संपी आणि तिचं धमाल जग - भाग : ४५

 



“पहाटेची वेळ म्हटल्यावर हे मेले रिक्षावाले डबल पैसे घेतात!”

संपीची आई, जेवढे पैसे दिले त्याच्या दुप्पट शिव्या त्या रिक्षावाल्याला घालत संपीच्या फ्लॅटची बेल वाजवत होती.

आतमध्ये बर्‍याच गहन विषयांवर चर्चा करून संपी आणि राधा दोघी सोफ्यावरच आडव्या झाल्या होत्या. खणाणणार्‍या बेल च्या आवाजाने दोघी खाडकन उठल्या. आणि चांगल्या इरसाल शिव्या झाडत संपी दार उघडायला धावली पण उघडलेलं तोंड समोर आईला पाहून आश्चर्याने अजूनच फाकलं.

आई तू??”

“हो मी.”

संपीला बाजूला सारत आई आत शिरली सुद्धा. राधा डोळे चोळत, गुड मॉर्निंग काकू.. असं काहीतरी पुटपुटली.

आईची बॅग आत घेऊन संपीने दार लावलं.

तोपर्यंत काकू सोफ्यावर बसून घर स्कॅन करत होत्या.

काही म्हणाली नाहीस येणारे वगैरे?’

न सांगता येऊ शकत नाही का मी?

“अगं तसं नाही. घ्यायला आले नसते का मी स्टेशन वर तुला?’

“कशाला? मी माझी मी येऊ शकत नाही असं वाटतं का तुला?’

ह्या माय-लेकींच्या प्रश्नांची जुगलबंदी पाहून राधा उठून आत पाणी आणायला गेली.

घराचा एकूण अवतार पाहूनही त्यावर काहीही टोमणेयुक्त कमेन्ट न करता काकूंनी पाणी प्यायलं.

आता अशाच भूतासारख्या पाहत राहणार आहात का माझ्याकडे? कामं-बिमं नाहीत का तुम्हाला?’

यावर मग नाईलाज होऊन दोघी इकडे-तिकडे पाहू लागल्या. संपीने मग नेहमीसारखा उशीर झालेला आहे हे लक्षात आल्यावर मोर्चा तडक बाथरूमकडे वळवला. आणि शून्य मिंटात तयार होऊन दोघी बाहेर पडल्या.

जाता-जाता राधा नाहीतरी म्हणालीच संपीला,

संपदा, आज काकू अचानक? काय विशेष?’

यावर संपीने माहित नाही अशा अर्थाने खांदे उडवले. पण आईचं असं अचानक येणं तिला बुचकळ्यात टाकणारं होतं हे मात्र खरं. कारण घर-आबा-बाबा-नमि ह्यांना सोडून ती क्वचितच कुठे जायची. पुण्यात संपीकडे तर शक्यतो नाहीच. काही कारण असल्याशिवाय ती अशी अचानक यायची नाही हे स्पष्टच होतं. पण संपीने तो विचार तात्पुरता बाजूला ठेवला. तिच्या मनात चालू असलेल्या तर्‍हेतर्‍हेच्या गोंधळांमध्ये हा विषय नक्कीच शेवटी होता. नवीन कामं. त्यात तिच्या जगावेगळ्या कल्पना. त्या क्लाएंट्सच्या गळी उतरवताना तिला करावी लागणारी सारी धडपड. मग प्रत्यक्षात काम करताना करून घेतलेला डोक्याचा भुगा आणि शेवटी सगळं मनासारखं छान, सगळ्यांना भुवया उंचवायला लावणारं काम झाल्यावर तिच्या चेहर्‍यावर उतरणारं वेंधळं हसू.. संपीचं हे असं दरवेळी व्हायचं. आणि या सार्‍यांत ती इतकी गुंगून जायची की आजूबाजूच्या कशाकडे तिचं लक्षच जायचं नाही.

मागच्या महिन्यात असंच झालं. एकादिवशी कामावरुन परत येताना बिल्डिंग खाली मुलं येऊ घातलेल्या होलीचं प्लॅनिंग करत होती. तिने सहज विचारलं,

कसलं प्लॅनिंग रे?

होलीचं

होली? त्याचं काय प्लॅनिंग करायचं?

ते आम्ही DJ वगैरे सगळं अरेंज करून होली सेलिब्रेट करणार आहोत.

ते राहुद्या, आधी सांगा तुम्हाला बोंबलता येतं का?

क्काय?

Convent मध्ये शिकणार्‍या त्या पोरांनी भूत बघितल्याचा आव आणला. मग काय मॅडम बसल्या की तिथेच. तिने त्यांना होळीला मोळ्या गोळा करून होळी पेटवून बोंबलण्यात कसलं अचाट थ्रिल असतं ते समजावून सांगितलं. आणि येत्या होळीला होली नव्हे होळी सेलिब्रेट करण्याचं ठरवलं. मग काय लागली की पोरं आणि त्यांच्यासोबत संपीही कामाला. लाकडं नुसती गोळा करायची नसतात तर वाळलेल्या फांद्या हेरून-त्या तोडून आणणे ते घरातल्या जुन्या फर्निचरचे अवयव हळूच चोरून आणण्या-पर्यन्त सार्‍या कुरापती तिने त्यांना शिकवल्या. आणि हे सगळं करून शेवटी खुद्द होळीच्या दिवशी मात्र आलेल्या क्लाएंटला डेलिया सारखी फुलझाडं न लावता कुंद, पारिजात, निशिगंध वगैरे नेटीव्ह आणि सुगंधी झाडं लावणं कसं त्यांच्या lawn साठी जास्त उपकारक आहे हे, ecosystem-environment-soil texture इ. अनेक विषयांवरून गाडी नेत समजाऊन सांगत बसण्यात ती होळीला पार विसरूनच गेली. शेवटी कंटाळून ते क्लाएंट, मॅडम, तुम्हाला हवं ते करा. म्हणून उठले तेव्हा विजयी मुद्रेने तिने घड्याळाकडे पाहिलं तेव्हा 9 वाजून गेले होते. आणि फोनवर ढीगभर मिस्स्ड कॉल्स. आपण आज बोंबलून होळी सेलिब्रेट करण्याचं पोरांना प्रॉमिस केलं होतं हे तेव्हा तिला आठवलं आणि मग ती सुसाट घरी निघाली. पण पोचेतो दहा वाजत आले होते. ओशाळलेली पोरं रुसून तिचीच वाट पाहत होती. मग तिने अरे कुछ नही, रात्री उशिरा बोंबलण्यातच खरी मजा असते वगैरे म्हणत तिथेच बॅग ठेवत होळी पेटवायलाही घेतली. ती पेटवली. मग कोणीतरी म्हटलं, अगं ताई पुजा पण करायची असते म्हणे होळीची. एरवी होळी म्हणजे निव्वळ बोंबलणं माहित असलेल्या तिला अरे खरंच की म्हणत त्याची जाणीव झाली. मग पुजा वगैरे करून रात्री साडे-दहाच्या वगैरे सुमारास मंडळी अशी सुसाट बोंबलायला लागली की त्या पांढरपेशी-सरळ-मान टाइप्स बिल्डिंगमधले सगळे ‘adults’ खिडक्यांतून डोकवायला लागले.

मग बहुतेक मुलांच्या आयांनी येऊन आपआपल्या पोरांना होमवर्क चं कारण सांगून घरी नेलं. दुसर्‍या दिवशी सकाळी-सकाळी वाजणारी बेल डोळे चोळत संपीने उघडली तर समोर साक्षात काणे काका.

काल रात्री तुम्ही जो काही होळी पेटवण्याचा उपक्रम राबवला तो स्तुत्यच आहे. त्यानिमित्ताने तुमचं कौतुक करण्यासाठी म्हणून आलो. कसं आहे, इथे शहरांनी होळी म्हणजे केवळ भांग-डीजे-पांढरे कपडे-आणि रंग एवढाच अर्थ घेतला जातो. पण आपल्या सणांचं महत्व आपणच जपलं आणि पुढच्या पिढीपर्यन्त पोचवलं पाहिजे. तुमची इच्छा असेल तर तुम्हाला सोसायटीच्या संस्कृतिक मंडळात एखादं पद देण्याची मी सोय करू शकतो.

आणि हो सूचना एकच, जे काही करायचं नं ते यापुढे रात्री आठच्या आत करत जा. कसंय, एक कोजागिरी सोडली तर मध्यरात्री सण साजरे करण्याची आपल्याकडे पद्धत नाही!

येतो.

हे एवढं सगळं अस्खलित मराठीत बोलून काणे काका आले तसे गेलेही. डोळे चोळणार्‍या संपीला त्यातलं संस्कृती आणि सोसायटी एवढंच काय ते कळलं. शेवटचं वाक्य म्हणजे सूचना होती की टोमणा हे मात्र तिला काही केल्या ठरवता आलं नाही. असो म्हणत ती पुन्हा शून्य मिंटांत तयार होण्यासाठी पळाली.

 

क्रमश:

 


टिप्पण्या

अनामित म्हणाले…
Welcome back Sanju didi

लोकप्रिय पोस्ट