राखी पौर्णिमा


 

प्रॉबॅबिलिटि.. trigonometry.. aromatic hydrocarbons.. malleability.. सो अँड सो अँड सो अँड सो.. सगळा होमवर्क रात्री करू असं मनातल्या मनात म्हणत मी पुस्तकं बंद केली. नववीत एवढा अभ्यास तर पुढे काय काय असेल. का असतो हा अभ्यास. आणि तो इतका का असतो? सुट्टी म्हटल्यावर तर डबल होमवर्क देतात. अर्थच काय उरतो त्या सुट्टीला मग

पण एक मिनिट, सुट्टी असूनही इतकं बोर का होतंय मला? आई स्वयंपाक घरात बिझी. ताई अभ्यासात. ती इतका अभ्यास का करते? बारावीत असल्यावर इतका अभ्यास करायचाच असतो का? पण मी काय म्हणते, ती काही का करेना तिच्यामुळे नंतर मला ऐकून घ्यावं लागतं त्याचं काय.. ताईकडे बघ, ती किती अभ्यास करते. नाहीतर तू! हे आमच्या घराचं ब्रीदवाक्य आहे. रोज दहावेळा तरी याची टेप वाजवली जातेच

जाऊदे फारच बोर होतंय. टीव्ही पहावा का? नको.. त्या सगळ्या गोग्गोड राखी पोर्णिमेच्या जाहिराती आणि मालिकांचे पण राखी पौर्णिमा विशेष भाग. ह्या लोकांना काहीच कसं नाही वाटत. जगात काय सगळ्यांनाच भाऊ असतात का राखी बांधायला? भाऊच काय आमच्या घराला तरपुरुषनावाचीच संकल्पना माहीत नाही. बाबा मला कळत नव्हतं तेव्हाच वारले. त्यानंतर आई, ताई आणि मी. बास. कधीतरी गावी जातो पण तिथेही फक्त आजीच. मग हे असलेभावाचाउपास, ‘भाऊबीज, राखीपौर्णिमा वगैरे सण आले की कानकोंडं व्हायला होतं. काल-परवा शाळेबाहेर स्टॉल लागला होता राख्यांचा. सगळ्या जणी पहायला लागल्या म्हणून मी पण पाहत होते. तर त्या स्ट्यलिश नेहाच्या ग्रुप मधल्या कुचक्या रावीने हसून म्हटलं, ‘अगं तू कोणाला बांधणारेस?’ असा राग आला होता नं. पण, पुजा तेवढ्यात मध्ये पडून म्हणाली, ‘एवढं काय, तू नं माझ्या दादाला बांध’. मी फक्त हसून पाहिलं. नंतर त्या स्टॉलवरची एक किरमिजी रंगाची राखी फार आवडली म्हणून मग घेऊन पण टाकली होती. कुठे ठेवली बाबा ती.. हम्म ही काय बॅग मध्येच आहे. पण काही म्हणा, राख्या दिसतात सुंदरच

आई आज स्वयंपाक करताना जास्तच भांडी आपटतेय का की मला भास होतोय? असो, ती कामात आहे तोपर्यंत फोन बघते तिचा. तेवढाच timepass. आईचं व्हाट्सअप पण ना.. किती वेळा म्हटलं चांगला डीपी ठेव तर ऐकतच नाही. श्या इथे पण राखीपौर्णिमा? सगळे रक्षाबंधनाचे फॅारवर्ड्स, स्टेटस पण तेच सगळे.. 

चिमू.. अगं कधीची बेल वाजतेय. दार उघड. दूधवाले मामा असतील.’

आईची आज्ञा ऐकून उठले. दार उघडलं

काय ताई कधीपास्नं वाजवतोय बेल..’

काहीतरी म्हणायला तोंड उघडतंच होते की दुधाचं पॅकेट धरलेला त्यांचा हात दिसला. कोपरापर्यन्त रख्यांनी भरलेला. मग काही म्हणता नुसतं हसून दार लावून घेतलं. पॅकेट आईला नेऊन दिलं. आई थोडी जास्तच शांत वाटतेय का आज?

जाऊदे अभ्यासच केलेला बरा असं वाटून पुन्हा पुस्तकांपाशी आले तर समोर पुन्हा ती किरमिजी राखी. शी यार आता खरंच बोर होतंय

सगळं बाजूला ठेऊन गॅलरीत जाऊन उभी राहिले, बाहेर पाहत. कितीतरी वेळ. कसल्या तंद्रीत होते काय माहीत, ताई कधी बाजूला येऊन उभी राहिली समजलंच नाही

काय झालं गं नकटे? अशी का थांबलीयेस?’

मला एक नाव सुद्धा आहे हे हिच्या का लक्षात येत नाही?

काही नाही. असंच.’

असंच? मला वाटलं बोर होतंय तुला..’

हिला कसं कळलं. चेहर्‍यावर लिहलंय की काय माझ्या

‘…..’

छानय राखी. मला माहीत नव्हतं, तुला हा रंग आवडतो ते..’

माझी किरमिजी राखी समोर धरत ती म्हणाली. कुणीतरी येऊन बरोब्बर नस पकडावी तसं झालं. इतका वेळ धरून ठेवलेलं पाणी टचकन माझ्या डोळ्यांत तरळलं. तिला ते दिसलं पण तसं दाखवता, तिने राखी मला देत तिचा हात माझ्यापुढे धरला आणि म्हणाली,

बांध.’

मला क्षणभर काही कळलंच नाही. मी तशीच ढीम्म उभी.  

बांध की. रक्षा काय फक्त भाऊच करू शकतो का? बहीण नाही

 वेडाबाई! बांध पटकन. ओवाळणी हवीये नं?’

आता माझ्या डोळ्यांतून गंगाच वाहू लागली. किती खरं बोलत होती ती

डोळे पुसत, हसत-हसत मग ताईला राखी बांधताना राखीपौर्णिमेचा खरं अर्थ कळला. आणि मग ओवाळणी म्हणून तिचं खास, दहावीच्या निकालानंतर आईने तिला दिलेलं महागडं पेन मला देताना ती जे म्हणाली, ते ऐकून कोपर्‍यात उभ्या आईने डोळ्यांतलं पाणी पुसत आम्हाला थम्ब्सअप केलं..

ताई म्हणाली,

खूप अभ्यास कर चिमु. हा अभ्यास आणि हे आपलं शिक्षणच आपली खरी रक्षा करत असतं, हे कायम लक्षात ठेव.’

त्यानंतर, तिचा राखी बांधलेला हात, माझ्या हातातलं पेन आणि रडत-रडत हसणारी आई असं सुपरहिट कॉम्बिनेशन असलेला सेल्फी काढून मी तो झोकात स्टेटसला ठेवला. आणि caption दिलं,

रक्षाबंधनाच्या खूप शुभेच्छा!!’ 



संजीवनी देशपांडे 

(Concept - Rajpal Barche)


टिप्पण्या

अनामित म्हणाले…
khup chan.. I believe in same.
अनामित म्हणाले…
खुप छान..🙌🙌

लोकप्रिय पोस्ट