संपी आणि तिचं धमाल जग : भाग ४३

 



(भाग ३९ पासून पुढे)

 

     पाचगणीहून परतल्यापासून संपदा थोडीशी शांतच होती. खोल आतून ढवळून निघावं असं तिचं झालं होतं. अचानक समोर आलेला मंदार, त्याला पाहून मनाचा अट्टहासाने बंद केलेला हळवा कोपरा पुन्हा उघडा पडला होता. जे झालंय ते तसंच व्हायला हवं होतं का? आपण तेव्हा निर्णय घ्यायची घाई केली का? किंवा जे दिसत होतं त्याहून चित्र काही वेगळं होतं का? मनात पुन्हा चार-पाच वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेचा पोस्ट-मोर्टेम व्हायला सुरुवात झाली होती. पण या प्रश्नांना आता काहीही अर्थ नाही हे स्वत:ला बजावून सांगताना मात्र तिच्या मनाच्या चिंध्या होत होत्या.

राधानेही एक-दोनदा प्रयत्न करून तो विषय आता सोडून दिला होता. Monsoon जवळ आल्याने कामांची घाई सुरू होतीच. संपीच्या मनात मात्र तो विषय ठाण मांडून बसलेला होता. जे झालं ते बरोबर नव्हतं असं एक फीलिंग का कोणास ठाऊक दरवेळी यायचं. आताही ते होतंच. पण त्याहीपेक्षा अस्वस्थता अधिक होती. हुरहूर होती. भेटावं का एकदा? की चॅट करावं? पण नंबर कुठेय आपल्याकडे त्याचा. तिने पुन्हा त्याची एफबी प्रोफाइल चाळली. नावापुढचा हिरवा डॉट तो ऑनलाइन आहे हे दाखवत होता. हिची धडधड उगाच वाढली. तिने चॅटबॉक्स उघडला. आणि कितीतरी वेळ टाइप करावं की करू नये ह्या विचारात घुटमळत राहिली. पण मग एका क्षणी होऊदे काय व्हायचय ते म्हणत ती msg टाइप करायला घेणार इतक्यात तिला पलिकडून तोच काहीतरी टाइप करत असल्याचं दिसलं. आतातर तिची धडधड एकदम पीक वर पोचली. तिने क्षणार्धात चॅटबॉक्स क्लोज केला. लगेच मेसेज सीन गेला तर आपण त्याचाच विचार करत होतो हे त्याला कळेल या भीतीने. पण लक्ष तिकडेच होतं. एक-दोन मिनिटं ‘typing’ असच दिसलं आणि मग New Message From Mandar Awachat असं नोटिफिकेशन तिच्या प्रोफाइलवर झळकलं. काय ते उघडून पहायची तिला घाई झाली पण असं लगेच पाहिलं तर desperate वाटेल नाहीतर वाट पाहत असल्यासारखं वाटेल इ.इ. विचार करत उगाच इकडे-तिकडे स्क्रोल करत राहिली. काही फरक पडत नाही असा आव आणत. पण शेवटी धीर न धरवून तिने msg पाहिलाच,

‘Hi Sampada..’

दोन गोष्टी तिला ठळक जाणवल्या. एक म्हणजे ‘hi’ ने सुरुवात करण्याची त्याची जुनी सवय. आणि तिचा संपी ऐवजी संपदा असा केलेला उल्लेख. ओळखीच्या अनोळखीपणाची झाक असं काहीतरी त्यात होतं. एव्हाना त्याच्या नावापुढचा ग्रीन डॉट नाहीसा झालेला होता. त्यानंतर रीप्लाय करावा की नाही ह्या प्रश्नापाशी संपदा बराचवेळ अडखळली. पण रीप्लाय न करता आता आपण राहू शकत नाही हे उमजल्यावर तो काय करावा ह्या प्रश्नापाशी येऊन अडली. पहिल्यांदा तिने hi टाइप केलं. पण मग ते थोडं रुक्ष वाटेल की काय म्हणून hey टाइप केलं पण ते उगाच फार कूल-बिल वाटायला नको म्हणून hi wassup असं टाइप केलं. आणि मग शेवटी स्वत:च्या वेंधळेपणावर हसत,

‘Hi Mandar..’

असं टाइप करून सेंड केलं.

 

 

..........

   

(भाग ४२ पासून पुढे)

 

    हलक्या वार्‍यावर तरंगत-तरंगत संपी कधीतरी हॉस्टेलवर परतली. हे जे काही आहे ते कसलं भारी आहे! सगळं जग असं इतकं सुंदर का वाटायला लागलंय. ती त्या तरंगणार्‍या वार्‍यावरून खाली उतरायलाच तयार नव्हती. तिच्या मनातलं भविष्याचं चित्र जरी अजून ब्लर असलं तरी त्यात मंदार मात्र आता सगळीकडे होता. तो असणार हे तिने गृहीत धरायला सुरुवात देखील केली होती. दिवस भराभर जात होते. कधी ट्रेकिंग, कधी गाण्याचे कार्यक्रम, कधी कसले वर्कशॉप्स, कधी मिसळ, फावल्या वेळची कॉफी तर कुठेच गेलेली नव्हती. संपी आणि मंदार आता इतके एकमेकांत गुंगून गेले होते की आजूबाजूचं जगत्यांच्यासाठी ब्लर झालं होतं.

दोघे सतत एकमेकांशी बोलत असायचे किंवा मग एकमेकांविषयी तरी बोलत असायचे. मित्र-मैत्रिणींमध्ये पण ह्यांच्या नात्याविषयी चर्चा वाढल्या होत्या.

पण सगळं इतकं सरळ नसतं काही वेळा. त्यामागे काही वेगळ्याच गोष्टी दडलेल्या असू शकतात. आणि ह्याची प्रचिती संपीला त्यादिवशी मेस मधून परतताना आली. तिला समोरून चक्क श्री येताना दिसला. तो या भागात या वेळी असण्याचं तसं काही कारण नव्हतं. तिला जरासं आश्चर्यच वाटलं.

अरे श्री! किती दिवसांनी!! आणि इकडे कसा काय तू?’

मग चेहर्‍यावरचं कन्फ्युजन बाजूला सारत तो म्हणाला,

अगं इकडे माझी एक दूरची ताई राहते. त्यांच्याकडे कार्यक्रम होता सो आलो होतो

ओहह अच्छा. भारीच की. आधी कधी म्हणाला नाहीस

हम्म तशी वेळ नाई आली कधी. Anyways कशी आहेस? काय चाललंय?’

मी मस्त! तू?’

मी पण.

चल कॉफी घेऊया?’

अम्म.. चालेल

का कोण जाणे पण श्री आज नेहमीसारखा वाटत नव्हता. भेटून पंधरा मिनिटे झाली होती तरी अजून एकही टुकार विनोद त्याच्याकडून आला नव्हता. संपीला उगाच awkward वाटायला लागलं.

कॉफीचा सिप घेत त्याने विचारलं,

मग मंदार काय म्हणतोय!

त्याच्या ह्या प्रश्नामागे चेष्टा होती की कुतूहल की उपहास हे संपीला नक्की कळलं नाही.

तुला माहीत असेलच की. तुझा पण मित्र आहे नं तो.

संपीने उगाच आडवळण घेतलं.

हम्म.. पण तुझा खास मित्र आहे!

‘…’

आपकी खामोशी ही सब कुछ कह जाती है मोहतर्मा!

‘lol.. बरायस नं तू. हे काय भलतंच. आहे मित्र. आवडतो. बास. त्यात काय खामोशी न ऑल!

तेच तेच.. शेवटी पैज जिंकलीच म्हणायची पठ्ठ्याने.

पैज?’

वाह! मस्त होती कॉफी. चल निघायला हवं. उशीर होतोय.

कॉफी संपवून उठत श्रीने तो विषय टाळायचा प्रयत्न केला. पण त्याला अडवत थोडीशी गंभीर होत संपी म्हणाली,

नाही. एक मिनिट. होऊदे उशीर. सांग मला आधी कसली पैज ते

अगं काही नाही. असंच म्हणालो मी

असंच? Seriously? आता सांगणार आहेस की मी मंदारला फोन लावू?’

श्रीला बोलावं की बोलू नये काही कळत नव्हतं. पण शेवटी तो म्हणाला,

मंदारने फर्स्ट यरला असताना त्याच्या मित्रांसोबत पैज लावली होती, संपदा जोशीला पटवून दाखवेन म्हणून

क्काय? कोणते मित्र?’

त्याच्या कॉलेज मधले

आणि हे तुला कसं माहित?’

त्याचा रूममेट माझ्या ओळखीचा आहे. त्याने स्वत: मला सांगितलं होतं हे

कोणीतरी विजेचा शॉक द्यावा अशी संपीची अवस्था झाली होती. ती संतापाने चरफडत होती. आपण ज्याला प्रेम समजत होतो ती मंदारसाठी एक पैज होती हे याची जाणीव होऊन आतून भळभळत देखील होती.

त्यानंतर तिथून रूमवर ती कशी परतली तिचं तिला ठाऊक. दगडासारखी नुसती बसून राहिली किती तरी वेळ. आयुष्यात पहिल्यांदा फसवणूक नावाची गोष्ट तिने अनुभवली होती. तीही ज्याला अगदी जवळचं समजलं त्या मंदार कडून!

तिने तिच्याही नकळत मंदारचा नंबर डायल केला.

अगं जेवण करतोय.. विल कॉल यू बॅक असं काहीतरी तो म्हणाला. पण संपीला त्यातलं काही ऐकूच आलं नाही.

हे सगळं म्हणजे तुझ्यासाठी एक पैज होती??’

काय?’

संपदा जोशीला पटवण्याची पैज?? मंदार? Seriously?’

संपे.. एक मिनिट. काय आहे हे? कोणी सांगितलं तुला?’

ते महत्वाचं नाही. अशी पैज तू लावली होतीस?’

संपदा अगं..

होतीस की नाही?’

हो.. पण ती खूप जुनी गोष्ट आहे. आणि it was all just fun. नथिंग सिरियस.

‘fun? I never expected something like this from you, Mandar! Goodbye.’

त्यानंतर संपीने फोन cut केला. आणि मंदारला आयुष्यातून अक्षरश: पुसून टाकलं.

त्याने अर्थात खूप प्रयत्न केला तिच्याशी बोलण्याचा, तिला समजावण्याचा, भेटण्याचा. पण तिने कशालाच अगदी कशालाच प्रतिसाद दिला नाही.

तिने मनाचा तो भाग फ्रीज करून टाकला. कायमचा. अभ्यास जवळ केला. मंदारशी सबंध येऊ शकेल अशा कुठल्याच ग्रुपशी संबंध ठेवला नाही. ईवन मंदारचं नावही ती आता तिच्या आयुष्यात येऊ द्यायला तयार नव्हती. जसं काही घडलंच नाही. अशी कोणी व्यक्ति तिच्या आयुष्यात कधी आलीच नव्हती असं ती वागायला लागली.

तिचं हे स्वत:ला गोठवून टाकणं तिच्या मैत्रिणींची काळजी वाढवणारं होतं. पण तिने तो विषय मुळातून काढून टाकण्याचा निग्रहच केला होता.

एकदा मीनलने धिटाई करून विषय काढला तेव्हा ती फक्त इतकंच म्हणाली,

त्याने मला पैजेचा विषय बनवलं. ही गोष्ट मी कधीही मनातून काढू शकत नाही. त्याच्याशी आता बोलण्याचा तर प्रश्नच येत नाही. काय होईल फार तर. त्रास होईल. इतक्या दिवसांची सवय झालीये नं. पण इट्स ओके. दिवस असाही अभ्यास आणि कॉलेज मध्ये निघून जातो. फक्त रात्रीच्या काही तासांचा प्रश्न आहे. पण आय विल मॅनेज!

मीनल तिच्याकडे नुसतीच पाहत राहिली.

 

संपीने अर्थात मॅनेज केलंही. पुढची तब्बल चार-पाच वर्षं.

अगदी त्यादिवशी पाचगणीत तो समोर येऊन उभा ठाके पर्यंत! 

 

(आजपासून उर्वरित कथेचा रोज एक भाग पोस्ट होईल)

 

संजीवनी देशपांडे


टिप्पण्या

अनामित म्हणाले…
खूप छान!
अनामित म्हणाले…
Thank you for posting next part.
पण संपी अशी उथळपणे रिॲक्ट होईल असं वाटत नाही, आत्तापर्यंत तिच्या स्वभावात होत गेलेले बदल पाहता.. काही दिवसांपूर्वी मंदारला समजावणारी संपदा - तिला असं एका फटक्यात नातं तोडून टाकणं सूट नाही होते
अनामित म्हणाले…
२ दिवस झाले, पुढचा भाग काही आला नाही
@अनामित१ : thank you :)

@अनामित२ : most welcome :) ;)
माणूस नेहमी लॉजिकलच वागेल असं काही नाही.

लोकप्रिय पोस्ट