नक्षत्र-बाधा


 



नक्षत्र-बाधा 

अंधाराचं वेटोळं करून, ते पांघरून मन चिडिचूप झोपलेलं असताना आकाशातल्या कुठल्याशा नक्षत्राने त्याला जागं करण्याचा चंग बांधावाच कशासाठी? निपचीत अंधाराची सवय झालेल्या मनाला दूरस्थ प्रकाश-किरणांची आस दाखवायची ती का म्हणून?

आजूबाजूच्या अंधारात कर्तृत्व गाजवणार्‍या अंधार-प्रभृतींना मग कुणकुण लागते, कोणाच्या तरी डोळ्यांत नक्षत्रांची चमक दिसू लागल्याची. पण तसं होता कामा नये. अंधाराचं अस्तित्वच धोक्यात येईल नं अशाने. एकदा प्रकाश पाहिलेले डोळे पुन्हा फिरून कशाला अंधारातल्या फुक्या कर्तृत्वाचा उदो-उदो करतील.

रोहिणी, कृत्तिका, पूर्वा, उत्तरा, शततारका, सार्‍या सार्‍या अनंतात झळाळत असताना आपण का असे अंधार पांघरून बसलोय? आपसूक मनाला प्रश्न पडायला लागतात. पण डोळ्यांत निव्वळ चमक पेरून गेलेल्या या नक्षत्र-तारका ह्या अशा प्रश्नांची उत्तरं देत नाहीत. ती शोधायची असतात, त्या डोळ्यांनाच. अंधाराचा विरोध झुगारून. आणि इथून सुरू होतो संघर्ष. प्रकाशाची चमक अनुभवलेल्या डोळ्यांचा प्रस्थापित अंधाराशी. संघर्ष.

त्या डोळ्यांना मग वेगळं पाडलं जातं. पिढ्या-पिढ्यांचा अंधार-वारसा सोडून ही कसली आलीयेत नवी प्रकाशाची थेरं? इतकी वर्षं दिवस-रात्र तुझ्यावर अंधाराची शिंपण केली ती हा दिवस पाहण्यासाठी? हे बघ, बाकीचे कसे निमूट अंधाराचं अस्तित्व आणि अधिकार मान्य करून शांत पडून आहेत. आणि तू! झोपी जा परत.

जागं होणं हाच जिथे अपराध समजला जातो तिथे सुरवंटांच्या नशिबी घुसमट ही येणारच. आणि हे असे कसल्यातरी दूरच्या आशेने झळाळून उठणारे डोळे? त्यांना जे दिसतं ते आजूबाजूच्या अंधाराच्या आकलना पलिकडचं असल्याने तो अंधार ह्या रश्मि-दीप्त डोळ्यांनाच वेडं ठरवतो. हे घडतच आलंय. घडत राहणार.

त्यांनी ठरवलेल्या कोंदणात आपण बसू शकलो नाही तर आपलं अस्तित्वच निरर्थक समजणारी ही रचना. इथे कोणाला आपली नक्षत्र-बाधित सुख-दु:खं कथावित? आणि कशासाठी?

रोज उठून अंधार बाजूला सारून आपला-आपला, थोडा-थोडा प्रकाश पीत रहावं बास. हेटाळणी, शंका, अवहेलना.. जे काही वाट्याला येत राहील त्याच्याकडे डोळे लख्ख उघडे ठेऊन पाहावं. या डोळ्यांना त्या अंधार-सावल्या घाबरतात हे जाणून असावं. त्यातल्या गगनभेदी, अनादि, नक्षत्र-आसक्तीला त्या घाबरतात, जाणून असावं..

एक ना एक दिवस हा अंधार शमणार आहे. प्रकाश तेवणार आहे. जाणून असावं.

 

झळाळून उठतील लक्ष ज्वाळा,

डोळ्यांत दाटलेल्या नक्षत्र-फुला,

गंध दरवळेल तुझाही

झुळूक तुझीही येईल

आसमंतात अक्षरे, घुमतील तुझी

नदीतून खळाळत गाशील तूही..

ठेव केवळ आतला, निखारा जागता

तूच होशील एक दिवस तुझा नक्षत्र-सोहळा..

तूच होशील एक दिवस तुझा नक्षत्र-सोहळा..!

 

तोवर, रोज उठून अंधार बाजूला सारून आपला-आपला, थोडा-थोडा प्रकाश पीत रहावं. बास.

 

 

संजीवनी


टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट