ओढाळ मन..
ओढाळ मन.. आकाशात डोळे रुतवून बसलेलं, समोरच्या अगम्य प्रश्नांची
उत्तरं त्या वरच्या अगम्य पोकळीकडे मागणारं. दुखर्या जाणिवांचे शतशर उरावर घेऊन
भळभळत्या नजरेने करुणेचा एक-केवळ एक झरा शोधू पाहणारं. क्षणागणिक मनात उसळणार्या
कित्येक ठायी-अनाठायी अंदोळणावर स्वार होत जीवाच्या आकांताने स्वत:चा तोल सांभाळू
पाहणारं.. ओढाळ मन.
जीव कातर-कातर होतो. मन आक्रसून स्वत:च्याच कुशीत शिरू पाहतं. ओल्या
कडा आत-आत झिरपत जातात. बंद डोळ्यांना नेणिवेची उघड-झाप जाणवते. वनराई. गर्द वनराई
समोर दिसायला लागते. जाणीव-बोट सोडून मग मन धावत आत शिरतं. सुखावणारा, गात्रांना तृप्त करणारा
हिरवाकच्च रंग समोर जिकडे-तिकडे. मन बागडतं. पुष्पदळांतून प्रसवणार्या सुगंधावर
स्वार होतं. अलगद येऊन आठवणींच्या दवबिंदूवर स्थिरावतं. कितीतरी ओळखीचे नाके, धक्के, भिंती, घाट, कोपरे, कागद, जपून ठेवलेलं
एखादं पेन, रंग उडालेला जुन्या दाराचा तुकडा, मायेने ओथंबणार्या दुधाळ नजरा, आकाशाशी नातं
सांगणारी असंख्य स्वप्नं डोळ्यांत घेऊन तुडवलेले बोळ, रस्ते, जागा, इमारती.. Empathy, my dear, empathy
should be the ultimate aim of your human existence. संवेदनांशी
बांधलेली ती तेव्हाची घट्ट पदर-गाठ. ती सुटू देऊ नकोस, आतून-
खूप आतून येणारा तोच ओळखीचा संवेदनेचा आवाज. तो जुना मंजुळ,
नवथर झर्यासारखा आवाज आता एखाद्या आटत चाललेल्या विहिरी सारखा का भासतोय? विचारात गुंतलेल्या मनाला समोरच्या पायवाटेवर दिसतात स्वत:चीच पाऊले.
ह्या इथूनच आपण चालत गेलो. नाचलो. उन्मेषांवर थिरकलो. ते गगनभेदी हसूही आहे अजून
इथे. वळून बघता क्षणभर मागे.. त्या चैतन्याच्या आदिम सुरांवर तरंगणारं तेव्हाचं मन
नातं सांगू पाहतं हरवलेला सुर शोधू पाहणार्या आताच्या मनाशी. आणि बोट धरून घेऊन
जातं आत-आत. एकेकाळी माती खणून, जीव ओतून लावलेलं विचारांचं
एखादं रोपटं भेटतं वाटेत. आपल्याच बाळाने आपल्यावर सावली धरावी तसं मायेने
गोंजारतं मनाला. हरवलेल्या डोळ्यांना दृष्टी गवसावी तसं काहीतरी.
तीच वाट. तेच रस्ते. जागोजागी उभी स्वत:ची जुनी रुपे.
भेटत-बोलत-सांगत-ऐकत-हलकं होत पुढे जाता-जाता कधीतरी तुरटी फिरावी तसं सगळं नितळ
व्हायला लागतं. आणि एका गाफिल क्षणी पायवाट संपून पायांना स्पर्श होतो गार-गार
तुषारांचा. आनंदून मन वर पाहतं तर समोर तीच खळाळणारी, जीवंत उन्मेष वाहणारी, आत्मप्रेरणेची नदी दृष्टीस पडते.. जिच्यामुळे आपलं अस्तित्व आहे, जिने जगण्याला कारण, जीविताला हेतु दिले होते, ती. तीच. आत्मानंदाच्या परमोच्च क्षणी उल्हसित मन क्षणार्धात तिच्यात
स्वत:ला झोकून देतं. अहम-अहमिकेचं ओझं फेकून दिलं जातं. मी पणा विरघळून जातो. इथे
तरायचं असेल तर हे ओझं फेकावंच लागतं हे मनाला पक्कं माहीत असतं. स्वच्छ मनाला
उघडं अवकाश दिसायला लागतं.
आणि मग त्याच नदीसोबत वाहत-वाहत डोळे उघडून नेणिवेचं बोट सोडून मन
पुन्हा जाणीव अवकाशात येऊन पोचतं. दृष्टी स्वच्छ. मन हलकं. आकाश-पोकळीत उत्तरं शोधणारं ओढाळ मन, आपल्याच मनाच्या मातीला स्पर्शून आल्यावर मधाळ-मधाळ होऊन जातं..
संजीवनी
टिप्पण्या
जाहिरातींचं काही करता येतंय का पाहते नक्की. मलाही अडसर होतोच आहे त्यांचा थोडासा.