संपी आणि तिचं धमाल जग : भाग ३८



ऐनवेळी सगळे ढग जाऊन चंद्र लख्ख दिसायला लागला आणि सगळ्या पोरींनी जोरात कल्ला करायला सुरुवात केली. मग हॉस्टेलच्या टेरेसवर धुडगूस नुसता. भेंड्या, खेळ, खेचाखेची, गोस्सिप सगळ्याला उत आला. एरवी फूल ऑन मूड मध्ये असणारी संपी त्यादिवशी मात्र भलतीच शांत वगैरे होती. गालात हसणं काय, सतत फोनकडे पाहणं काय.. मीनल तिला मधून मधून चिडवत पण होती. आकाशातला टप्पोरा चंद्र पाहून कधी नव्हे ते तिला भलतं रोमॅंटिक वगैरे वाटायला लागलं. एरवी धांगडधिंगा गाणी ऐकणारी ती, आज मात्र एकदम करण जोहर टाइप फिल्म सोंग्स वर झुलत होती. जगातली सगळीच्या सगळी रोमॅंटिक गाणी ही फक्त आपल्यासाठीच बनवली गेली आहेत असा अजून एक साक्षात्कार या फेज मध्ये होतो तसा तो तिलाही झाला. प्रेम आणि संगीत हे प्रचंड अजब काहीतरी कॉम्बिनेशन आहे हे तिला आता उमगलं होतं.

दुसर्‍यादिवशी कॉलेजमध्ये मीनलने पूर्ण ग्रुपला अगदी तामझाम के साथ संपीची लव-स्टोरी रंगवून रंगवून सांगितली. संपी लाजत होती खिदळत होती एकूण सगळं गुलाबी गुलाबी बनलेलं होतं. त्यात कोणीतरी तिला विचारलं, अगं पण गिफ्ट काय दिलं त्याने तुला? आणि ग्रीटिंग वगैरे? प्रेमात especially प्रपोज करताना हे compulsory असतं. यावर संपीच्या डोक्यात आलं, अरेच्चा खरंच की, यातलं काहीच दिलं नाही त्याने. अजून एकीने अजून थोडी प्रेमातली सो कॉल्ड स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसीजर समजावून सांगत तिला म्हटलं, मग आता गुड मॉर्निंग, गुड नाइट मेसेजेस, दर तासाला लव यू, मिस यू वगैरे असं करता की नाही तुम्ही? तिसरी म्हणाली, हो मग! करत रहायला पाहिजे बाबा, आपली जागा आपण क्लेम करत रहायची. आणि हो, जेवलीस का वगैरे तो तुला विचारतो की नाही याकडे लक्ष ठेव बरंका.. नाही केलं तर समजायचं तो caring नाहीये.. बापरे! प्रेम-बिम हे इतकं अवघड वगैरे असतं? संपीला टेंशनच आलं. पण पुढच्या लेक्चरमध्ये असाइनमेंट पूर्ण न केल्यामुळे झालेल्या सत्कारामुळे ती थोडी प्रेम ह्या विषयातून बाहेर आली आणि तिने सरळ लायब्ररी गाठली.

दुपारी डबा खाताना तिने फोन चेक केला, बरेच unread मेसेजेस होते. त्यातला पहिले मंदारचा तिने उघडला. चार-पाच मेसेजेस ओळीने.

हाय!

काय करतेयस

उद्या भेटायचं का?

आणि सगळ्यात शेवटी होतं, जेवलीस का?

बास! संपी खुश. एक eligibility criteria त्याने फुलफिल केलेला होता. मग तिनेही तसाच गोड-गोड रीप्लाय करून टाकला. आणि खुदू-खुदू हसत डबा संपवला. थोड्यावेळाने बाकीचे मेसेजेस पण चेक केले. आणि त्यातला एक पाहून आनंदाने उसळलीच. तो होता चक्क दिशाचा! दिशा. Omg. कित्ती दिवसांनी. खरंतर वर्षांनी. बारावी झाल्यापासून संपर्कच नव्हता काही. तिचा मुंबईला नंबर लागलाय एवढीच माहिती. मागे एकदा शिर्के कडून मोबाइल नंबर मिळाला होता पण तो कधी लागलाच नाही. बदलला बहुतेक तिने. आताचा हा वेगळाच दिसतोय.

संपे.. मी पुण्यात आलेय. पत्ता सांग. येतेय भेटायला.

संपीचा आनंद गगनात माईना. एवढ्या वर्षांनी दिशा भेटणार ह्या विचाराने तिने मनातल्या मनात उडीच  मारली. लगेच तिला पत्ता सेंड करुन टाकला.

पूर्ण दिवस मग दिशाच्या विचारांमध्ये अगदी भुरर्कन उडून गेला.

संध्याकाळी ठरलेल्या वेळेला संपी बस स्टॉप वर तिची वाट पाहत थांबली होती.

तेवढ्यात मंदारचा मेसेज आला,

हाय

संपीची गाडी मग सुसाटच सुटली,

अरे गेस व्हॉट आज मला कोणाचा मेसेज आला होता?’

कोणाचा?’

दिशा! दिशाचा.. आठवते का तुला?’

ओहह.. बरावीतली दिशा??”

हो. तुझं नाव तिच्याशी जोडलं गेलं होतं ती.. हाहा..

ए चल. असं काही नव्हतं.

हो का! राहुदे. कसे गुलू-गुलू बोलत थांबायचात दोघे. सुरूवातीला एके दिवशी तर अगदी माझ्या बेंच समोरच चालू होतं तुमचं.

हाहा.. काहीही.. काय चालू होतं आमचं?’

हेच. ती तुला कुठले क्लास, कुठेले बुक्स न ऑल असले प्रश्न विचारत होती आणि तू पण फुल shining मारत होतास तिच्यापुढे.

‘lol.. omg.. काहीपण बरंका संपे..

काहीपण नाही खरंच. मलाच घाम फुटला होता महितीय का. असं मुलांशी बोलणार्‍या मुली दिसल्या की मला तेव्हा सांस्कृतिक धक्काच बसायचा. त्यात तुम्ही अगदी माझ्यापुढेच..

अगं चिल. आम्ही फक्त बोलत होतो. तू असं बोलतेयस जसं काही..

अरे तेव्हा ते पण फार डेंजर वाटायचं. त्यात तिचं झालं की तू माझ्याशी बोललास. कुठलं पुस्तकं हवं होतं तुला वगैरे काहीतरी विचारलं होतंस. मी कधी मागितलं होतं रे पुस्तक-बिस्तक तुझ्याकडे..

बापरे. किती सगळं आठवतं गं तुला?’

हो मग! सगळं आठवतं मला!

हो का.. बर.

तेव्हा नंतर तिचं नाव त्या शिर्के सोबत जोडलं गेलं नाहीतर काय माहीत काय झालं असतं..

काय झालं असतं म्हणजे?’

एवढ्यात संपीला बस येताना दिसली आणि तिने मंदारला काही नाही. चल ती आली वाटतं. बोलते नंतर म्हणत बाय केलं..

संपी बस मधून उतरणार्‍या सगळ्यांकडे कुतुहलाने पाहत होती. दिशाला शोधत होती. पण ती काही दिसेना. आणि मग थोड्यावेळाने पाठीमागून तिला कोणीतरी येऊन बिलगलं. तिने वळून पाहिलं तर दिशा. आई गं. किती बदललीये ही. आणि हे काय चक्क साडी वगैरे. संपीला धक्काच बसला. दिशाच्या बोलण्याने ती विचारांमधून बाहेर आली.

संपे.. omg. कसली ढिंचक दिसतेयस तू जीन्स मध्ये? वॉव. म्हणजे भारीच की.

हेहे.. थॅंक यू.. अगं पण काय तू.. कुठे होतीस. गायब च झालीस नंतर. आम्ही इथे नंतर जीटी वगैरे अरेंज केले. मजा आली. आता सगळे contacts मध्ये पण आहोत. तूच नव्हतीस..

अगं हो हो.. सांगते सगळं. चल आधी हॉस्टेलवर तुझ्या. मला ही साडी बदलायचीय.

दोघी मग बोलत बोलत कधी हॉस्टलवर येऊन पोचल्या त्यांना कळलंही नाही..

 

 

क्रमश:

 

संजीवनी देशपांडे 

 

टिप्पण्या

अनामित म्हणाले…
वेगळाच टर्न
अनामित म्हणाले…
Pudhcha bhag kadhi aata?
Suharsha म्हणाले…
Waiting for Next Part......
अनामित म्हणाले…
पुढील भाग किती तारखेला येणार आहे ते प्लिज एकदा कळवा म्हणजे पुन्हा पुन्हा ब्लॉग चेक नाही करावा लागणार!!
क्रांती म्हणाले…
पुढचा भाग कधी येणार ?
अनामित म्हणाले…
येणार आहेच की नाही पुढचा भाग?

लोकप्रिय पोस्ट