाय.. अभ्यास आहे मला.’
आणि चालता चालता तिने हळूच तिचा हात त्याच्या हातात गुंफला..
मंदारने सुखावून तिच्याकडे पाहिलं. तिने त्या एका स्पर्शातून त्याला
काय-काय सांगून टाकलं होतं..!
To Be Continued..
संजीवनी देशपांडे
(कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहेत.)
टिप्पण्या
Regularly yenar hote na bhag!?