संपी आणि तिचं धमाल जग : भाग ४०
दिशा येऊन गेली त्यानंतरचा जवळपास महिनाभर संपी गप्प-गप्पच होती.
मंदारशी पण तिचं बोलणं तुटक-तुटकच सुरू होतं. कॉलेज, लेक्चर्स, असाईनमेंट्स, प्रॅक्टिकल्स यातून वेळ पण तसा कमीच मिळत होता.
दिशाचं बोलणं, वागणं सारंच
तिच्यावर खोल परिणाम गेलं होतं. तिच्याविषयी वाटणारं प्रचंड कुतूहल एकीकडे आणि आपण तिच्या
तुलनेत अजून किती बाळबोध आहोत याची होत असलेली जाणीव एकीकडे. न जाणो असा प्रसंग
आपल्यावर आला तर?
तिच्याइतक्या हिमतीने तोंड देता येईल आपल्याला? ह्या
विचारानेच ती प्रचंड अस्वस्थ होत होती. मंदारपासून असं वेगळं होण्याची वेळ आली तर? ती हा विचारही झटकन झटकून द्यायची. म्हणजे तिच्या मनाने आजवर ह्या
शक्यतेचा विचारच केलेला नव्हता. प्रेम आहे म्हणजे असणार आहे. कायम. आणि मग तो ही
असणारच आहे. कायम. आपण विचारही किती बाळबोध करतो असं तिला वाटायला लागलं. एकाला
आपलं मानलं की मानलं मग इतर विचार करायचे नाहीत ह्या सांस्कृतिक मुशीतून घडलेलं
तिचं मन सध्याच्या काळातल्या नव्या शक्यतांपर्यंत अजून पोचलेलंच नव्हतं. आणि
दिशाच्या माध्यमातून तिला एकप्रकारे त्या शक्यतांचं दर्शन झालं आणि ती बावरून
गेली.
मंदारचं कॉलेज अभ्यास वगैरे सगळं व्यवस्थित सुरू होतं. एव्हाना
संपूर्ण ग्रुप मध्ये त्याचं संपीसोबत असलेलं रेलेशन पण उघड झालेलं होतं. आणि
त्याला ते सगळं एकप्रकारे आवडतही एफएफएफहोतं. संपी तिच्याही नकळत ग्रुप मधल्या
जवळपास प्रत्येकाचं छुपं क्रश होती. तिचं साधं, सरळ, मोकळं असणं
प्रत्येकाला हवसं वाटायचं. आणि अशी संपी आता आपली गर्लफ्रेंड आहे ही गोष्ट मंदार
नाही म्हटलं तरी मिरवायला लागला होता. पूर्वीचा आपला बिनधास्त मित्र हा असा फारच
बॉयफ्रेंड टाइप्स वागायला लागलाय हे संपीलाही कुठेतरी खटकायला लागलं होतं. तिला ते
आधीचंच नातं अधिक हवसं वाटत होतं. आधीचं कसंही काहीही बोलता येणं जाऊन आता निव्वळ सो
कॉल्ड प्रेमामधला औपचारिकपणा उरला होता त्यामुळे सुरुवातीची चार वाक्यं झाली की काय
बोलायचं हा प्रश्न आणि एक प्रकारचं uninvited मौन चॅटच्या स्क्रीनवर
उरलेलं दिसायचं. उद्या वेगळं व्हायची वेळ आली तर काय ह्या विचाराने संपी थोडी जास्त
detached वागायला लागली होती हेही खरं. आणि याउलट मंदार मात्र
वरचेवर रोमॅंटिक होत चालला होता. जे इतक्यात संपीच्या पचणी पडणं थोडंसं कठीणच होतं.
त्यामुळे ती तिथून पळ काढायची. मग मंदारला प्रश्न पडायचा ही अशी का वागतेय. पण स्वभावाला
अनुसरून तो फारसं विचारायचा नाही. मनातल्या मनात conclusions
काढत रहायचा.
त्या वयातलं प्रेम म्हणजे, प्रेम आहे हे कळत असतं, ते व्यक्त करण्याची अनिवार ओढ
असते, पण ती इतकी नाजुक भावना हाताळावी कशी, प्रेम करावं कसं हेच मुळात ठाऊक नसतं. मग प्रत्येकजण आपआपल्या परीने जाऊन
भिडतो, काही सपशेल कोसळतात, काही ठेचकाळतात, काही धावायला जातात तर काहींना तो सुवर्णमध्य जमतो. मंदार आणि संपीच्या बाबतीत
ते चाचपडत होते नुसतेच कधीपासून. आहे ती मैत्रीही हरवतेय कुठेतरी असं वाटायला लागलं
होतं. याच धामधुमीत सेमिस्टर पण संपलं. परीक्षा झाल्या. संपीने यावेळी स्वत:ला भलतंच
अभ्यासात बुडवून घेतलं होतं. परीक्षा झाल्यावर आप्पा आजारी होते म्हणून मंदारला न भेटताच
ती गावी निघून आली.
घरी आल्यावर तिला समजलं की आप्पांची एंजियोप्लास्टी झालीये आणि परीक्षा
चालू असल्यामुळे आपल्याला कोणी काही सांगितलंच नाही. ती तडक आप्पांपाशी जाऊन बसली.
पथ्य-पाणी व्यवस्थित चालू असल्यामुळे त्यांची प्रकृती बरी वाटत होती पण अशक्तपणा बर्यापैकी
जाणवत होता. तिच्या डोळ्यातलं पाणी पाहून अप्पा हसून म्हणाले,
‘एवढं काळजी करण्यासारखं काही नाही इंजींनीयरीण बाई. आता आमचं हे मशीन जुनं
झालंय. वरचेवर डागडुजी करत राहावं लागतं. आता तेल-पाणी झालंय. आता बघ कसा ठणठणीत होतो
काही दिवसात.’
‘अप्पा..’ म्हणत संपीने डोळ्यातलं पाणी पुसलं आणि किंचित
हसली.
बाहेरच्या खोलीत आल्यावर मात्र तिने नमिला आणि बाबांना फैलावरच घेतलं.
‘परीक्षा चालू असली म्हणून काय झालं? तुम्ही मला कळवायला
नको?? मोठी नात आहे मी त्यांची!’
‘हो-हो मोठी नात! पेपर कसे गेले ते सांग आधी. आणि ते कपडे.
किती चिकट गं? दोन वर्ष होत आली, अजून कपडे
धुवायला शिकली नाहीस तू.’
आतून बाहेर येत आईने तिच्या फुग्यातली हवाच काढून घेतली.
या आया अशा का असतात टाइपचा लुक देत संपी बाबाजवळ जाऊन बसली.
क्रमश:
संजीवनी
टिप्पण्या
Most waited part released..
Nice as usual 👌🏻
पुढील भाग consistent असावेत ही अपेक्षा...