संपी आणि तिचं धमाल जग - भाग : ४६

 


 संपी आणि राधा ऑफिसला पोचल्या तेव्हा घड्याळात दहा वाजून गेले होते. तिचं ऑफिस म्हणजे अगदीच छोटेखानी मामला होता. संपी, राधा, एक ट्रेनी असिस्टंट, आणि मार्केटिंग सांभाळणारा राहुल एवढाच काय तो लवाजमा. हो पण चौघे मिळून अगदी झोकून देऊन काम करायचे. फील्ड वर्क, फील्ड, विझिट्स, सह्याद्रीच्या कानाकोपर्‍यांत भ्रमंती सगळं त्यांचं उत्साहात सुरू असायचं. नवीन असलं तरी त्यांच्या कामाची आता दखल घेतली जाऊ लागली होती. दोन इंजीनियर मुली मिळून ही अशी वेगळी वाट चोखाळतायत आणि पर्यावरण संगोपनासोबत व्यावसायिक यशही मिळवतायत ही दखल घेण्यासारखीच गोष्ट होती. संपीच्या मूळच्या वेंधळेपणाला आता passion ची जोड लाभली होती. आणि त्यातून जे काही output मिळत होतं ते भन्नाट होतं.

आल्या-आल्या राधा अपूर्ण प्रोजेक्टस चा फॉलो अप घेण्याच्या मागे लागली. नेहा, संपीच्या सांगण्यावरून काही नेटीव्ह habitats विषयी रिसर्च करत references शोधत होती. संपी, नवीन आलेल्या एका प्लॉटचं landscaping करत बसली. राहुल नेहमीप्रमाणे त्याच्या लॅपटॉप समोर बसून, कानात म्यूजिक ओतत कामात बिझी होता.

थोड्या वेळाने, स्क्रीन कडे पाहत थोडासा खजील होत तो म्हणाला,

अरे हा मंदार अवचट कोणय?’

त्याच्या ह्या अनपेक्षित प्रश्नाने संपीची विकेटच उडाली. राधा फाइल मधलं डोकं काढून खजील होत एकदा त्याच्याकडे आणि एकदा संपीकडे पाहू लागली. पण संपी काहीच बोलेना म्हटल्यावर तीच म्हणाली,

का रे काय झालं?’

अगं काही नाही, हा मनुष्य कालपासून आपल्याला virtually stalk करतोय. मागच्या दोन वर्षातल्या आपल्या सगळ्या पोस्ट्स ना लाइक. वेबसाइट विझिट्स पण आहेत.

राधा संपीकडे पाहत हसत, हम्म... म्हणाली.

संपी आधी गोंधळली पण मग तो गोंधळ निस्तरत आपण त्या गावचेच नाही असं भासवत तिने लॅपटॉप मध्ये तोंड खुपसलं.

संपदाची बॉडी लॅंगवेज पुरती कळायला लागलेला राहूल दोघींकडे पाहत होता. कुछ तो है म्हणत हसत त्यानेही त्याचं लक्ष पुन्हा कामाकडे वळवलं.

संपी अधुन-मधुन लॅपटॉप वरची तिच्या अकाऊंटची टॅब उघडून पाहत होती. तिथे मंदारचा मेसेज काल रात्रीपासून येऊन पडलेला होता,

मी पण ठीक. गुड टू सी यू अगेन.

पण, संपीने तो उघडून पहिला नव्हता अजून. उघडला तर रीप्लाय करावा लागणार आणि तो काय करायचा हा तिच्यासमोरचा मोठा प्रश्न होता. मागच्या 2-3 दिवसांपासून मनात ठाण मांडून बसलेला हा विषय हाताळावा कसा ह्या गोंधळात ती होती.

कामाच्या धबडग्यात दिवस निघून गेला. राधा आज पुन्हा तिचे कांदे-पोहे असल्याने थोडी लवकरच निसटली होती. नेहा तिच्या-तिच्या वेळेला बाहेर पडली. संपदा मख्खपणे काम करत होती आणि राहुल त्याच्या डेस्कवर त्याच्या-त्याच्या खटपटी. मधुन-मधुन त्याचं सुरू होतं, इथे एवढा स्कोप आहे, तिथे अजून पुश करायला हवं, लास्ट प्रोजेक्ट ब्लॉक-बस्टर झाला, नेक्स्ट वीक मध्ये अमुक-अमुक सेमिनार आहे.. तुम्ही दोघींनी जायला हवं. आपला रीच वाढेल. ब्ला. ब्ला.

संपीच्या सगळं कानांवरुन वाहत होतं. मेंदुपर्यंत काही पोचत नव्हतं. ती नुसतंच हं-हं म्हणत होती.

डेस्कटॉप मधुन डोकं बाहेर काढून राहुलने मिनिटभर संपीकडे पाहिलं. आणि कम्प्युटर ऑफ करून तिच्या मागे येऊन उभा राहिला आणि म्हणाला,

मंदार अवचटचा मेसेज आलाय.

संपी खुर्चीवरून गरर्कन वळली.

किंचित हसत, हाताची घडी घालून, टेबलला टेकून, तिच्याचकडे पाहत उभ्या असलेल्या राहुलला पाहून, मग चोरी पकडल्या सारखी गप्प झाली.

तिला तसं भांबावलेलं पाहून राहुल खळखळून हसला आणि कुछ तो हुआ है..’म्हणत sack अडकवायला लागला.

झाला टाइमपास करून? निघा आता. डेट-बीट नाही वाटतं आज!

अरे ऐसे कैसे. है तो. आज की डेट एक ब्लॉगर के साथ है. Fooood blogger!’

गुड लक अँड गॉड सेव हर. बाय द वे, ह्या महिन्यातली ही कितवी?’

हम्म.. वैसे तो मै गिनता नही. लेकीन होगी 4th ऑर 5th

ग्रेट! पर वीक वन.

क्या करे बात बनती ही नही किसी के साथ. दिल हर एक पे थोडा-थोडा आता है

‘then wait for someone, जिसपे पुरा दिल आ जाए

हम्म.. wait करना फितरत में नही. और वैसे भी पुरा दिल जिन पे आता है वो लडकियां डेट पर नही आती, काम करती रहती है

शेवटचं वाक्य म्हणून चावी फिरवत तो गेलाही.

संपी क्षणभर विचारात पडली. पण विचार न झेपण्याच्या मनस्थितीत ती असताना फोन वाजला, मातोश्री!

अरेच्चा! आई आल्याचं विसरलोच कि आपण! स्वत:शीच पुटपुटत संपीनेही मग तिचं घबाड गुंडाळलं आणि घरी जायला निघाली.

 

क्रमश:

टिप्पण्या

समीक्षा म्हणाले…
Hii सांज, कशी आहेस...

लोकप्रिय पोस्ट