संपी आणि तिचं धमाल जग - भाग : ४७

 



वाटेत एक-दोन भाज्या घेऊन संपी घरी येईतो घड्याळात सात वाजून गेले होते. आई टीव्ही वर काहीतरी पाहत बसली होती. आल्या-आल्या हातातल्या भाज्या आईला देत संपी म्हणाली, आई, आज मस्त भरीत कर वांग्याचं. ही बघ वांगी आणलीयेत मी छान.

आईने संपीकडे क्षणभर पाहिलं आणि पुन्हा टीव्ही कडे पाहत ती म्हणाली,

मी नाही तू करणारेस मस्त भरीत’.’

का?’

का काय.. मी तुझ्याकडे आलेय. करून खाऊ घाल मला. मी काहीही करणार नाहीये. तिकडे तू घरी आल्यावर करते नं मी? आता तू कर. पाहू काय दिवे लावतेस.

ए आई असं काय. कंटाळलेय मी बाहेरचं आणि माझ्या हातचं खाऊन. कर नं.

कंटाळले काय कंटाळले? उद्या घरी पाहुणे आले तर त्यांना असंच म्हणणारेस का? कर मुकाट.

तू काय पाहुणी आहेस का?’

नाही. आई आहे. माझ्यासाठी तर आधी करायला हवंस. बरं, भरीत करतेच आहेस तर मस्त मठ्ठा पण कर. दही दिसतंय फ्रीज मध्ये बरंच.

आईच्या त्या अजेंड्या पुढे मनात भरीत-भाकरीचे चविष्ट तुकडे मोडत आलेली संपी हताश होऊन वांगी उचलून आत गेली.

आवरून आईवर चरफडत स्वयंपाकाला लागली. पण लक्ष का कोणास ठावूक सारखं फोनकडे जात होतं. एरवी आल्या आल्या हॉल मध्ये चार्जिंगला लावला जाणारा फोन आज किचन मध्ये चार्ज होत होता यातच सगळं आलं. वांगी भाजताना, कणीक मळताना, कांदा चिरताना एक डोळा आपला सारखा फोन वर. आईचं बाहेरून सुरू होतं, यांचा हा हे करतोय, त्यांचा तो ते करतोय, हिचं लग्न झालं, तिचं ठरलंय. वगैरे वगैरे. संपीचं त्या कशाकडे काहीही लक्ष नव्हतं. पण, आईचं काहीतरी वेगळंच सुरूये हे मात्र तिच्या लक्षात येत होतं. भाजलेल्या वांग्यांची सालं काढताना तिच्या फोन ने टुन्न केलं. आणि गडबडीने संपीने फोन उघडला. तर, ते होतं सोसायटीचं maintenance भराचं नोटिफिकेशन. स्वत:वरच चिडत मग तिने फोन बाजूला ठेवला. पुन्हा वांगी हातात घेतली. पण मग आता तिच्या मनात विचार आला, आपण messenger ची नोटिफिकेशन्स ऑफ तर ठेवली नाहीयेत ना? तिने पुन्हा फोन हातात घेतला. सेटिंग्स चेक केल्या तर त्या ऑनच होत्या पण मंदारचा काही मेसेज दिसत नव्हता. ती पुन्हा स्वत:वर चिडली. आणि आता फोन अजूनच दूर ठेवत पुन्हा स्वयंपाकाला लागली. भरीताला फोडणी देताना पुन्हा तिच्या फोनने टुन्न केलं. पण, आता कै फोन पहायचा नाही असं स्वत:ला बजावून संगत असतानाच नं राहवून तिने मीठ घ्यायच्या बहाण्याने पहिलाच. तर काय, ‘One new message from Mandar Awachat’ असं त्याच्यावर झळकत होतं. संपीने मग हातातला मिठाचा दबा बाजूला ठेवत शून्य मिंटात मेसेज उघडला..

फोन नंबर बदललाय का तुझा? माझा तोच आहे..

यावर मनातल्या मनात हसत ती विचार करायला लागली. अजूनही मनातलं पटकन स्पष्टपणे न बोलण्याची याची सवय गेलेली नाही तर. माझ्याकडे तुझा नवीन नंबर नाहीये. तो दे किंवा माझा जुनाच आहे तर त्यावर कॉनटॅक्ट कर असे दोन पर्याय त्याला सुचवायचे होते. स्पष्टपणे नंबर शेअर कर असं तो म्हणू शकला असता पण आडवळणाने जाण्याची त्याची जुनी सवय ती जाणून होती. त्यावर काय रीप्लाय करायचा ह्या विचारात ती गर्क असताना हिला एवढा का वेळ लागतोय हे पहाण्यासाठी म्हणून आई आत आली.

काय गं झालं का भरीत?’

आईच्या आवाजाने दचकून संपी पटकन फोन बाजूला ठेवायला गेली तर तो चुकून खालीच पडला. मग आपला गोंधळ निस्तरत, अगं हे काय होतच आलंय. ते थोडं कामाचं बोलायचं होतं राधासोबत म्हणून फोन.. बघत.. होते.

संपीच्या गोंधळाकडे पाहत आई शांतपणे म्हणाली,

मी विचारलंच नव्हतं तुला तू फोन वर काय करतेयस म्हणून.

संपी पुन्हा आपल्या वेंधळेपणावर चरफडली आणि स्वयंपाकाला लागली.

आणि हे काय मठ्ठा नाई केलास?’

करते गं. एकेक करतेय मी. तू बाहेर जाऊन बस बरं.

जाते मी. पण फ्रीज मधलं दही बाहेर काढ आधी.

तिच्याकडे चिडून पाहत संपी आपल्याच तंद्रीत वळली आणि फ्रीज ऐवजी तिने ओवेनचं दार उघडलं.

फ्रीज इकडे आहे!

पुन्हा आपण माती खाल्ली हे उमजून अजूनच चिडत तिने आईकडे पाहिलं तर आई हसत बाहेर निघून गेलेली होती.

नंबर द्यावा की न द्यावा याचा विचार करतच संपीने उरलेला स्वयंपाक पटकन आटोपला. बाहेर आणून मस्त ताटं मांडली आणि आई-लेकी दोघी पोटभर जेवल्या. आपल्या हातचं आईला आवडीने जेवताना पाहून मगाच पासून चिडचिडणारी संपी आतून सुखावली. जेवताना आणि जेवण झाल्यावरही आई एकदम गप्पांच्या मूड मध्ये होती. संपीची बोटं फोनकडे सारखी पळू पाहत होती पण आईचं बोलणं तिला ऐकावंही लागत होतं. बोलता बोलता आईने एकदम विषयालाच हात घातला,

मग संपे, आता लग्नाचा काय विचार आहे?’

हे ऐकून संपीने एकदम फोन हातातच घेतला. आईच्या अशा अचानक येण्यामागे काहीतरी हेतु होता हे तिला माहीत होतं. पण आपलं लग्न हा विषय आईने आता गंभीरपणे घेतलाय ही माहिती तिच्यासाठी नवीन होती. आणि आईने एखादी गोष्ट मनावर घेतली की मग ती ती तडीस नेतेच हे संपी जाणून होती.

लग्न? त्याचं काय.. हे काय काढलंस मध्येच आई तू?’

मध्येच नाही. बरोबर वेळेवरचं काढलाय मी विषय. खरंतर तू तो काढशील म्हणून वाट पाहत होते इतके दिवस. पण तू गप्पच. आता या विषयाचा गंभीरपणे विचार केलाच पाहिजे.

मी विषय काढेन म्हणजे?’

म्हणजे तू निवडलं असशील कोणाला तर सांगशील आज न उद्या असं वाटत होतं मला. पण तसं काही दिसत नाहीये.. आहे का?’

काय?’

कोणी आहे का तुझ्या मनात?’

यावर ती हो म्हणणं तर शक्यच नव्हतं पण नाही म्हणणंही तिला जड जात होतं..

अम्म.. म्हणजे नाही.. म्हणजे तसं काही नाइये.. पण..

पण काय?’

खाली मान घालत संपी हळू आवाजात म्हणाली,

काही नाही.

ठीक तर मग. तुझ्या मनात कोणी नसेल तर उद्या सकाळी आपण इथल्या एका वधू-वर सूचक मंडळात जातोय. माझ्या एका मैत्रिणीचे नातेवाईकच आहेत ते. फोनवर तसं जुजबी बोलणं झालंय आमचं. पण आता नाव नोंदवून आलेलं बरं.

आईचा हा पवित्रा पाहून संपी जागची उडालीच.

अगं आई तू घाई का करतेयस एवढी? मला नाही करायचंय इतक्यात लग्न.

घाई काय? तुझ्या अर्ध्याहून अधिक मैत्रीणिंची लग्नं झालीयेत. मी इतकी वर्षं नाव तरी काढलं का लग्नाचं? पण आता ही योग्य वेळ आहे. आणि नाव नोंदवलं की कै लगेच लग्न होत नसतं.

यावर संपी अवाक झाली. आई उठून आत गेलीही होती.

संपीने चिडून फोन उघडला. समोर मंदारचा तोच मेसेज. का कोणास ठाऊक तिने स्वत:चा नंबर सरल टाइप केला आणि त्याला पाठवून दिला.

 

क्रमश:


टिप्पण्या

अनामित म्हणाले…
सलग ३ भाग आले?! वा!! कथा चांगली चाललीये.

आता पुढचे भाग वाचायला परत ४ महिने थांबायचं ना?
टोमणा, कौतुक दोन्ही आवडलं ;)
नाही. भरपूर थांबलात तुम्ही. आता नाही थांबायला लागणार :)
Suharsha म्हणाले…
Welcome back Sanjivani...
Glad to see you active again
Hope your health is well now..
Keep writing as we always wait
for Sampi and her world....
अनामित म्हणाले…
I'm glad you're back. Sampi always hits me different, keep writing. And I hope you're doing well.
अनामित म्हणाले…
परत एकदा पुढच्या भागांची दीर्घ प्रतीक्षा करावी लागेल असा दिसतंय:(
अनामित म्हणाले…
I think Sanjivani may not check her blog regularly.
As she didn't read our views...

Samples owsome no question but don't check our patience.....
अनामित म्हणाले…
आपण लिहीते होवून कथा वाहती झाली हे बघुन आनंद झाला. पुढचे भाग लवकर टाका.
अनामित म्हणाले…
लिहित्या झालात खूप बरं वाटलं.
पुढचा भाग कधी येणार आहे? दैनिक / पाक्षिक / मासिक / की दिवाळी अंक म्हणून वाचू?

प्रश्न आगाऊ वाटू शकेल, पण तुमचे लेख वाचायला मिळावे अशीच यामागे इच्छा आहे हे समजून घ्याल __/\__
Unknown म्हणाले…
मंदार कंटाळेल अशाने.. संपी जरा लवकर लवकर येऊ द्या
अनामित म्हणाले…
आपण सुंदर लिहीता तबीय्त सांभाळा लिहीत रहा.
अनामित म्हणाले…
फेसबुकवर ज्या स्पीड ने कविता येतात त्या स्पीड ने ही कथा पूर्ण केलीत तर नियमित वाचणारे दुवा देतील तुम्हाला. पूर्वीच्या काळी हे ब्लॉग वगैरे प्रकरण नव्हतं हे एका परीने बरं आहे - लेखक त्यांची पुस्तकं पूर्ण लिहून झाली की मगच प्रकाशित करायचे.. ब्लॉगर्सनी पण नियमितता पाळली तर बरं होईल..
अनामित म्हणाले…
Welcome back.

Khup avadle sagle bhag. Asech lihit raha.

ani tabyetichi kalji ghya.
अनामित म्हणाले…
What's wrong with you Sanju Tai? I hope everything is alright.
अनामित म्हणाले…
कधी येणार पुढील भाग

लोकप्रिय पोस्ट