संपी आणि तिचं धमाल जग : भाग-४१

 




तुझे देखा तो ये जाना सनम.. च्या ट्यून वर संपीचा जुना manual keypad वाला फोन बर्‍याच वेळापासून जीव तोडून वाजत होता.

सकाळ झाली तरी संपी अजून पहाटच्याच स्वप्नात विहरत होती. सॉलिड स्टेट devices सारख्या सर्वात कठीण समजल्या जाणार्‍या विषयाच्या प्रॅक्टिकल एक्झॅम मध्ये तिने रट्टा मारलेलं सोपं प्रॅक्टिकलच तिच्या वाट्याला आलंय आणि ती ऐटीत ते सर्वात आधी पूर्ण करून आपण कसे हुशार असा आव आणत लॅब मधून बाहेर पडतेय असं काहीसं स्वप्न होतं. पण तिथे मध्येच तुझे देखा तो.. कोण गातंय हे काही तिला कळेचना. आणि मग दुसर्‍या क्षणी तिथे मंदारपण हजर झालेला दिसला. आणि ती आता त्याला आपल्याला प्रॅक्टिकल कित्ती सोपं गेलंय हे सांगणार इतक्यात नमिने येऊन तुझे देखा तो.. बंद करून संपीला गदा-गदा हलवलं आणि संपी झोपेतून उठली.

‘ए नमे.. काय गं?? कशाला उठवतेयस मला??’ डोळे चोळत संपी.

ए मला हौस नाही. तुझा सनम कधीपासून तुझी आठवण काढतोय..हे घे. नमिने ठणकावून फोन तिच्या हातात ठेऊन दिला.

संपी दचकलीच. सनम?? हिने फोन पाहिला की काय?

खाड्कन डोळे उघडून तिने फोन चेक केला. मंदारचे ९ मिस्स्ड कॉल्स. पटकन तो लॉक करत ती नमिला म्हणाली,

सनम काय सनम हम्म?? ते आवडतं गाणं आहे माझं. म्हणून रिंगटोन ठेवलीये. जा तू. आईला माझा चहा टाकायला सांग.

हो माहितीय. राहुदे. टाइप्स लुक देत नमि वरुन खालपर्यन्त संपीकडे पाहत डोळे बारीक करून तिथून निघून गेली.

इकडे संपीने झोपेतून उठलेला आवाज जरासा ठीक-ठाक करत मंदारला फोन लावला,

हॅलो..

हॅलो!! अगं आहेस कुठे तू? कधीपासून फोन करतोय मी!!’ आवाजात खूपसा ताठरपणा.

झोपले होते रे मी.. काय इतक्या सकाळी फोन केलास तू.

सकाळी? दहा वाजलेयत दहा.

संपीने वळून खोलीत नजर फिरवली. आयत्या वेळेला हे घड्याळ एक पटकन दिसत नाही.

इकडे मंदार पुढे बोलू लागला,

काल रात्री मेसेजेस केले होते तुला. तुझा रीप्लाय नाही. वाटलं झोपली असेल. सकाळी उठून पाहिलं तरी रीप्लाय नाही. फोन घेत नाहीस. काय चाललंय काय तुझं?’

अरे बाबा काल रात्री मी मूवी बघत बसले होते सेट मॅक्स वर. ढीशुम-ढीशुम. मग झोपले. फोन नाही पाहिला. आणि उठलेय आत्ता. मग पाहणार कधी. थांब आता पाहते.

आता काय उपयोग? राहुदे. संपदा तुझं आजकाल काय चाललंय कळत नाहीये मला. बोलत का नाहीस तू माझ्याशी?’

अरे असं काही नाही रे.

मग कसंय? भेट आज मला. कॉलेज जवळ.

अरे आज? नको आत्याकडे जायचंय. आणि इथे गावात भेटणं म्हणजे तुला माहितीय नं, लोक चर्चा करतात.

कसली चर्चा? आणि तू याची कधीपासून पर्वा करायला लागलीस!

करावी लागते बाबा. भेटू आपण उद्या-परवा. मी कळवते तुला. आई हाका मारतेय. चल बाय बाय.

संपीने फोन कट केला.

चहा पित-पित आणि आईचं नणंद-पुराण ऐकत-ऐकत संपी मनातल्या मनात हा मंदार आजकाल असा बोअर का वागतोय?’ ह्या प्रश्नापाशीच अडून बसली होती.

 

संध्याकाळी ती आणि आई गावातल्या ज्या आत्याकडे जाणार होत्या ती आत्याच दुपारी संपीच्या घरी आली.

बाई, वहिनी, आज थोडे पोहेच कर हां.. शेंगदाणे थोडे जास्तच टाक.

आल्या-आल्या आत्याची रेल्वे पाहून संपी मुकाट आत जायला वळणार, तेवढ्यात आईने खुणेने तिला स्वयंपाकघरात बोलावून पोहे संपलेयत, जा घेऊन ये म्हणून पिशवी देऊन बाजारात पिटाळलं तेव्हा ती जराशी चरफडलीच.

वाटेत बरीच रमत-गमत मेन रोडला लागून संपी ठरलेल्या किराणा दुकानात शिरली. तिचं गाव ते केवढं. एक सरळ-सोट मुख्य रस्ता आणि त्यातून दोन्ही बाजूने आत फुटत गेलेले रस्ते-उपरस्ते. दुकानात शिरल्यावर संपीने ऐटीत, काका, पोहे द्या अशी आरोळी ठोकली.

पातळ की जाडे?’ पलिकडून ठरलेल्या लयीतला प्रश्न.

झालं, संपी पडली बुचकळ्यात. कांदे-पोहे कशाचे बनवतात..? इथून सुरुवात. जाडे असतात बहुतेक. हो! चिवड्यात नाही का ते क्रिस्पि पातळ पोहे दिसतात. अरेच्चा! पण आईने चिवड्यासाठी आणायला संगितले की कांदे-पोहयांसाठी? शी. काय आपण. ती सांगते तेव्हा लक्ष कुठे असतं माझं! संपी स्वत:वरच चरफडली. पण मग आत्याला कांदे-पोहे आवडतात मग जाडे पोहेच हवे असतील असं लॉजिक लावून बराच वेळ शून्यात पाहिल्या नंतर तिने, जाडे पोहे द्या. अशी विजयोत्सुक दुसरी आरोळी ठोकली.

खांद्यावरच्या मळक्या कपड्याला हात पुसत निर्विकारपणे तिच्याकडे पाहत असलेल्या त्या दुकानातल्या मामांनी तितक्याच निर्विकारपणे तिच्याकडे दूसरा प्रश्न फेकला, किती?’

घ्या! संपी पुन्हा स्वत:च्या बावळटपणावर चरफडली. किती आणायला सांगितले होते आईने? की तिने घाईत सांगितलंच नाही? की आपण लक्ष दिलं नाही? शी. किती पोहे लागतात कांदे-पोहयांसाठी? आपण खरंच बावळट आहोत ह्या निष्कर्षापर्यन्त ती आता पोचलेली असली तरी तो जगजाहीर व्हायच्या आत पटकन काहीतरी उत्तर द्यायला हवं हे उमजून तिने विचार केला, एक किलो सांगावे. पण मग लगेच तिला वाटलं, पुरले नाहीत तर? आणि तसेही आपल्याला कांदे-पोहे आवडतातच म्हणत तिने शेवटी, दोन किलो.. असं सांगून टाकलं. मग वरुन खालपर्यंत तिला न्याहळून तितक्याच निर्विकार चेहर्‍याने ते मामा दोन किलो जाडे पोहे आणण्यासाठी आत वळले आणि एकदाचा संपीने सुटकेचा नि:श्वास सोडला.

संपे.. काय करतेयस इथे?’ ओळखीचा आवाज ऐकून तिने चमकून वळून पाहिलं तर समोर श्री. बर्‍याच दिवसांनी असं अवचित भेटलेल्या त्याला पाहून संपी मनापासून आनंदली.

श्री.. अरे पोहे घ्यायला आले होते.

पोहे? आत्तापासून? कार्यक्रम सुरू केलेस की काय?’ डोळे मिचकावत त्याने तिची चेष्टा केली.

पण संपीच्या नेहमीच्या वेगाने तो विनोद कळायला तिला मिनिटभर तरी लागलाच. आणि तो कळल्यावर,

अजून असे फुटकळ विनोद करतोसच का तू?’ संपी उपहासाने म्हणाली.

हो आणि तुला ते अजूनही लवकर कळत नाहीत.

हो का.. वेरी फनी. म्हणत तिने तोंड वेंगाडलं आणि मग दोघेही मोठयाने हसले.

बर्‍याच दिवसांनी भेटल्यामुळे मग दोघांच्या गप्पा भरपूर रंगल्या. मध्येच कधीतरी त्या मामांनी पोहे आणून दिले, संपीने त्यांना पैसे दिले आणि दोघे दुकानाबाहेर पडून रस्ता चालायला लागले होते. हसत-खिदळत जाताना दोघांना आजूबाजूचं भानच मग उरलं नाही. आणि अर्थात हातात आइस-क्रीमचं पॅकेट सांभाळत समोरून येणारा मंदारपण त्यांना दिसला नाही. तो अगदीच समोर येऊन उभा ठाकल्यावर संपीला अजूनच आश्चर्य वाटलं,

अरे मंदार तू? काय भारी योग आहे आज. हा बघ श्री पण आत्ताच भेटला मगाशी दुकानात.

शांतपणे एकदा तिच्याकडे आणि मग त्याच्याकडे पाहत तो म्हणाला,

हो दिसतंच आहे ते. गप्पाही बर्‍याच रंगलेल्या दिसतायत.

त्याचा सुर श्री आणि संपी दोघांना जरासा खटकला. श्री मग गप्पच राहिला. संपी जुजबी काहीतरी बोलली, इकडे कुठे वगैरे..

यावर धड काहीच न बोलता,

आत्याकडे जाणार होतीस ना तू आज? इकडे आहे का घर त्यांचं?’ असा रुक्ष आणि खोचक प्रश्न त्याच्याकडून आल्यावर काय ते उमजून संपीने उत्तर द्यायला तोंड उघडलं होतं पण,

‘anyways, चला तुमचं चालूद्या. मी निघतो. नाहीतर माझं आइस-क्रीम वितळेल. म्हणत तो श्री ला बाय करून संपीकडे न पाहता तिथून निघूनही गेला.  

संपी awkward झाली. तिच्या आणि मंदारच्या नात्याची नाही म्हटलं तरी कुण-कुण सगळ्यांनाच लागली होती. श्रीला सुद्धा. तोही काही न बोलता गप्प झाला आणि मग जाता-जाता पुढच्या दोन-तीन दिवसात जुन्या कॉलेजमध्ये ठरू पाहत असलेल्या गेट-टुगेदर विषयी त्याने संपीला सांगितलं, आणि जमल्यास ये म्हणून निघून गेला.

हे सगळं काय होतं? या सार्‍याचा डोक्यात उडालेला गोंधळ सावरत मग संपी आईचा ओरडा बसू नये म्हणून घराच्या दिशेने झपा-झप निघाली..

 

 

संजीवनी देशपांडे

 


टिप्पण्या

Suharsha म्हणाले…
Mast jamlay hahi bhag nehmipramane...
Pan khoop ushira yetat bhag so link tutate..
Tanuja म्हणाले…
Chhan zalay ha pan bhag. Navin twist kade chalali ahe katha haluhalu.
Suharsha, Tanuja.. Thank you both. your comments inspire me to write and finish off Sampi as early as possible. keep reading :)

लोकप्रिय पोस्ट